लोकप्रिय लेखक, कथाकार व पु म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाशझोत. व पु यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
व.पु.काळे हे ख्यातनाम नेपथ्यकार पु.श्री.काळे यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला.
व.पु. काळे यांनी स्थापत्य शास्त्राची पदवी घेतली व त्यानंतर २७ वर्ष बृहन्मुंबई महानगर पालिकेत नोकरी केली. वसुंधरा निगुडकर यांच्या बरोबर व.पु.यांचा प्रेम विवाह झाला. त्यांना सुहास हा मुलगा व स्वाती ही मुलगी झाली.
व.पु.यांची साहित्य निर्मिती:
व पु काळे यांची पहिली कथा “घरोघरी” १९५५ साली प्रसाद या मासिकात छापून आली. त्यानंतर अनेक मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या. कथा कथनासाठी योग्य अशा कथा ते लिहित असत. त्यामुळे त्यांच्यात संवादाची फेक जास्त असे. काळे यांचे लेखन हे त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या विविध व्यक्तींच्या व्यक्तिचित्रणावरून प्रामुख्याने तयार झालं होतं आणि म्हणूनच मध्यम वर्गीयांना त्यांच्या कथेत आपले प्रतिबिंब दिसत असल्यामुळे त्यांचा ओढा काळे यांच्या कथा – कथाकथनाकडे जास्त होता.
नित्य नव नवे विषय शोधून ते कथा – कथनात्मक अंगाने रंजक करण्याच्या कलेमध्ये त्यांचा हात धरणारा सहजासहजी सापडणार नाही.यातच त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय सामावले आहे़. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर नवे आकाश, नवे क्षितिज, नवे पाणी, नवी वने आणि नवी वळणे धुंडाळणारे ते मुसाफीर होते. मानवी जीवनातील चढउताराचे विविध पदर न्याहाळणे हा त्यांच्या प्रतिभेचा धर्म होता. आजुबाजूला भेटणारी माणसे त्यांच्या कथेचे नायक, नायिका असत. दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग हे त्यांच्या कथेचे विषय असत. त्यामुळे काळे यांच्या अनुभव विश्वाला मर्यादा आहेत ते केवळ मध्यम वर्गापुरतंच लिहितात असे आक्षेप काही समीक्षकांनी घेतले तरी काळे आपल्या अनुभव विश्वाशी आणि लेखन पध्दतीशी प्रामाणिक राहिले. त्यांचे जग मध्यमवर्गीयांच होतं. त्यांची सुख-दुःख, व्यथा – वेदना त्यांनी मनःपूर्वक अधोरेखित केल्या.
काळे यांच्या दृष्टिने समीक्षकांपेक्षा वाचकांचे स्थान अधिक महत्वाचे होते. जुलै ८८ मध्ये ‘ललित’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते. कोर्टात ज्याप्रमाणे आरोपीच्या सगळ्या अवांतर गुणांकडे दुर्लक्ष करून त्याच्या हातून घडलेल्या गैरवर्तनाबाबत चर्चा होते तसे सगळे समीक्षक असतात. कलाकार प्रथम जन्माला येतो, समीक्षा करणारा नंतर या क्रमात कोण कुणाला घडवतो ते सिध्द होतं. वाचक आणि श्रोता हेच माझ्यासाठी समिक्षक आणि त्यांनी मला भरपूर न्याय दिला आहे़. वाचकांचे येणारे प्रत्येक पत्र हेच माझे पुरस्कार आहेत. अफाट लोकसंग्रह आणि तेवढाच अफाट पत्रव्यवहार असणारे काळे यांचे ‘आपण सारे अर्जुन’ हे पुस्तक वाचताना सर्वसामान्यांची कशी घुसमट होते ते जाणवते. वाचक प्रदीर्घकाळ अस्वस्थ बनतो.प्रत्येक साहित्यिकाबरोबर वाचकांचा पत्रव्यवहार असतो परंतु त्याला कोणीही फारसे महत्व देत नसतील परंतु काळे यांनी त्यांना आलेल्या हजारो पत्रव्यवहाराला बोलके करून “प्लेझर बॉक्स” नामक संग्रह प्रसिध्द केला.
काळे कथा – कथनकार म्हणून जरी प्रसिध्द असले तरी ते इतर गुणांतही पारंगत होते. नाटक आणि कादंबरी यांचे रसाळ व नाट्यपूर्ण एकत्रीकरण करून “नाट्यांबरी” नामक नवा साहित्य प्रयोग सादर करण्यास त्यांनी प्रथम सुरुवात केली. अरुण दाते प्रणित ‘शुक्रतारा’ या भावगीतात्मक कार्यक्रमाचे भावपूर्ण सूत्रसंचलनही त्यांनी केले. आपल्या दिवंगत पत्नीवर त्यांनी लिहिलेले ‘ वाट पाहणारे दार ‘हे पुस्तक अतिशय बोलके आहे़.
मुंबईत १९७२ साली दूरदर्शन सुरू झाले तेव्हा पहिले टी.व्ही. नाटक प्रसारीत झाले ते काळे यांच्या ‘बाई बायको आणि कॅलेंडर ‘ या कथेवर. घरात लटकणाऱ्या कॅलेंडर मधून बाहेर पडून नायकाच्या आयुष्यात प्रवेश करणाऱ्या बाईची ही कथा हसता हसता चटका लावणारी होती. ‘हसरे दुःख’ ही कथा सुध्दा त्याच पठडीतील. ‘मुंबईचा जावई’ या मराठी चित्रपटाची कथा व.पु.काळे यांचीच.या चित्रपटाने मुंबईच्या चाळीचे चर्र करणारे सत्य दर्शन प्रेक्षकांना घडविले.
आकाशवाणीवरील काळे यांचे ‘टेकाडे भाऊजी ‘ व ‘तुम्ही – तुम्ही ‘ व ‘ मॅड मॅड ‘ ही नभोनाट्य सुध्दा लोकप्रिय झाली.
कथा-कथनकार व.पु. काळे :
काळे यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून कथा – कथनाचा श्रीगणेशा केला असला तरी १९६० मध्ये त्यांनी कथा कथनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. पण १९६७-६८ पासून खऱ्या अर्थाने त्यांची कथा – कथनाची कारकीर्द सुरू झाली. कथा लेखन अनेकजण करतात परंतु कथा-कथन फारच थोडे करतात. कथा कथन ही एक कला आहे़ ती सर्वानाच जमत नाही. ज्यांना जमते ते सर्वजण कथा लेखन करत नाहीत. काही जण दुसऱ्यांनी लिहिलेल्या कथा कथन करतात. परंतु व.पु.काळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या कार्यक्रमांत स्वतःच्याच कथा – कथन करत असत. कथा कथन या प्रकारास त्यांनी भन्नाट लोकप्रियता मिळवून दिली. अमेरिकेच्या वाऱ्या करून तेथील मराठी रसिकांसमोर कथा कथन करण्याचा मान मिळवणारे काळे हे पहिले साहित्यिक असावेत.
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार १९६० ते १९८२ पर्यंत काळे यांनी कथाकथनासाठी एक लाख सदतीस हजार किलोमीटर्स प्रवास केला. यात परदेशी दौऱ्यांचा समावेश नाही. कथाकथनाचे अकराशेच्यावर कार्यक्रम झाले. त्यात त्यांनी एकूण साडेपाच हजारच्या आसपास कथा ऐकवल्या. वपु दोन कोटी चार लाख साठ हजार शब्द बोलले.
वपु चांगले व्हायोलीन वादक होते, छायाचित्रकार होते इतकेच नाही तर उत्तम चित्रकार होते. त्यांच्या पुस्तकावर असलेले मुखपृष्ठ त्यांनी स्वतः काढलेले असे. त्यांचे हस्ताक्षर म्हणजे मोत्याचा दाणा असावा इतके सुंदर होते.
वपु यांचा मला आलेला सुखद अनुभव :
कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कथा कथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्यांना मुंबई येथे जून २००० मध्ये आयोजित केलेल्या कामगार साहित्य संमेलनात कथाकथन करण्याची संधी देण्यात आली होती. त्यात मला सुध्दा संधी मिळाली व प्रेक्षकांत बसून वपुंनी माझे कथाकथन ऐकले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलावले. शाब्बासकी दिली व माझ्या कथाकथनातल्या उणीवा कणा एवढ्या करून नि गुणवत्ता मणाएवढी करून प्रोत्साहन दिले. ती त्यांची व माझी पहिली व शेवटचीच भेट ठरली. परंतु तो प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.
असे सर्वांचे लाडके वपु २७ जून २००१ रोजी सर्वांना सोडून गेले.२७ जून २०२६ रोजी वपु यांचा पंचविसावा स्मृतिदिन आहे़. त्यांचे स्मरण म्हणून सर्व महाविद्यालयांत कथा कथन स्पर्धा आयोजित कराव्यात तसेच विविध साहित्यिक संस्थांनी सुध्दा वपु यांची दखल घ्यावी ही अपेक्षा.
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
दिलीपजी, वपुंवरचा लेख छान लिहिला आहे. खूपशी माहिती आपण ज्ञात करून घेतली आहे आणि छान तऱ्हेने मांडली आहे.
फक्त माझ्या आईचे माहेरचे नाव ‘मालती’ होते, लग्नानंतर नाव बदलून “वसुंधरा” झालं. 🙏 धन्यवाद.