Wednesday, February 5, 2025
Homeलेखअसे होते साने गुरुजी

असे होते साने गुरुजी

आज, २४ डिसेंबर, पूज्य साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन आणि कार्य याची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख. साने गुरुजींचे विचार काळाच्या ओघात लुप्त झाले नसून उलट दिवसेंदिवस त्यांचे महत्व वाढतच आहे. अशा या थोर द्रष्ट्या व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन.
– संपादक.

श्याम नावाच्या एका लहानशा बालकापासून साने गुरुजीं सारखा सत्पुरुष कसा साकार झाला, याचं श्रेय कोणाला असेल तर ते आहे श्यामच्या आईला, म्हणजेच यशोदाबाईंना.

या पार्श्वभूमीवर साने गुरुजी लिखित “श्यामची आई” ही कादंबरी महाराष्ट्राच्या घरा-घरात पोहोचली आहे. “आईसारखे परम दैवत दुसरे नाही” हा संदेश देऊन साने गुरुजींनी आईची महिमा जगापुढे मांडला. असे हे ‘श्यामची आई’ मराठी भाषेचं अनमोल लेणं आहे.

ख्यातनाम लेखक, स्वातंत्र्यसैनिक असलेले साने गुरुजी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे २४ डिसेंबर, १८९९ रोजी सदाशिव साने यांच्या देशभक्त घराण्यात झाला अन् जणू यशोदाबाईंच्या उदरी भारत मातेचा थोर सपुत उदयास आला.

यशोदाबाई म्हणजे मूर्तिमंत वात्सल्याचा जिवंत झराच. आईच्या कार्य कर्तृत्वाबद्दल गुरुजी म्हणत, “माझ्या आईने मला सारं काही दिलं. माझ्यात जे जे चांगले आहे, पवित्र आहे, ते ते सारं तिचं देणं आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली”. त्यांची आई ही प्रेम, मांगल्य व देशभक्तीचं साक्षात मुर्तिमंत व्यक्तिमत्व आहे.

“आई माझा गुरू,
माझा कल्पतरू !
प्रेमाचा सागरू,
माझी आई !”

आचार्य अत्रे यांनी “श्यामची आई” या पुस्तकावर चित्रपट काढला. त्याला १९५३ साली राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. हा या पुस्तकाचा व गुरुजींचा सर्वात मोठा गौरव आहे.

साने गुरूजी हे राष्ट्र सेवादल अन् स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते होते. म्हणूनच त्यांनी जीवनभर खादीचा पुरस्कार करत प्रचार केला. गुरुजींच्या रोमारोमात देशाभिमान भिनला होता. महात्मा गांधी हे साने गुरुजींचं दैवत. गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेण्याआधी शिक्षकाच्या नोकरीला सोडचिठ्ठी दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी पुढे असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळीत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्याची परिणिती म्हणजे साने गुरुजींना अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, डॉ.राममनोहर लोहिया, मौलाना आझाद, विनोबा भावे, आपटे गुरूजी, जमनालाल बजाज, ना.ग.गोरे, एस.एम.जोशी या महान स्वातंत्र्यसैनिकांसह अनेक वेळा कारावासही भोगावा लागला.

साने गुरुजी १९३२ मध्ये नाशिकच्या जेलमध्ये असताना त्यांनी अवघ्या पाच दिवसांत “श्यामची आई” ही कादंबरी शब्दबद्ध केली. याशिवाय धडपडणारी मुलं, आस्तिक, दीनबंधू बाबू, क्रांती, भारतीय संस्कृती आदी कादंबऱ्या लिहिल्या.

खान्देश ही साने गुरुजींची कर्मभूमी. १९३० साली गुरुजींनी अंमळनेर येथे “विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका,” असे जाहीर सभेत जनतेला आवाहन केल्याच्या आरोपाखाली त्यांना धुळ्याच्या तुरुंगात १५ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. तेथे त्यांनी “स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई ! सुखवू प्रियतम भारतमाई !” हे गाजलेले गीत तसेच “खरा सत्याग्रही” हे नाटक तर, “अस्पृशोद्धार” व “खरी ग्रामसुधारणा” हे लेख लिहिले. महत्वाचे म्हणजे येथेच त्यांनी टॉलस्टॉयच्या “व्हॉट इज आर्ट ?” या पुस्तकाचा अनुवाद करून “कला म्हणजे काय ?” हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामुळे साने गुरूजींची स्वातंत्र्यसेनानीसह देशभक्त लेखक, कवी अशी जनमानसात ख्याती झाली.

अंमळनेर येथील प्रताप मिलच्या टाळेबंदी विरोधात साने गुरुजी आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली किसान मोर्चा काढण्यात आला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी गुरुजींनी, “आपण उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण ! किसान-मजूर सारे उठतील, कंबर लढण्या कसतील, एकजुटीची मशाल घेऊनी, पेटवतील हे रान !!”
हे स्फूर्तीगीत रचले. साने गुरुजींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोठी कणव होती, हे यावरून प्रतिबिंबित होते.

“खरा धर्म” काय असतो, हे लोकांना जोपर्यंत कळणार नाही, तो पर्यंत आपली पारतंत्र्यातून सुटका होणार नाही, हे जाणून साने गुरुजींनी जनमानसाला खऱ्या धर्माची ओळख व्हावी, या उद्देशाने एक कविता समर्पित केली.
“खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे,
जगी जे दीन पददलित,
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे !”

“अस्पृश्यता निवारण” हे गुरुजींचे जीवनध्येय होते. पंढरपूरचे विठोबांचे मंदिर तसेच नाशिकचे काळाराम मंदिर हे हरिजनांसाठी खुले व्हावे, यासाठी त्यांनी आमरण उपोषण-आंदोलन केले. त्यात अखेर त्यांना यश मिळून ही मंदिरे हरिजनांना खुले झालीत. यासाठीच विनोबा भावेंनी साने गुरुजींना “अमृतस्य पुत्रा” ही उपमा दिली. तर आचार्य अत्रे यांनी, साने गुरुजींचे महान साहित्य तरुणांच्या मनावर अनेक पिढ्या संस्कार करेल, अशी स्पष्टोक्ती केली. ज्येष्ठ लेखक पु.भा.भावे यांच्या मते, गुरुजी हे लेखक या नात्यानं मोठे होतेच, त् याबरोबरच माणूस म्हणूनही मोठे होते.

साने गुरुजींचे साहित्य, त्यांचे चरित्र व चारित्र्य म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला एक अनमोल ठेवाच आहे. आधुनिक महाराष्ट्राचे संत साने गुरुजी हे आज जरी आपल्यात नसले, तरी त्यांची शिकवण, विचार अन् साहित्य भारतीय समाजाला सदैव प्रेरणा व स्फूर्ती देत राहील. परमपूज्य साने गुरुजी यांना कोटी-कोटी प्रणाम !

— लेखन : रणवीर राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी