भक्तिरुप तू, शक्तिरुप तू, आई जगदंबे,
भक्त तुझा हा तुज आळवितो,
धाव धाव वेगे,
भव्य रूपे गे, गडावरी तू,
अष्टभुजातून शस्त्र धरी तू,
आदिशक्ती तू, शिवस्वरूप तू,
दे दर्शन मज गे…
मुकुट शिरावरी रत्नखचित तो,
कनक अलंकार, हार शोभतो,
कंकणे हाती, नथ नाकावर,
ललाटी मळवट गे…
तूच प्रकटशी मनामनातून,
भय जाते, भीती पळते मागून,
चैतन्याने, देही शक्ती ये,
दिव्य सोहळा गे…
मशाल, दिवट्या, पणत्या लावू,
विविध फुलांनी, तुजला सजवू,
भरून मळवट, करून आरती,
गाऊ जोगवा गे…

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
आंबे कृपा करी 🙏
तू सौम्या तू रुद्रा
तू गौरी तू चामुंडा
शिवरायांची तूच तू तुळजा
तू नारी तू सबला
तू नारायणी तू अचला
तू सुखदा, तू वरदा
तू यशदा जगजीता
शौर्य तुझे वीरतेचे
क्रौर्य तुझे संहाराचे
जगाच्या उद्धाराचे
आनंद साधनेचे
करू या जागर
मागू या जोगवा
घालू या गोंधळ
घालुनी साद
लाभेल प्रतिसाद
घेऊ या आशीर्वाद
होऊ या संपन्न
सुखशांती समृद्धीचा
वसा घेऊन

— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दोन्ही कविता मस्तच आहेत