आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल च्या सुरुवातीपासूनच्या लेखिका सौ रश्मी हेडे यांच्या आई चा आज ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या आई वर केलेली भावपूर्ण कविता पुढे देत आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
आई, तू आम्हाला
हे जग दाखवले….
तू सोबत होती म्हणून
जगणे अधिक सुंदर झाले…..
किती लिहू तुझ्यासाठी…
शब्द ही पडती अपुरे
आम्ही तुझी पाखरे
झेलती आमचे सर्व नखरे….
आई, तू शांत, संयमी
तुझे विश्व म्हणजे आम्ही
तू प्रेम दिले, संस्कार दिले
आम्हाला तूच घडवले
तुझे अनंत उपकार…
तुझी प्रेमळ ऊब
जाऊ नको कधी दूर.
तू आमच्यासाठी खास….
नाही जगली कधी स्वतःसाठी
सतत जगली आम्हा साठी
सतत काम, पै पाहुणे,
राबलीस की ग सर्वांसाठी…
नेहमी आमचे पुरवले लाड,
एकटीनेच सोसला सर्व भार….
कधीच काही बोलली नाही
कधी उणे जाणवू दिलं नाही
आमच्या आवडी निवडी
जपता जपता घेतल्या
तू किती खाल्ल्या खस्ता
तूच दाखविला जीवन रस्ता
तुझ्यामुळे हे जग दिसले
अनेक सुंदर चित्र रंगवले….
तू सदा सोबत होती
म्हणून नव्हती कसली भीती…

तू आई झालीस…
तू आजी झालीस….
पणजी देखील झालीस
पण कधी नाही दमलीस…
तू नाही कधी बदलली
अजूनही तशीच आहे..
आम्हां सर्वांना जोडणारा
अतूट, अदृश्य दुवा आहे..
तुझी साथ अनमोल आहे
म्हणून तर म्हणतात ना……
ज्यांच्या जवळ असते आई
त्यांना कशाचीही कमी नाही….
आई, तू आमच्या सर्वांसाठी
देवाचे दुसरे रूप
आम्हाला आवडतेस
तू खूप खूप
जशी विठ्ठलाची प्रिय तुळस
तशी आई मायेचा कळस.
जशी वृक्षाची अखंड सावली
तशी ही माय माऊली….

— रचना : सौ रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800
👌👌👌👌वा आईसाठी रचलेली कविता छानच आहे