Wednesday, July 2, 2025
Homeलेखआज, पुस्तक दिन !

आज, पुस्तक दिन !

इंग्रजी साहित्यातला नावाजलेला कवी, नाटककार असलेल्या विल्यम शेक्सपियर चा २३ एप्रिल १५६४ हा जन्म दिवस आणि २३ एप्रिल १६१६ हा मृत्यू दिन असून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ युनेस्कोतर्फे १९९५ मध्ये पहिल्यांदा २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॅापिराईट दिन म्हणून साजरा केला गेला.

अवघे ५२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या विल्यम शेक्सपियर ने ३४ नाटके, ३ दीर्घ काव्ये, १५४ सोनेट्स लिहिली. त्यांच्या नाटकांपैकी १० नाटके ऐतिहासिक, १६ सुखात्म तर १२ नाटके शोकात्म आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये त्यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. आजही त्यांच्या नाटकांचे प्रयोग जगभर होत असतात. त्यांनी स्वतः काढलेल्या नाटक कंपनी द्वारे ते स्वतःची नाटके सादर करू लागले. ते अभिनय देखील करीत असत. यातून त्यांनी प्रचंड पैसा मिळवून ब्रिटन मधील श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ते ओळखल्या जाऊ लागले.

विल्यम शेक्सपियर

असा हा शेक्सपिअरचा जन्म व मृतुदिन अक्षरांच्या जगाची जाणिव करून देणारा दिवस आहे. वाचन, प्रकाशन आणि कॅापिराईट विषयी, कायद्याची जाण लोकांना व्हावी, म्हणून या दिवसाचे आयोजन करण्यात येते.

प्रवासात, आजारपणांत, एकटं असतांना पुस्तकांसारखी साथ नाही. पुस्तकं वाचणं ही एक पायरी झाली आणि लिहीणं, ही त्याची पुढची पायरी झाली. आपल्या भावना, अनुभव, वेदना, ज्ञान, व्यक्त करण्याचे, लिहीणे एक उत्तम माध्यम आहे. जसे आपण इतरांचे पुस्तक वाचून आनंद मिळवला, तसे आपले पुस्तक वाचून, तो इतरांना मिळावा असे लहान, मोठ्या, सगळ्याच लेखकांना वाटत असते. आपल्या लिखाणाचे पुस्तक व्हावे, अशी सुप्त इच्छा प्रत्येक लेखकाच्या, कवीच्या मनात असते.

मला आवडलेली दोन पुस्तकं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर यांचे “अमृत वेल” आणि लेखक शिवाजी सावंत यांचे “मृत्यूंजय” ही होत.या दोन्ही पुस्तकांनी माझ्या मनावर सखोल परिणाम केला आहे.

जेव्हा मी मुलांची शिबीरं घ्यायची तेव्हा त्यांनाही वाचनासाठी प्रवृत्त करायची, पुस्तकांची देवाण घेवाण करायची. यासाठी मी मुद्दाम वेळ ठेवलेली असायची. तेव्हा मुलांसाठी मी एक कविता केली होती.ती पुढे देत आहे.

“ वाचाल “
तरच वाचाल
जीवन रूपी सागरांत सहज तुम्ही तराल !

परी नी राक्षस
देव नी भूत
सांगा
खरे तुम्हाला भेटतात ?
नाही ना ?
पण “वाचाल”
तर त्यांना भेटाल !

सई नी माई
बंडू नी खंडू
सांगा खरंच
तुमच्याशी खेळतात ?
नाही ना ?
पण “वाचाल”
तर त्यांच्याशी खेळाल !

चंद्र नी सुर्य
ग्रह नी तारे
सांगा खरंच
तुम्हाला समजतात ?
नाही ना ?
पण “वाचाल”
तर त्यांना समजाल !

जमा नी खर्च
नफा नी तोटा
सांगा खरंच
तुम्हाला कळतात ?
नाही ना ?
पण “ वाचाल”
तर सर्व जाणाल !

“वाचाल “ तर वाचाल
जीवनरूपी सागरांत
सहज तुम्ही तराल !

नविन पुस्तक छापण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्वांना, या पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४