पालघर जिल्ह्यातील केळवे येथील ज्येष्ठ साहित्यिक रघुनाथ माधव पाटील ऊर्फ आर एम अप्पा यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या सुहृदाने जागविलेल्या या त्यांच्या काही आठवणी. आर एम अप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– संपादक
पालघर जिल्ह्यातील साहित्याचा पितामह काल आपल्यातून निघून गेला आहे.ठाणे जिल्ह्यातील (आत्ताचा पालघर जिल्हा) साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळख देणाऱ्या आर एम अप्पानी परिसरातील अनेक नवोदित साहित्यिकांना लिहिते केले, प्रोत्साहित केले. कृषी, सामाजिक, सहकार व साहित्यिक क्षेत्रात तळमळीने काम करून कार्याचा ठसा उमटविला.
पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ ते कोकण मराठी साहित्य परिषद असा साहित्य प्रवास करून केळवे सारख्या ग्रामीण भागात १९९२ साली कोणतीही सुखसुविधा नसताना कोकण मराठी साहित्य परिषदेचे दुसरे मध्यवर्ती साहित्य संमेलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन केळवेवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून, महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांना केळवे येथे आणून एक साहित्याचा नवा प्रवाह निर्माण करण्यात आर एम अप्पांचा सिंहाचा वाटा होता.या संमेलनात संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे (महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व साहित्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष) यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला होता.
ठाणे जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना एकत्र करून कोमसापचे साहित्यिक कार्य ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी माझ्यासारख्या साहित्यप्रेमी पत्रकाराला हाताशी घेऊन डहाणू शाखेची स्थापना करण्यासाठी आर एम अप्पांनी पुढाकार घेतला होता.अनेक साहित्यिक उपक्रमे राबविताना ते नेहमी प्रोत्साहन देऊन सहकार्य करीत असत.तुझ्यात क्षमता आहे,हे कार्य तु यशस्वीपणे करु शकतोस, असे प्रोत्साहीत करणाऱ्या आर एम अप्पांचा हात आमच्या पाठीशी नेहमी होता.
नुकत्याच केळवे येथे झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात आर एम अप्पांचा जाहिर सत्कार करण्यात आला. ते आजारी असतानाही आमच्या आग्रहास्तव संमेलनस्थळी आले. त्यावेळी मला म्हणाले की, या सत्कारामुळे मला नवी उर्जा मिळाली आहे. माझे आयुष्य वाढले आहे.हे वाक्य आजही आम्हाला आठवत आहे. काल निधनाचे वृत्त कळल्यावर जुन्या आठवणी जागा झाल्या.
एक साहित्यिक दुसऱ्या नवोदित साहित्यिकांना पुढे जाण्यासाठी, कोमसापची पालखी जबाबदार साहित्यिकांच्या खांद्यांवर देऊन, चिरनिद्रीत झालेल्या आर एम अप्पांचे साहित्य चळवळीचे कार्य विसरण्याजोगे नाही.हे कार्य पुढे असेच सुरू ठेऊ.त्यांच्या पत्नी रजनी, विवाहित मुलगी स्मिता, नुतन,मुलगा विकास, विविध यांनी अप्पांची केलेली सेवा हि साहित्याची सेवा होती.असे आम्ही समजतो.त्यांच्या दु:खात कोमसाप परिवार सहभागी आहे.आप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!
— लेखन : प्रवीण नारायण दवणे. पालघर जिल्हाध्यक्ष (कोकण मराठी साहित्य परिषद)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800