आपली काॅलनी.. .हो, गव्हरमेंट काॅलनी.. मुंबईतील बांद्रा पूर्वेची.
काय नाही दिलं आम्हाला या काॅलनीने..? आमचं जीवनच सुरू झालं इथूनच….
निरागस बालपण…
निर्मळ मन…
रामराज्य म्हणजे काय ते आम्ही पाहिलयं..
आम्ही जगलोय.
आम्ही रांगायला, चालायला ही इथेच शिकलो. आमचं बालपण…खुप बागडलो..इथे.
आमच्या आयुष्याची सुरवात इथेच झाली. आमची काॅलनी म्हणजे एक मोठं कुटुंब, आमच्या संपुर्ण बालपणाच्या खाणा खुणा सांगणारं, म्हणजे आमची काॅलनी. काॅलनी म्हणजे अनेक चौक असलेली वसाहत. चौक म्हणजे एकाला एक लागून दहा इमारतीचे काही चौक. तर काही बारा इमारतीचे चौक. प्रत्येक चौकाच्या मध्ये एक छानशी पायवाट आणि मध्ये एक साधारण रस्ता, हिरवळीने आच्छादलेला.
किती विचारांती बनवलेली होती ही काॅलनी ! घराचा आतील आराखडा म्हणजे आतील स्ट्रक्चर पण खुप छान. बाहेरून कुणी घरी आलं की येणारा प्रथम पाय धुवुन येणार, उजवीकडे हाॅल, हाॅलला लगेच गॅलरी. घरात समोर पॅसेजला,पुढे आल्यावर समोर स्वयंपाक घर आणि लगेच उजवीकडे बेडरूम. खोल्या अश्या मोठ्या नव्हत्या, पण पैपाहूणे आले की कुठे कमी नाही अशी ती जागा, अशी ती घरं. अशीच सगळी घरं होती.
प्रत्येक चौकात काही तरी विशेष महत्त्व असलेली कार्यालयं असायची.आमच्या चौकात पोस्ट ऑफिस, एका चौकात रेशनिंग ऑफिस, एका चौकात म्युनिसिपालटीची लहान मुलांची शाळा, एका चौकात लायब्ररी तर दुसऱ्या चौकात एक सांस्कृतिक हाॅल, असं काहीतरी पण प्रत्येक चौकातलं महत्त्व आगळंवेगळं.

शाळेची मे महिन्यातील सुट्टी म्हणजे चौकाचौकात पूर्ण सकाळ, दूपार,मुलामुलींचा खेळण्याचा आवाज. लगोरी फुटलीचा आवाज, नाहीतर मुलांचा चौकार मारलेला आवाज. पण कुणी रागावलंय असं आठवत नाही. दोरीच्या उड्या, डबा ऐसपैस, लंगडी, टिक्कर बिल्ला, बॅडमिंटन, खुप खेळांची ओळख काॅलनीत झाली.
आम्ही बैठे खेळ पण खुप खेळत असू. पत्ते, बुद्धिबळ, कॅरम, सागरगोटे, सापशिडी, पाटावरचा खेळ, किती आणि किती आठवावे तेवढे कमी. मुख्य म्हणजे शेजारीपाजारी, खुप चांगले होते.
प्रत्येक फॅमिलीत काहीना काही चांगले गुण होते. बहुतेक सण आम्ही एकत्रच साजरे करत असायचो. दिवाळीत तर पहिला दिवसात पहिला पहाटेचा फटाका कुणाचा, त्याला खुप भाव मिळायचा. वेगवेगळे कंदिल, पणत्या, रांगोळी, घरी फराळ करतानाचा घमघमाट.
नविन कपडा घालून, कपाळ्यावर लावलेला गंध, मग एकत्र फटाके उडवून केलेली मस्ती.
एकमेकांकडे पाठविलेली फराळाची ताटं.
दहीहंडी फोडणे आणि होळीचा खड्डा, काॅलनीतले हे सण तर विसरणं शक्यच नाही. हे सण म्हणजे पूर्ण दिवस उत्सव असे.
एकमेकांना मदत करणे, अडीअडचणीत हवे नको पाहणे, बालगोपाळाचं राज्य.
बाजूलाच एक मारूतीचे मंदिर अगदी लहान होते दिवा बत्ती लावणं, थोडा नैवेद्य ठेवणं, प्रसाद वाटणं. आम्ही करत असु. हळूहळू तिकडे काही भक्तलोकांनी आरती सुरू केली. बरोबर साडेसातला आम्ही आरतीला जमायचो. मग तिथे कीर्तन प्रवचन सुरू झाले. रामनवमीला, हनूमान जय॔तीला मोठा उत्सव असायचा. मोठ्या स्पीकरवर रामायणाची गाणी ऐकत ऐकतच आमची गाणी पाठ होत गेली आणि आम्ही मोठे होत गेलो. आता ते मंदिर भव्य दिव्य झालं आहे.
श्री हनुमान मंदिरात प्रवेश करताना हनुमानाच्या मूर्तीसमोर उभं राहिलं की पूर्ण काॅलनीतले दिवस डोळ्यासमोरून झळाळून जातात.

काॅलनीतल्या बसस्टॉपवर ८७ नंबर ची बस खुप महत्वाची होती. ती मंत्रालयापर्यंत जायची. तेव्हाचं ते सचिवालय. बस नंबर ३१५, ३१६ चा बस स्टॉप, सांताक्रूझ कुर्ला घेऊन जायची. मग २१२ नंबरची बस सुरू झाली, ती बांद्रा पश्चिमेला घेऊन जायची. बसच्या लाईनीत उभं राहीलं की समोर उडपी हाॅटल, वाय काॅलनीच्या साईडला अमृत दुकान, काॅलनीच्या साईडला एक दळणाचं दुकान होतं.
बसस्टॉपच्या बाजूला उडपी मधील इडली, वडा, सांबार. मला वाटतं आम्हाला तिथूनच हाॅटेल म्हणजे काय ते समजायला सुरवात झाली.
याच दरम्यान नवीनच चेतना काॅलेज काॅमर्ससाठी बांधलं गेलं. त्याच्या बाजूला संजय हॉटेल .तिथे सामोसाच्या चवीची ओळख झाली. बाजुला उजवीकडे एरो स्टुडिओ होता, तो म्हणजे एक ल्यांडमार्क.
खुप विद्यार्थी पासपोर्ट साईज फोटो काढायला येत असत. त्या काळातील फोटो म्हणजे ब्लॅक एन्ड व्हाईट.
संध्याकाळी काॅलनीतल्या बायका लहान मुलांना खेळायला घेऊन काॅलनीत खाली येत तेव्हां एकमेकांच्या ओळखी होत असे. साधारण सात पर्यंत सगळे परत घरी जात असत.
खुप छान दिवस होते ते.
मला कुठेही भांडणतंटा, मारामारी, चोरी कधी ऐकीवात आली नाही. खरंच असंच होतं का रामराज्य ? हो त्या आता मागे वळून पाहताना वाटतं की आमची काॅलनी म्हणजे एक छोटं रामराज्यच होतं.
आता त्या काॅलनीकडे डोळे भरून पाहताना सर्व बालपण डोळ्यासमोर उभं राहतं.
किती लोकं होती, कुठे गेली, किती दूर गेली…..
आता काॅलनी ही जाणार. तिला उध्वस्त होताना बघणं म्हणजे स्वतःच्या बालपणातील आठवणीच उध्वस्त होणार असंच वाटतं.
तेव्हा फोन नव्हते, कॅमेरा नव्हते
सुबत्ता नव्हती, तंत्रज्ञान नव्हते.
आठवणी होत्या फक्त आठवणी.
म्हटलं तर काही नव्हतं,
पण खुप खुप होतं.
आपुलकी होती.
जिव्हाळा होता
प्रेम होतं, सहानुभूती होती.
ते पैश्यात मोजणारं नव्हतं
ना मोजपट्टीने मोजणारे नव्हतं,
ना तराजूत तोलणारं नव्हतं
पण आयुष्यभर जगण्यासाठी
मजबूत पाया
या काॅलनीने दिला.
खुप खुप दिलं
शब्दाच्या पलीकडलं दिलं.
हृदयाच्या कप्प्यात भरून राहिल असं दिलं.
धन्य धन्य काॅलनी.
धन्यवाद काॅलनी.
अलविदा….अलविदा….

— लेखन : पूर्णिमा शेंडे (कोल्हापूरे)
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
हो ना….हे सर्व माझ्या पूर्णपणे लक्षात आहे …मला तर…खंर सांगु..हेच मंदिर प्रत्येक वेळी आठवत असतं..आणि डोळे मिटून आठवलं तर हेच पूर्वीचेच मंदिर माझ्या डोळ्यासमोर उभे राहते…खंरच…बालपणींच्या सर्व आठवणीं अगदी उफळून येतात…हे बघितल्यावर सर्व काही आठवलं गं…
आणि लेख खूपच छान लिहिलंय👍👌🏻…पूर्ण बालपण, अगदी सर्व काही…आठवलं…
आता फक्त आठवणींच उरल्यात…
त्या एवढ्याशा घरात किती प्रसंग साजरे झाले , लग्न, मुंजी, केळवणं, बारशी, डोहाळजेवणं, वाढदिवस, आलेला पै पाहुणा पण सहज सामावुन जायचा. गावावरुन कोणी यायचा, अभ्यासासाठी, शिक्षणासाठी, परिक्षेसाठी, मुलाखतीसाठी त्यांना दादरहुन जवळ म्हणजे बांद्रा कॅालनी.. पण कधी घरात गर्दी झाली, आमची स्पेस मिळत नाही असं कधी मनातही आलं नाही. उलट एकत्र मजाच वाटत होती. अशी ही आमची कधीही विस्मरणात न जाणारी कॅालनी.. मेन रस्ते सोडले तर कधी वाहनांची भिती नाही वाटली. कारण त्यावेळी सायकली सुद्धा भाड्याने घेऊन चालवल्या जात.
My Father MOHAMMED NIZAMUDDIN, Government Servant for 35 years of his service . resided in B 95/3 & B 25/6 of Udupi Chaukh.
अतिशय योग्य लिहिलंय.माझ्याही,अनेकांच्याही पूर्वीच्या कॉलनी
विषयी अशाच भावना असतील.माझेही बालपण आठवून गेले तुमचा लेख वाचून!शेजारपाजार किती वेगवेगळ्या प्रांतातून आलेला!सगळ्या चालीरितींचे आदान प्रदान होत असे.सणवार फारच उत्साहाने साजरे होत.भोंडला तर खिरापतीसह मस्त साजरा व्हायचा. एकूणात एकमेकांमध्ये मिसळणे आपोआप व्हायचे.एकटेपणा जाणवत नसे.आता करमणूक कशी होईल मुलांची,मोठ्यांची ह्याचा विचार करावा लागतो.मला वाटते सणांचे प्रयोजन त्यासाठीच असावे.त्यातील कर्मकांडे भाग सोडून देऊ.मुख्य विषय कॉलनीचा!मी साधारण १९६५ ते १९७५ ह्या कालखंडाचा विचार करते.तेंव्हा ती खूप सुरक्षित,उबदार आणि विसावा देणारी होती.