माजी केंद्रीय मंत्री कै. वसंत पुरुषोत्तम उपाख्य बापुसाहेब साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष लेख.कै. बापुसाहेब साठे.
विनम्र अभिवादन…
_ संपादक
विदर्भातून आतापर्यंत केंद्रात जवळजवळ नऊ ते दहा राजकारणी मंत्री झाले. मात्र राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्थान आढळ केले असे दोनच नेते सांगता येतील. त्यातील एक म्हणजे कै. वसंत पुरुषोत्तम उपाख्य बापूसाहेब साठे आणि दुसरे विद्यमान केंद्रीय मंत्री, श्री नितीन जयराम गडकरी.
यातील वसंतराव उपाख्य बापूसाहेब साठे यांनी १९७२ ते २०१० पर्यंत राष्ट्रीय राजकीय क्षितिजावर आपले अस्तित्व कायम ठेवले होते. एक निष्णात कायदेतज्ञ, एक लढवय्या कामगार नेता, एक निष्ठावंत काँग्रेसचा नेता, एक राजकीय विचारवंत कट्टर विदर्भवादी नेता, सर्व पक्षात आणि समाजाच्या सर्वच घटकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असणारा जगन्मित्र नेता आणि एक कुटुंबवत्सल माणूस असे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणजे बापुसाहेब साठे हे होते.
माझं माझा आणि बापूसाहेबांचा संबंध मी शाळेत सातव्या वर्गात असतानापासूनच आला होता. तेव्हापासूनच एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखायला लागलो होतो. आज ५ मार्च २०२५, आज बापू असते तर ते शंभर वर्षाचे झाले असते. आज तारखेने त्यांची जन्मशताब्दी आहे. एक धडाडीचा नेता, उत्तम प्रशासक, एक राजकीय विचारवंत आणि एक रसिक माणूस म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना ज्ञात आहेच. मात्र आज मी सर्वांवर प्रेम करणारा एक कुटुंबवत्सल माणूस म्हणून मला त्यांच्या आलेल्या अनुभवांबाबत सांगणार आहे.
मला आठवते, सातवीची परीक्षा आटोपली आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मी नागपूरला मी शिकत असलेल्या हडस हायस्कूलच्या स्विमिंग पूलवर पोहोणे शिकायला जाऊ लागलो. त्यावेळी हडस मध्ये माझ्याच वर्गात असलेला सुभाष साठे हा देखील पोहणे शिकायला येत होता. त्याच्याबरोबर त्याचे वडीलही यायचे. उंच धिप्पाड गोरे भर्राड आणि देखणे व्यक्तिमत्व असलेले सुभाष साठेचे वडील हे पट्टीचे पोहणारे होते. स्विमिंग पूलवर सर्वात वरच्या पट्टीवरून ते बिनधास्त उडी मारायचे तेव्हा आम्हा मुलांच्या काळजाचा ठोका चुकायचा.जमेल तेव्हा सुभाषसह आम्हा सर्वांनाच पोहणे शिकवायला ते यायचे. बापू पोहणे शिकवायचे तेव्हा पोटाखाली हात धरून आम्हाला हातपाय मारायला लावायचे. हळूच केव्हातरी पोटाखालचा हात काढून घ्यायचे. लक्षात आले की आम्ही गडबडायचो. त्यावेळी बाजूला असलेले बापू आम्हाला धीर द्यायचे. अरे घाबरू नको मी तुला पकडतो आणि असे म्हणत ते पोटाखाली हात न घालता स्विमिंग पॅन्टच्या वरच्या बाजूने बोट अडकवून हं आता मी पकडलंय, आता मार हात पाय असे सांगायचे. असेच करून सुभाष सह आमच्यापैकी अनेकांना त्यांनी त्यावेळी पोहणे शिकवले. त्या काळात स्वतःचे असो किंवा मित्राचे वडील म्हटले की भीतीच वाटत असे. पण बापू तसे भितीदायक व्यक्तीमत्व नव्हते. पोहणे संपल्यावर सर्व मित्रांची ते आस्थेवायिकपणे चौकशी करायचे. कुठे चुकले तर स्विमिंग पूल मध्येही न रागवता प्रेमाने समजवायचे. त्यावेळी आमच्या इतर मित्रांच्या वडिलांसारखेच आमच्यासाठी बापूही एक होते.
सातवीतून आम्ही आठव्या वर्गात गेलो. अवघ्या दोनच महिन्यात विदर्भात स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी आंदोलन सुरू झाले. एका दिवशी विदर्भ बंद राहणार असल्याची घोषणा झाली. त्या दिवशी बऱ्याच विदर्भवादी नेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी अटक केली. त्यात वसंतराव साठे यांचाही समावेश होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातच सर्वांनी ही बातमी वाचली. शाळेत पोहोचल्यावर सर्वच मित्रांनी सुभाषकडे हे अटक झालेले तुझे वडीलच आहेत का अशी चौकशी केली. तेव्हा सुभाषने त्याला दूजोरा तर दिलाच, पण अशी राजकीय अटक ही वाईट नसते, तर अभिमानास्पद असते हे त्याच्याकडूनच आम्हाला त्या दिवशीच कळले. सुभाषचे वडील वसंतराव साठे कोणी सामान्य व्यक्ती नाहीत, तर एक मोठे राजे किया नेतेही आहेत हे त्या दिवशीच कळले.त्यामुळे बापूंविषयीचा आदर अधिकच दुणावला.
कालांतराने आम्ही सर्वच दहावी पास झालो. आणि हडस हायस्कूल मधून वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घ्यायला गेलो. सुरुवातीला हिस्लॉप कॉलेजमध्ये सुभाष आणि मी एक वर्ष सोबत होतो. नंतर मी कॉलेज बदलल्यामुळे संबंध कमी झाले. त्याच दरम्यान १९७२ मध्ये वसंतराव साठे अकोल्याहून खासदार म्हणून निवडून आले होते. एक मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जाऊ लागले होते. राजकीय वर्तुळात विशेषतः केंद्रात त्यांचा दबदबा बऱ्यापैकी वाढला होता.
शिक्षण आटोपल्यावर मी काही काळ वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. त्याच काळात मुंबई दूरदर्शन ला नागपूर आतून एक वृत्त छायाचित्रकार हवा आहे असे कळले. त्यामुळे मी प्रयत्न करत होतो. कोणीतरी सांगितले की वसंतराव साठे मदत करू शकतील. म्हणून मी त्यांना धंतोलीच्या घरी भेटायला गेलो. त्यांनी मला मदत करण्याचे कबूलही केले.
माझ्या प्रयत्नांना यश येऊन मी दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत झालो. नंतर ते काम नियमितपणे चालू होते.
१९८० साली केंद्रात सत्तांतर झाले. इंदिरा गांधी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान बनल्या. त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव साठे माहिती आणि प्रसारण मंत्री बनले. दूरदर्शन हे याच खात्याच्या अंतर्गत येत होते. त्यामुळे आता बापूंची माझा नियमित संपर्क येणार हे मला कळून चुकले होते.
बापू मंत्री झाल्यावर बरोबर एक महिन्याने ते वर्ध्यात आले. यावेळी बापू वर्धा मतदार संघातून विजयी झाले होते. त्यावेळी बापू येणार म्हणून मी दूरदर्शनला कळवले होते. त्या दिवशी सकाळी उशिरा मला टेलीग्रामने बापूंचा वर्धा दौरा कव्हर करण्याचा आदेश मिळाला. मी लगेचच महाराष्ट्र एक्सप्रेसने वर्धेला पोहोचलो. तेथून रिक्षाने पवनारला गेलो. तोवर बापूंचा ताफा विनोबा भावेंच्या आश्रमात पोहोचलाही होता. मला पोहोचायला उशिरच झाला होता. मात्र मी लगेचच बापू आणि विनोबांच्या भेटीचे शॉट्स घेतले आणि बाजूला उभा होतो. विनोबांना भेटून बापू बाहेर आले. त्यावेळी नागपूरच्या पत्रकारांनी त्यांना घेरले आणि विदर्भातील काही बातम्या संदर्भात उल्लेख केला. तेव्हा बापू म्हणाले की विदर्भात बातम्या कव्हर करायच्या तर मला मुंबई किंवा दिल्लीहून टीम पाठवावी लागेल. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अप्पासाहेब पाडळकर यांनी लगेचच बापूंना माझ्या संदर्भात माहिती दिली. तेव्हा बापू लगेच प्रश्न विचारते झाले की अविनाश पाठक इथे छायाचित्रकार आहे तर मग तो आज इथे आला का नाही? लगेचच अप्पा पाडळकरांनी सांगितले की आला आहे. मग मला अप्पांनी बापूंच्या समोर हजर केले. त्यांनी लगेचच माझी चौकशी केली. तेव्हा मी त्यांना जुन्या आठवणी दिल्या. मी तुमचा मुलगा सुभाषच्याच वर्गात शिकलो होतो, आणि तुमच्या घरीही बरेचदा आलो होतो याची आठवण दिल्यावर बापूंनाही खूप आनंद झाला. त्या दिवशीपासून बापूंचे माझ्यावर विशेष लक्ष राहीले. प्रत्येक दौऱ्यात मी त्यांच्या सोबत असावा यासाठी त्यांचा आग्रह असायचा. दरवेळी माझा मुक्काम कुठे राहणार, माझे जेवण झाले किंवा नाही, मी कोणत्या वाहनात आहे, याची बापू आवर्जून चौकशी करायचे. सर्किट हाऊस ला जेवायच्या वेळी मी दिसलो नाही तर आवर्जून बोलावून घ्यायचे. तेव्हापासूनच माझे आणि बापूंचे स्नेहबंध पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत झाले होते.
प्रत्येक दौऱ्यात मी चित्रीकरणासाठी सज्ज असलो की बरेचदा बापू मला बोलावून काही सूचनाही द्यायचे. त्या सूचना अनेकदा अत्यंत उपयुक्त असायच्या. मला आठवते नागपुरात आट्यापाट्यांचा राष्ट्रीय सामना होता. त्याच्या समारोपाला बापू प्रमुख अतिथी म्हणून आले होते. तिथे मी चित्रीकरण करत होतो. खेळाडूंची ओळख करून घेतल्यावर व्यासपीठावर जाता जाता मी ज्या ठिकाणी उभा होतो तिथे बापू चालत आले. मंत्री महोदय इकडे कुठे चालले म्हणून सगळेच आयोजक अस्वस्थ झाले होते. ते थेट माझ्याजवळ आले आणि मला सांगितले की हा खेळ आता हळूहळू नामशेष होतो आहे. त्यामुळे या खेळाचे पूर्ण चित्रीकरण तू कर. मी तुमच्या डायरेक्टरशी बोलतो आणि ते प्रक्षेपित करायला तर सांगतोच. पण जतनही करून ठेवायला सांगतो. जुन्या खेळांचे जतन व्हावे आणि त्याला योग्य प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांची धडपड तर दिसून आलीच पण मी कुठेही अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी आधीच मी डायरेक्टरशी बोलतो असे सांगून मला आश्वस्तही केले होते. एकदा असाच नागपुरात चिटणीस पार्कवर मुख्यमंत्री अंतुलेंचा बापूंच्या हस्ते सत्कार होता. मला पोहोचायला उशीर झाला होता. तरीही माझ्या विनंतीवरून बापूंनी अंतुलेंना पुन्हा एकदा शाल श्रीफळ अर्पण करून तो शॉट मला परत एकदा घेण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
माझ्या धडपडीबद्दल त्यांना कौतुकही होते. मला आठवते देशात दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रक्षेपण सुरू करणार म्हणून बापूंनी नागपुरात पत्रकारही परिषद घेऊन घोषणा केली होती. त्या पत्रपरिषदेचे चित्रीकरण मी करत होतोच. त्यावेळी नागपूर दूरदर्शन केंद्राचीही घोषणा त्यांनी केली. या पत्रपरिषदेत बापूंनी माझा आवर्जून कौतुकाने उल्लेख केला होता. नागपुरातून कार्यक्रम तयार करायला आपला नागपूरकर अविनाश पाठक आहे ना. त्यामुळे नागपूर विदर्भाला भरपूर प्रसिद्धी मिळेल असा विश्वास त्यांनी दिला होता.
दरम्यान बापूंचे खाते बदलले. आधी रसायन व उर्वरक नंतर ऊर्जा खाते असा त्यांचा प्रवास सुरू राहिला. मात्र प्रत्येक दौऱ्यात ते मला बोलावून घ्यायचे. जोवर मी दूरदर्शनसाठी कार्यरत होतो तोवर बापू प्रत्येक वेळा मला बोलावून घेत होते.
१९८४ मध्ये दूरदर्शनच्या विस्तारीकरणात खाजगी निर्माते उभे करायचे म्हणून भारत सरकारने एक योजना आखून देशभरातून १०० खाजगी निर्मात्यांची निवड करून त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरवले होते. ही योजना जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आधी नागपुरात एका पत्र परिषदेत बापूंनी याबाबत सुतोवाच केले होते. त्यावेळी त्यांनी तिथे हे देखील जाहीर केले की आपल्या सर्वांचा मित्र अविनाश पाठक याने देखील याबाबत प्रयत्न करावे. मी माझ्याकडून त्याला पूर्ण मदत करीन. दिल्या शब्दाप्रमाणे बापूंनी मला पूर्ण मदत केली. मात्र माझे नशीब खडतर. त्यामुळे या नव्या योजनेला त्यावेळी देशातील वित्त संस्था, बँका आणि समाज हे समजूनच घेऊ शकले नाहीत. परिणामी नागपूरमध्ये असा खाजगी निर्माता कामच करू शकणार नाही असा सर्वांनी समज करून घेत माझा तो प्रकल्प भांड्या बसतात ठेवावा लागला. या प्रकारात मला चांगलाच आर्थिक फटका बसला होता. माझे काही निकटवर्ती याबाबत बापूंना दोष देत होते. मात्र मी कधीच त्यांना दोष दिला नाही. उलट पक्षी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मी धडपड करत असताना मला हात कसा देता येईल हाच प्रयत्न केला. ही धडपड सुरू असताना अनेकदा दिल्लीला जाऊन मी त्यांना त्यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील बंगल्यावर भेटत असे. दरवेळी त्यांनी मला सहकार्याचा हातच दिला.

१९९६ नंतर बापू सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. मात्र एक राजकीय विचारवंत म्हणून त्यांची वाटचाल सुरू होतीच. दरम्यान त्यांच्या पत्नी जयश्री काकू यांचे निधन झाले. त्यामुळे काही काळ ते अस्वस्थही झाले होते. मात्र त्यातून सावरून त्यांनी पुन्हा स्वतःला सक्रिय करून घेतले.
याच दरम्यान मी पूर्णवेळ पत्रकारितेत आलो होतो. बापू नागपूरला आले की त्यांची आवर्जून भेट घ्यायचो. दरवेळी बापू काही बातमी आहे का असे विचारले की ते दिल्लीच्या राजकारणातला काही ना काही निचोड मला सांगायचे. मग धंतोलीतल्या त्यांच्या घरी आमच्या गप्पा रंगायच्या.
दरवेळी भेटले की ते आवर्जून घरच्या सर्वांची चौकशीही करायचे. प्रसंगी काही सूचनाही द्यायचे. मला आठवते एकदा नागपूरला त्यांचा जावई डॉ. उदय बोधनकरच्या वाढदिवसाच्या दिवशी बापू नागपुरात होते. त्या दिवशी मी भेटायला गेलो होतो. सोबत माझी लहान मुलगी दिव्येशा ही देखील होती. तिला बघताच बापूंनी प्रेमाने तिला जवळ घेतले आणि तिची चौकशी केली. तुझा हा बाबा तुला काही त्रास देत असेल तर मला सांग, मी त्याला रागवतो असेही बापूंनी तिला ठणकावले. मग कार घेण्याचा विषय निघाला तेव्हा दिव्येशाला त्यांनी सांगितले की बाबांना कार घ्यायला लावायचीच आणि ती मारुतीच घ्यायची. नाही घेतली तर मला सांग. अल्पावधीत त्यांनी दिव्येशाच्या मनात घर केले होते.
त्या काळात दरवर्षी मी रामटेकच्या गडावरून या नावाने एक मराठी दिवाळी अंक प्रकाशित करीत असे. त्या दिवाळी अंकात एका वर्षी मी मलमली तारुण्य माझे या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद घेतला होता. त्यासाठी बापूंचा मला लेख हवा होता. मी त्यांना फोन करत होतो, तेव्हा त्यांनी त्यांची अडचण सांगितली. आजकाल वयापरत्वे मला लिहायला त्रास होतो. आणि दिल्लीत मला मराठी स्टेनोग्राफर मिळत नाही. त्यामुळे तुला लेख द्यायला उशीर होतो आहे. त्यांना मी सांगितले की पुढच्याच आठवड्यात मी दिल्लीला येतो आहे. त्यावेळी मी दोन-तीन तास वेळ काढून तुमच्या घरी येतो. तुम्ही मला डिक्टेशन द्या. बापू लगेच तयार झाले.
ठरल्याप्रमाणे मी बापूंच्या गुडगावच्या घरी पोहोचलो. सकाळचे ११ वाजत होते. बापू तयारच होते. मलमली तारुण्य माझे या विषयावर त्यांनी तारुण्यातल्या अनेक आठवणी सांगितल्या. ते सांगत होते आणि मी लिहीत होतो. मध्येच ते थांबवून त्यातले काही अजून संदर्भ सांगायचे. मात्र हे लिहू नकोस असेही ते सांगायचे. अशी दोन तास आमची मैफिल रंगली होती. सर्व आटोपले तेव्हा दुपारचा एक वाजत होता. मग बापू म्हणाले, आता आपण जेवूया. त्यानुसार ते आणि मी त्यांच्या घरी एकत्र जेवलोही होतो. तिथेही आमच्या गप्पा रंगल्या होत्या.
बापू देशाच्या राजकारणातले एक मोठे नाव होते. नऊ वर्ष ते केंद्रात मंत्री राहिले होते, तर तीन वर्ष ते इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेचे अध्यक्षही राहिले होते. तिथेही त्यांना कॅबिनेट दर्जा होता. मात्र त्यांच्या डोक्यात कधीच हवा गेली नाही. ते कायम सर्वांशी नम्रच राहिले. जुन्या मित्रमंडळींशी अखेरपर्यंत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. नागपुरात आल्यावर जुनी मित्रमंडळी यायची, तेव्हा त्यांची गप्पांची मैफिल रंगायची. इतकेच काय पण त्यांच्या तुलनेत तरुण असलेल्या आम्हा सर्वांशी देखील ते तितक्याच मैत्रीने बोलायचे. मला आठवते एकदा माझ्याच एका अंकासाठी वेगळा विदर्भ या मुद्द्यावर बापूंचा मला लेख हवा होता. त्यांनी नागपूरच्या घरी एक दिवस मला संध्याकाळी बोलावले. वरच्या मजल्यावर त्यांच्या कक्षात ते मला घेऊन गेले. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मित्र अरुण फणशीकर हा देखील होता. सुमारे तीन तास बापूंनी महाराष्ट्रात विदर्भाला सहभागी करून घेताना १९६० पूर्वी काय काय घडामोडी घडल्या याची इत्यंभूत माहिती आम्हाला दिली होती. तीन तास आमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यांनी आमचे अनुभवविश्व त्या दिवशी अधिकच समृद्ध केले होते .बापूंसोबतची प्रत्येक भेट ही अशी अनुभवविश्व समृद्ध करणारीच असायची.
माझ्या आठवणीनुसार माझी बापूंची भेट २०१० मध्ये नागपुरात झाली होती. त्यावेळी त्यांचा नातू निखिल बोधनकरच्या लग्नासाठी ते नागपुरात आले होते. तेव्हा बरेच दिवस ते थांबले होते. त्यांनी एक दिवस आम्हा सर्व पत्रकारांना जेवणासाठी ही निमंत्रित केले होते. नंतर घरीही त्यांना भेटलो होतो. ती त्यांची माझी शेवटचीच भेट ठरली. नंतर ते नागपुरात आलेच नाहीत आणि मी देखील दिल्लीत गेलो नाही. २३ सप्टेंबर २०११ला टीव्हीवर बातम्या बघत असतानाच अचानक बापू गेल्याचीच बातमी आली. आम्हा सर्वांना तो धक्काच होता. मी लगेचच त्यांच्याकडे फोन केला आणि बातमी खरी आहे हे निश्चित केले. लगेचच दुसऱ्या दिवशी मी दोन-तीन ठिकाणी त्यांच्यावर लेखही पाठवला होता. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपलेच नव्हे तर नागपूरचेही नाव देशात मोठे केले होते. सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे नागपूरचे राष्ट्रीय स्तरावर गाजणारे जे दोन नेते आहेत. त्यापैकी एक कै. वसंत पुरुषोत्तम उपाख्य साहेब साठे हे होते.
अशा आपल्या कर्तृत्वाने देशाच्या राजकीय क्षितिजावर अढळ स्थान मिळवणा-या कतृत्ववान आणि त्याचसोबत कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाची आज ५ मार्च २०२५ रोजी जन्मशताब्दी आहे. कै. बापूंच्या पुण्यपावन स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.

— लेखन : अविनाश पाठक. जेष्ठ पत्रकार, नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800