Sunday, March 23, 2025
Homeलेखआठवणीतील 'रावबा'

आठवणीतील ‘रावबा’

थोर ग्रामीण कथा, कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कॉलेज जीवनापासून मित्र असलेले प्राचार्य सूर्यकांत वैद्य यांनी जागविलेल्या त्यांच्या या काही आठवणी… बोराडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– संपादक

१९५९ मधे मी बी. ए. ची परीक्षा संपताच पुण्याहून उस्मानाबाद येथील ‘भारत विद्यालय’ या प्रशालेत अध्यापक म्हणून रुजू झालो. १९५५ पासून मी कवितालेखन करत असल्याने उस्मानाबादला ‘समानशील’ कवि मित्रांचे मंडळ जमविले होते, मराठवाडा विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाचा सचिव म्हणूनही काम सांभाळू लागलो होतो. या तीनही संस्थांच्या माध्यमातून व्याख्याने, कविसंमेलनाचे कार्यक्रम आयोजित करत होतो. एकदा सोलापूरचे कवि कुंजविहारी (सलगल कर) आणि दयानंद महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक, विख्यात कवी प्रा. डॉ. वि.म.कुलकर्णी यांचा कार्यक्रम आयोजिला होता. त्यावेळी त्यांच्याच कॉलेजमधे पहिल्या वर्षास प्रविष्ट झालेला साहित्यप्रेम असलेला व नव्यानेच कथालेखन करणारा त्यांचा विद्यार्थी रा. रं. बोराडे हाही त्यांच्याबरोबर आलेला होता. या कार्यक्रमात त्यानेही आपली एक कथा- ‘हुरडा’ सादर करून श्रोत्यांची मने जिंकली होती. माझ्याच खोलीत दोन दिवसांच्या मुक्कामात त्याने मला त्याच्या अनेक कथा ऐकविल्या, माझ्या कविताही ऐकल्या. त्यामुळे दोघेही मराठवाड्यातले असल्याने नाळ सहज जोडली गेली. आम्ही घट्ट मित्र झालो. मैत्रीच्या नात्याने मी त्याला ‘रावबा’ असेच संबोधू लागलो. त्याच्या प्रेरणेने मीही कथा लिहू लागलो. सुदैवाने त्याचवर्षी तिथे ‘बालाघाट’ नावाचे साप्ताहिक लातूरच्या चंद्रशेखर बाजपेयी यांनी सुरू केले होते. त्यात प्रत्येक आठवड्यास माझी एक कथा प्रसिद्ध होऊ लागली. १९६५ पर्यंत लिहिलेल्या कथांचा ‘बनाची वाट’ हा कथासंग्रह वाईच्या प्राज्ञप्रेसमधे छापून प्रसिद्ध झाला. त्याचे बोराडेने मोठे कौतुक केले पण मला तेवढी बैठक नसल्याने त्यानंतर कथालेखन मी थांबविले. तेव्हा मैत्रीच्या अधिकाराने खरमरीत पत्र लिहून रावबाने मला चांगलेच झापले ते अजून स्मरणात आहे.

उस्मानाबादहून ६१- ६२ मधे मी एम्. ए. ची परीक्षा देण्यासाठी पुण्यास आलो. पानशेत होण्यापूर्वी स. प. महाविद्यालयाजवळ बादशाहीच्या बोळात’ वसंतविहार’ या वाड्यात एक खोली मिळाली होती. एके दिवशी अगदी सकाळी सकाळी दार टकटकले. उघडून पाहतो तर रावबा दारात ! मला आश्चर्य वाटले.
“अरे, तू इकडे कसा ?”
“मला माझा एक कथासंग्रह काढायचाय, त्याचे बाड कोन्टिनेंटलकडे द्यायचेय. तू माझ्याबरोबर यावेस अशी इच्छा”
कॉन्टिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी यांचा माझा परिचय होताच. मी तयार झालो.

सकाळी १० वाजता दोघेही टिळकरोडवरील त्यांच्या कार्यालयात गेलो. प्रास्ताविक केले, “हे माझे मित्र नवोदित ग्रामीण कथाकार श्री. रा.रं.बोराडे. त्यांना त्यांचा कथासंग्रह तुम्ही काढावा अशी इच्छा आहे”. त्यांनी कथांचे बाड घेतले, चाळले आणि लगेच स्वीकारलेही. हा बोराडेंचा पहिला कथासंग्रह “पेरणी”. तो १९६२ मध्ये प्रसिद्ध झाला आणि गाजलाही.

१९६९-७० या काळात मी परळी येथील तर बोराडे परभणीच्या महाविद्यालयात मराठी विषय शिकवीत होतो. त्या वर्षी मी माझ्या महाविद्यालयात कविवर्य वसंत बापट यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास धरून त्यांनी परभणी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे निमंत्रण स्वीकारले आणि ‘तेथून मला नेण्याची व्यवस्था करा’ असे सुचविले. मला आनंद झाला. आता रावबाची भेट होईल आणि निवांत गप्पा छेडता येतील म्हणून मी आधल्या दिवशी रात्रीच तिथे पोचलो. रावबाला मी भेटल्याचा आनंद झाला खरा पण तो कुठल्यातरी दडपणात वा चिंतेत असल्याचे जाणवले. त्यानेही त्याची व्यथा बोलून दाखविली. त्याची ‘पाचोळा’ ही कादंबरी मौज प्रकाशनाने स्वीकारली होती, परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यात बदल करून हवे होते. चार वेळा बदल करूनही प्रकाशकाच्या पसंतीस ती उतरत नव्हती. तो म्हणाला, “या पुनर्लेखनाने मी कंटाळून गेलोय. हा शेवटचा प्रयत्न. तो पसंतीस उतरला नाही तर मी आख्खी कादंबरी फाडून टाकणार आहे.” त्याचा वैताग मी समजू शकलो. मलाही त्याच्या लेखनाचे कुतूहल होतेच. “आपण आज रात्री ती वाचून काढू” मी म्हणालो आणि दोघांनी रात्र जागून काढली.

रा. रं. बोराडे (रावबा)

मराठवाड्यातील व्यक्ती आणि संस्कृतीचे किती वास्तव चित्र त्याने रेखाटले होते ! मी फारच प्रभावित झालो होतो. “पाचोळा” या कांदबरीच्या अभिवाचनाचा मी पहिला श्रोता ठरलो होतो. “पाचोळा” ही मराठी ग्रामीण कादंबरीतील मैलाचा दगड ठरली. प्रकाशकाने आणखी अपेक्षा केल्या असत्या तर एका अजर, अमर कलाकृतीला महाराष्ट्र रसिक मुकला असता.

माझ्या महाविद्यालयातील पदव्युत्तर वर्गास मी लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन्ही विषयांचे अभ्यासक्रम सुरू केले तेव्हा पाचोळ्याच्या निर्मितीची ही कथा मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असे.

आमची प्रत्यक्ष भेट फार कमी वेळा झाली, पण पत्रभेटीने मात्र कायम संपर्कात होतो. मी शिरूर येथे ७० साली रसिक साहित्य मंडळ या नावाने एक साहित्यचळवळ सुरू केली तेव्हा पहिले प्रोत्साहनाचे व शाबासकीचे पत्र आले ते रावबाचे होते.

माझ्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मिळताच ‘आपण नक्की येतोय’ असे त्याने नुसते कळविले नाही तर तो पुण्यास आलाही. त्याच दिवशी नेमके पुणे बंद होते तरी मुलाच्या डोईवर अक्षता टाकण्याचा मुहूर्त त्याने गाठला याचा मला अतीव आनंद झाला.
‘स्थळकाळचे कितिही अंतर
असले तरिही ओढ न आटे’
हे खऱ्या मैत्रीचे दर्शन त्याने घडविले. असे मैत्र भाग्यानेच लाभते.

रावबा

मी बी. ए. झालो तेव्हा तो दयानंद महाविद्यालयात प्रविष्ट झाला होता. म्हणजे माझ्याहून तीनेक वर्षांनी लहान. पण मैत्रीत वय आड आले नाही. ऐंशीनंतरचे वय तसे बेभरवशाचेच. आज आहे, उद्या नाही. माझा मित्रपरिवार याच वयोगटातला. त्यातील कोणी अधूनमधून सोडून गेल्याच्या वार्ता कळतात. दोनतीन दिवसांपूर्वी अपरात्री मला माझ्या भावाचा- शरदचा फोन आला आणि तो म्हणाला, “अरे, आपले ‘पाचोळा’कार बोराडे गेले !” धक्का बसला. मन व्याकुळ झाले, साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. ‘सुखदुःखं समे कृत्वा’ असे स्थितप्रज्ञत्व ज्या वयात येते असे आपण म्हणतो त्या वयातही जिवलगांची निवृत्ती दुःखाचा कढ ओतून जाते आणि स्थितप्रज्ञत्व हे केवळ आध्यात्मिक पातळीवर च अनुभवता येते असे वाटू लागते. जन्मतो त्याला मृत्यू असतोच.
‘जायचे सर्वांस आहे
कोण शाश्वत राहतो ?
मित्र गेले त्याच वाटे
मी मुकाट्या चालतो’
हे मुकेपणाने चालणेही डबडबल्या नेत्रांनी चालणे असते. शिवण उसवावी तितक्या सहजतेने गुंफलेले नातेबंध तुटत नाहीत. आठवणींचे रक्त त्यांतून अनेक दिवस ठिबकत राहते. मराठी साहित्यक्षेत्रातील एक मानदंड हरपला. त्याला भावपूर्ण श्रध्दांजली !!

प्राचार्य सूर्यकांत द वैद्य.

— लेखन : प्राचार्य सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments