आपणा सर्वांना सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा माहिती असेलच. महाभारताच्या वन पर्वात आढळणाऱ्या या कथेत राजकुमारी सावित्री ही एका अल्पायुषी, निर्वासित राजकुमाराशी म्हणजेच सत्यवानाशी लग्न करते आणि त्याचे जेव्हा खरंच प्राण हरण होते, तेव्हा ती यमराजाला साकडे घालून सत्यवानाचे प्राण वाचवतो. तेव्हा पासून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून आज ही विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात, हे आपण पहातोच.
पण माझ्या पाहण्यात मात्र असा एक आधुनिक सत्यवान आला, जो पत्नीचे प्राण हरण होऊ नये म्हणून तब्बल एक तप म्हणजे १२ वर्षे पत्नीची मनोभावे, अहोरात्र सेवा करीत राहिला, आधुनिक वैद्यक शास्त्राला साकडे घालीत राहिला की, काहीही झाले तरी त्याच्या पत्नीचे प्राण जाता कामा नये. पुराणातील सावित्री जिंकते पण हा आधुनिक सत्यवान आणि त्याच्या बरोबरच आधुनिक वैद्यक शास्त्र मात्र हरते आणि या कथेचा दुःखांत होतो.

असे हे आधुनिक सत्यवान आहेत, ठाणे येथील सुभाष खाकाळ. दूरदर्शनपासूनचे माझे मित्र असलेले राम खाकाळ यांचे धाकटे भाऊ. १९६५/६६ च्या सुमारास या बंधूंचे वडील भगीरथ हे दुष्काळामुळे शेती पिकेना म्हणून नगर जिल्ह्यातील खरवंडी हे मूळ गाव सोडून डोंबिवली येथे आले आणि त्यांनी ठेकेदारी, त्याला जोडधंदा म्हणून घरोघरी दूध टाकण्याचा व्यवसाय सुरू केला. पत्नी, राम आणि सुभाष ही मुले ते सोबत घेऊन आले तर तिसरा मुलगा, शेती पाहण्यासाठी गावीच ठेवला.
हळू हळू भगीरथ शेठ यांची परिस्थिती सुधारत गेली. राम यांना दूरदर्शन मध्ये चांगली नोकरी मिळाली. त्यांचे लग्न, मुलेबाळे झाली. सुभाष यांनी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृहात राहून एस पी कॉलेजमधून बी एससी ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर १९७८ ते १९९० अशी बारा वर्षे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी केली. ते नुसतीच नोकरी करीत राहिले नाही तर त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसायाचा खोलवर अभ्यास केला आणि त्याच्या आधारे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जून १९९० पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दिवसरात्र कष्ट केल्याने, मोठमोठी व्यावसायिक धाडसे केल्याने आणि सुदैवाने त्यांचा हा व्यवसाय चांगलाच भरभराटीस येत गेला. दरम्यान त्यांचे लग्न झाले, एक मुलगा झाला. असा व्यवसाय आणि संसार सुंदररित्या, सुरळीतपणे चालू असतानाच त्यांच्यावरच नव्हे तर पूर्ण खाकाळ परिवारावर दुर्दैवाचा मोठा आघात झाला.

सुभाष यांची पत्नी सौ अनुराधा यांना २७ जानेवारी २०१४ रोजी मल्टिपल स्त्रोक्स आले. त्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे हरपली आणि २४ तास त्यांना अंथरुणावर खिळून राहावे लागू लागले. खरं म्हणजे सुभाष यांची आर्थिक परिस्थिती पाहता, अशा अवस्थेतील पत्नीला ते कुठल्याही भारी शुश्रुषा गृहात ठेवू शकले असते आणि त्यांनी तसे केले असते तरी ते साहजिकच आहे असे समजून त्यांना कुणी नावे ठेवली नसती किंवा काही दुषणेही दिली नसती, कारण अनुराधा वहिनींची अशी अचेतन अवस्था किती दिवस, आठवडे, महिने, वर्षे राहील हे कुणीच सांगू शकत नव्हते. पण अशा या कसोटीच्या क्षणी सुभाष यांनी एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे पत्नीला कोणत्याही शुश्रुषा गृहात न ठेवता घरीच त्यांची सर्व देखभाल करण्याचा. हा निर्णय त्यांनी आणि पूर्ण परिवाराने जवळपास १२ वर्षे निर्धाराने, प्रेमाने, मायेने पाळला. पण शेवटी ६ डिसेंबर २०२४ रोजी
अनुराधा वहिनी सर्वांना कायमच्या सोडून गेल्या.

त्या दिवशी खाकाळ बंधूंच्या नव्वदीच्या घरातील माऊलीचा आक्रोश, माझेच काय सर्वांची हृदये चिरत होता. आपली सून नव्हे तर पोटची लेक गेली, असे समजून आक्रोश करीत होती. अरे देवा, मला न नेता तू हिला का नेले ? या त्यांच्या प्रश्नाला कुणाजवळच उत्तर नव्हते. सर्वच जण मुकाटपणे अश्रू ढाळत होते.
तसे तर मी कधी ठाण्यात गेलो की त्यांची भेट घेत आलो आहे. अनुराधा वहिनींना ही पहात आलो आहे. पण तसे पाहताना आणि असे पाहताना चा फरक वेगळाच होता. मनातल्या मनात मी कल्पना करीत होतो की, तब्बल १२ वर्षे या माऊलीने कशी काढली असतील ? नवे घर घेतले, मुलाचे लग्न झाले, त्याला ही मुलगा झाला, दसरा, दिवाळी असे कित्येक आनंदाचे क्षण अनुराधा वहिनींना कधी पाहताच आले नाही, कधी अनुभवताच आले नाही. घरात हे सर्व काही चालू असताना त्यांचे भाव विश्व काय बरे राहिले असेल ?

त्यांच्या दिमतीला २४ तास ठेवलेल्या परिचारिकांशी तरी त्या कधी संवाद साधू शकल्या असतील का ? दिवस आहे की रात्र, साधा दिवस आहे की सणाचा दिवस आहे, घरी कोण आले, गेले, पावसाळा आहे की उन्हाळा असे काही काही त्यांच्या लेखी नसेल. आपण हे जग सोडून जात आहोत, हे तरी त्यांना कळले असेल का ? या जगात देव खरंच आहे का ? असेल तर असे का घडत राहते ? एकेका विचाराने मी विषण्ण होत गेलो आणि तेव्हढ्यात लक्षात आले, अरे आपण तर नुसता दुरूनच विचार करून भांबावल्या चाललो आहोत पण सुभाष आणि त्यांच्या परिवाराने देखील ही १२ वर्षे आणि त्यातील क्षणनक्षण कसा काढला असेल ? या बारा वर्षात एखादा तरी क्षण ते आनंदाने घालवू शकले असतील का ? अशा विचारातच मी अनुराधा वहिनींच्याच पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांनाच नव्हे तर पूर्ण खाकाळ परिवारास, विशेषत: आधुनिक सत्यवान असलेल्या सुभाष यांनाही मनोमन नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800