आपल्याला खरा आनंद कशात मिळतो याचा शोध घेऊन आनंद मिळवा. पण आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या आनंदाचे व्यसनात रूपांतर होणार नाही, यासाठी जीवनात समतोल साधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले.
नवी मुंबईतील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांचे “आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, एखाद्याला एखाद्या व्यसनातून आनंद मिळतो म्हणून जर ती व्यक्ती २४ तास, ३६५ दिवस तेच व्यसन करीत राहिली तर ते योग्य नाही. आपल्या आरोग्याचा, घरच्यांचाही त्याने विचार केला पाहिजे. इंग्लंडमध्ये ७ वर्षे आणि भारतात ३ वर्षे संशोधन करून मधुमेह तज्ञ डॉ विनायक हिंगणे यांनी असे सिद्ध केले आहे की, शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे हे देखील एक व्यसन आहे.त्यामुळे आपल्या शरीराला गरज आहे तेवढाच आहार घ्यावा. त्यापेक्षा जास्त आहार घेऊ नये. तसेच योग्य आहाराबरोबर झेपेल तसा व्यायाम, चालणे, योगा, ध्यानधारणा, पुरेशी विश्रांती, निकोप नाते संबंध, छंद याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या वाट्याला दुःख येऊ देऊ नये, हे देखील आनंदी जीवनासाठी आवश्यक असल्याने अधिक मोबदला देण्याच्या फसव्या योजना तसेच इतर प्रकारची आमिषे याला बळी पडू नये. आपली आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक, भौतिक प्रगती प्रचंड होत चालली आहे परंतु दुर्दैवाने आपली सामाजिक, भावनिक व मानसिक प्रगती अद्याप झालेली नाही. सत्ता संपत्ती आहे, परंतु मानसिक शांतता नाही. नातेसंबंध बिघडत चाललेले आहेत. समाजात काय घडते, आपण कुठे चाललो, या सर्व घटना अस्वस्थ करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण समतोल राखणं गरजेचे आहे.

नोकरी, व्यवसाय करीत असतानाचे आयुष्य आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य याचा विचार केला तर, आपल्या लक्षात येईल की पूर्वी आपण कामात आणि अन्य प्रकारच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त रहात असल्याने वेळ कसा जाई हे कळतही नसे. पण निवृत्तीनंतर रिकाम्या वेळेचे काय करायचे ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काही छंद असल्यास ते जोपासणे, नसल्यास काही छंद निर्माण करणे, सामाजिक कार्यात भाग घेणे, अशा पद्धतीने आपला वेळ कारणी लावून सकारात्मक मानसिकता ठेवावी. तंत्रज्ञान बदलत चाललेले असून मोबाईल हा आपला मित्रही आहे आणि शत्रूही आहे. त्यामुळे त्याचा आपण कसा वापर करायचा हे ठरवले पाहिजे. मन मोकळं करण्यासाठी खास मित्र असावेत, त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. आपल्याजवळ जी काय संपत्ती आहे, त्यामध्ये समाधान माना. अधिक संपत्ती मिळवण्याच्या पाठीमागे लागू नका. भारतात नवी मुंबई सायबर क्राईममध्ये एक नंबरवर आहे. समाजामध्ये वागत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख वाटण्याने कमी होते, परंतु आनंद वाटण्याने वाढत जातो. नेहमी दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच भरपूर आनंद मिळेल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी प्रमुख वक्ते देवेंद्र भुजबळ यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव शरद पाटील यांनी केले तर आभार संघाचे पदाधिकारी बळवंतराव पाटील यांनी मानले.
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, खजिनदार विष्णूदास मुखेकर, सहखजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्ष डॉ. विजया गोसावी, श्रीमती शहा, इतर मान्यवर आणि ज्येष्ठ पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— लेखन : मारुती विश्वासराव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
_*आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.*_
_जसे आमचे देवेंन्द्रजी भुजबळ
🙏विजय होकर्णे
खूप छान सर. भुजबळ सरांनी आनंदाचा खरा अर्थ समजाऊन सांगितला. स्वतः आनंद घेताना दुसर्याला त्रास होणार नाही हे अगदी योग्य सांगितले👌👌👌👌.