निजा फाजली यांचा एक दोहा आहे…..
“बच्चा बोला देखकर
मस्जिद आलीशान
अल्ला तेरे एक को,
इतना बडा मकान “
या दोह्याचा श्री. सदानंद डबीर यांनी केलेला भावानुवाद असा…
“पोर बोलले पाहून,
मशीद आलीशान
अल्ला एकट्या तुलाच,
घर केवढे महान”
निदा फाजली यांनी त्यांच्या दोह्यात मस्जिद हे अल्लाचे एकट्याचे व आलिशान घर आहे असं म्हटलं आहे. आपणही मंदिर हे आपल्या देवाचं घर आहे असं म्हणतोच. माझ्या मनात विचार आला की आपण, आपल्या भारतीय, हिंदू संस्कृतीमध्ये परमेश्वर हा सर्वव्यापी आहे, प्रत्येक अणुरेणूमध्ये, चराचरात परमेश्वर आहे असं मानतो. मग एवढ्या सर्वव्यापी परमेश्वराला फक्त “मंदिर” हेच इतकं छोटंसं घर असून कसं चालेल? एवढ्या सर्वव्यापी परमेश्वराचे “अंतराळ” हेच घर असू शकेल आणि एकदा घर म्हटलं की त्या घराला आत जायला व बाहेर पडायला दार असायलाच हवे. अंतराळातून आपण पृथ्वीवर जन्म घेतो आणि सर्व कर्तव्ये, कर्मे, जबाबदारी पार पडली की मृत्यूच्या द्वारे परत आपण आपल्या अंतराळातील घरामध्ये जातो. अंतराळातून पृथ्वीवर यायला जन्म हेच एक दार आहे आणि जन्म संपला की मृत्यूच्या दारातून परत अंतराळात विलीन होतो.
अशी जन्म आणि मृत्यू हि या “अंतराळाच्या” घराची दारे आहेत. आणि या सगळ्या विचारातून “ओढ” हा अभंग माझ्या हातून लिहिला गेला. तो तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते.
“ओढ”
सर्व अंतराळ
देवा तुझे घर
एकच ते दार
“जन्म-मृत्यु” ||१||
मालक घराचा
असे तू एकला
निवारा आम्हाला
तूच देशी ||२||
लोभ मोह माया
सुटेना आम्हाला
करी सर्वकाला
येरझारा ||३||
चिरंतन स्थान
नसे सर्वजना
संत महंतांना
मोक्ष देशी ||४||
वंदिते चरण
सुटो कर्म-काम
मुखी राहो नाम
अखंडित ||५||
लागली मनासी
ओढ तुझी फार
उघड रे दार
झडकरी ||६|l

— रचना : लीना फाटक. वाॅरिंग्टन यु.के.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

खूप सुंदर विवरण आणि त्यावरील “ओढ” हा अभंग!
धन्यवाद लीनाताई, अशाच रचनांमुळे देव ह्या संकल्पनेत मन प्रसन्न होते 🙏
खुप खुप मनापासुन व मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे व इतर सर्वांचेच प्रतिसाद मनाला स्पर्शून गेलेत. त्यामुळेच लिहायला छान वाटते. हुरूप येतो. मनापासुन आभार. लिना फाटक
The starting line of abhang is so creative,wonderfully imagined.,& abhang as per its subject,aashay,is compactly small,so becomes memorable….well composed der,kaku..
मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद मिना. तुझे अभिप्राय नेहमीच छान असतात. अशावेळेस मला ति. अण्णा व सौ. शोभावहिनींची खुप आठवण येते. त्यांची उणीव जाणवते. परत एकदा धन्यवाद. लीना काकू