नमस्कार वाचक हो.
शिकेकाई बरोबरच मी परसात रिठ्याच्या पण बिया लावल्या होत्या. तेव्हा शिकेकाईच्या रुजून आल्या पण रिठ्याच्या नाहीत.
साधारण दोन महिन्यानंतर मेनकापडाच्या डब्यात लावलेल्या बिया काढून पाहिल्या तर त्या तशाच होत्या. परत त्यांना जमिनीत लावल्या. पण यश फार लांब होते. निसर्गच तो. आपल्याला सहज कसा उमगेल ? अलौकिक निर्माता जो संयम म्हणजे काय हे सहज सांगून जातो. तो आपल्याला भरभरून देत असतो. कोणतीही अपेक्षा न करता मग आपण का अपेक्षा करावी ? पण कसलीही अपेक्षा न करता प्रयत्न करत राहिले तर यश मिळतेच.
अधून मधून दुसऱ्या कुंडीत वगैरे भरायला जेव्हा तिथली माती काढायचे तेव्हा तिथे त्या बिया खुणवायच्या. तेव्हा परत तिथेच त्यांना दडपून ठेवायचे. बरेच दिवस वाट पाहूनही रिठ्याच्या त्या बिया काही रुजल्या नाहीत.
त्याच्या नंतर पुन्हा काही दिवसांनी हा प्रयोग करायचे ठरवले. सप्टेंबरमध्ये पुन्हा रिठ्याच्या बिया लावायचा प्रयत्न केला. यावेळी पण साधारण दोन महिने वाट पाहिल्यावर बिया लावलेल्या कुंडीत एके दिवशी अचानक हालचाल दिसून आली.
सकाळसकाळीच एक छोटासा नाजुक कोंब हळूच खुणावत होता आणि तो रिठ्याचाच कोंब होता. आजचे शास्त्र असल्याप्रमाणे त्याला लगेच भ्रमणध्वनीत छायाचित्र रूपात कोरून ठेवले.
याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरे बीज रुजून आले. बी चे कठीण कवच दोन्ही बाजूला दोन भाग होऊन पडले होते आणि त्यामधून एक इटुकला पिटुकला कोंब कौतुकाने आश्चर्याने नवीन विश्व पाहत उभा होता. नियमानुसार यालाही लगेच भ्रमणध्वनीत कैद करून ठेवले. पाच ते सहा बियांपैकी दोनच बिया रुजल्या तरीही समाधान काय असते ते समजले.
आता दोन्ही रोपांना एका नवीन घरात (कुंडीत) स्थलांतरीत केले आहे. मजेने ते एकत्र वाढत आहेत. त्यांची अजून जरा वाढ झाल्यावर ती वेगळी होतील तरीही बहरत राहतील.
एखादी गोष्ट करण्याची जर इच्छा असेल तर प्रयत्न करून नक्की गोष्टी साध्य करता येतात, निर्माण करता येतात. अशावेळी जी आंतरिक खुशी असते ती शब्दातीत असते. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकवतो, वेगळा अनुभव देतो तोच असतो “आनंद नवनिर्मितीचा”.
— लेखन : सौ.मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान लेखन केलय मनिषाजी पाटील यांनी त्यांच अभिनंदन. रोपांचे फोटोतर नजर लागावी असे देखणे आहेत. खूप गोंडस शुभेच्छा त्यांना
व्वा खुपच मस्त वृक्ष वल्ली आम्हा सोयरे 👌