आज, ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन आहे. यानिमित्ताने काही अनुभवाचे बोल सांगताहेत आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ.
आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो, या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक असं ते विविधांगी असतं. आपल्याला तसं ते जीवनभर लाभलं पाहिजेच. “आपलं आरोग्य, आपल्या हाती” असं सांगतायत आपल्या पोर्टलच्या निर्मात्या सौ अलका भुजबळ…….
आरोग्याविषयी जागरूक असल्याने माझ्या कर्करोगाचे निदान व उपचार त्वरित होऊ शकले. पतीने, मुलगी देवश्रीने खूप धीराने परिस्थिती हाताळली. मलाही धीर देत राहिले.

माझ्या कर्करोग लढ्यात डॉ. रेखा डावर खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. ६ वर्षांपूर्वी, महिला दिनी मी घरी एकटीच होते. प्रचंड एकटेपण वाटत होत आणि देवदूताप्रमाणें त्या माझ्या घरी आल्या. ते मोलाचे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आदर्श डॉक्टर अश्या असाव्या याचं मुर्तीमंत उदाहरण आहेत.

आयुष्यात मी कधीच आजारी पडले नव्हते. गर्भारपणात घ्यावी लागतात, ती तीन इंजेक्शन तेव्हढीच घेतली होती. बाहेरचं खाणं मला कधीच आवडायचं नाही. कितीही मोठया पार्टीला, कितीही मोठया ठिकाणी गेलो, आम्ही रात्री उशिरा घरी आलो तरी मी खिचडी का होईना, ती बनवून खात असे.
मी व्हॉलीबॉल भरपूर खेळायचे. पुढे संसाराच्या रगाड्यात ते बंद झाले. तरी मी सकाळ, संध्याकाळ बागेत फिरायला जात असे. स्वतःची सर्व काळजी घेऊन मला कॅन्सर होणं, आणि लगेच तो दुसऱ्या टप्प्यात जाणं, अचानक त्याचं निदान होणं, हे सर्व खूपच धक्कादायक होतं.

डॉ डावर यांनी खूप धीर दिला. इतकंच नाही, तर त्यांच्या या सर्व परिस्थितीतुन गेलेल्या जाऊबाईंची ओळख करून दिली. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले.
पुढे भयंकर यातना देणाऱ्या केमोथेरपी सुरू झाल्या. डॉ. मोहन मेनन सर यांचा फार मोठा आधार त्या काळात लाभला. रात्री बेरात्री कधीही मला काही त्रास झाला की आम्ही त्यांच्या समवेत बोलत असू. काही वेळेला ते काही औषध सांगत. त्याची गरज नसेल तर सर्व ऐकून घेऊन धीर देत. काही प्रसंगी ते भारतातही नव्हते. तरी पण त्यांनी सांगून ठेवले होते, काही त्रास झाला की लगेच फोन करायचा. यामुळे आम्हाला मोठाच दिलासा मिळे. मनात सतत विश्वासाची भावना असे आणि ती आजही आहे.
पहिल्या दोन केमोथेरपी होईपर्यंत मला इतर लोक म्हणतात, तसा काही त्रास झाला नाही. त्यामुळे खरंच काहीं त्रास होतो, यावर आमचा विश्वास बसत नव्हता. सर्व डॉक्टरांचे उपचार, सिस्टर्सनी धीर देणं, घरच्यांची साथ यामुळे मी तोंड देत राहिले.

ज्या पद्धतीने मी कॅन्सरला सामोरे गेले, ते पाहून प्रभावित झाल्याने माझी पहिली मुलाखत रिलायन्स वेबपोर्टल वर झाली. स्वानुभवावर आधारित मी “कॉमा” हे पुस्तक लिहिलं. प्रसिद्ध डिंपल पब्लिकेशननं ते प्रकाशित केलंय. पुढे ‘माय मेडिकल मंत्रा’ हे वेब पोर्टल, आकाशवाणी, दूरदर्शन यावर माझ्या प्रेरक मुलाखती प्रसारित झाल्या. प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक आशिष निनगुरकर, निर्माती किरण निनगुरकर, सह निर्माते देवेंद्र भुजबळ आणि सर्व टीम मिळून माझ्या जीवनावर “कॉमा” नावाचाच प्रभावी लघुपट निर्माण केला. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते मुंबईत राजभवन येथे तो २९ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाला. राज्यपाल महोदय हा १० मिनिटे कालावधीचा लघुपट पाहून खूप प्रभावित झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आमचं मनोबल खूप वाढलं.

दरम्यान, मी काम करत असलेल्या एमटीएनलमध्ये स्वेच्छा निवृत्ती योजना लागू झाली. १ फेब्रुवारी२०२० पासून मी नोकरीतून मोकळी झाले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त मुंबई प्रेस क्लब- मुंबई मराठी पत्रकार संघ ,नवी मुंबई महानगरपालिका, मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे *कॉमा- संवाद उपक्रम* केले. या उपक्रमात सुरुवातीला *कॉमा* लघुपट दाखवला जातो. १५/२० मिनिटे मी बोलते. १५/२० मिनिटे आयोजक संस्थेने बोलावलेले डॉक्टर बोलतात. पुढील ३०/४० मिनिटे ही शंका समाधानासाठी असतात. तिथेच कॉमा पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून देत असतो. कॉमा लघुपटाला इंग्रजी भाषेत सब टायटल आहेत. कॉमा पुस्तक अन्य भारतीय भाषेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आपलं आरोग्य अमूल्य आहे. त्यामुळे ते बिघडणार नाही म्हणून, आपण आपली दिनचर्या, स्वच्छता, सकस आहार, व्यायाम, ध्यान धारणा, निदान पस्तिशीनन्तर आपले डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करणं आवश्यक आहे. सुखी, दीर्घ आयुष्यासाठी ते अत्यन्त आवश्यक आहे. आपण *वेळ मिळत नाही*, ही सबब कधीच पुढे करू नये. आपण आपल्या आरोग्यदायी जीवनासाठी उपयोग सजग राहिले पाहिजे.
आपल्याला निरोगी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास काही मदत, मार्गदर्शन हवे असल्यास जरूर संम्पर्क साधा.
मोबाईल क्र. : 9869043300/9869484800.

— लेखन : सौ अलका भुजबळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप धाडसी आणि उद्योगी आहे ही व्यक्ती.
मला तर प्रश्न पडतो, देवाने एवढा अवाढाव्य राक्षसरूपी आजार अलकाकडे कसा पाठवला ? बहुतेक त्यालाही परीक्षा घ्यायची होती वाटतं!
पण अलका तुझ्या विल पॉवरला सलाम !🙋♀️
म्हणून आज आम्ही सगळ्या तू आखत असलेल्या, नियोजन करत खुपसे कार्क्रम, सहली, धमाल करत आहोत. तुशी ग्रेट हो !
आयुष्यमान भवं l
सौ. वर्षा भाबल.
🤝🤝❤️❤️
ग्रेट, ग्रेट मी काय म्हणावं या तुमच्या लढ्याला.👏🥰 आणि सगळ्यात महत्त्वाच तुम्ही कॅन्सर सारख्या लढ्यातून बाहेर येऊन इतरांचा आधार बनत आहात. आज ह्या पोर्टल मूळेही अनेक जणी लिहित्या झाल्या. त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळालं.अलका मॅडम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमचा हा प्रवास अविरत सुरू राहो ही सदिच्छा 🥰💐💐🙏🤝
धन्यवाद,🤝🤝
आरोग्य जपा हा उतम संदेश अनुभवातून सौ.अलका ताईंनी वाचकांना दिला आहे.
गोविंद पाटील सर
जळगाव.
अतिशय प्रेरणादायी लेख आहे….अलका ताई म्हणजे सतत हसतमुख, उत्साही व्यक्तिमत्व त्यांचे धैर्य, जिद्दीला सलाम. अतिशय बिकट परिस्थितीवर हिंमतीने केलेली मात नक्कीच अनेकांना जगण्याची एक आशा निर्माण करेल…अलका ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🫂🤝🤝