Wednesday, October 9, 2024
Homeलेखआपलं स्वातंत्र्य बलशाही राहो

आपलं स्वातंत्र्य बलशाही राहो

दोन वर्षांपूर्वीच आपल्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे.तो आनंद, तो उत्साह “यावत् चंद्र दिवाकरौ” टिकण्याच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी आपण कटिबद्ध व्हायला हवं ही भावना जोपासत असताना जगामध्ये आदर्शवत असणारी आपली लोकशाही टिकविण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करतो आहोत आणि आपल्याला काय करायला हवं याचा आकृतीबंध डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही.

आजची समाजरचना, त्यात दिवसेंदिवस घडू पाहात असलेली विषमतेची स्थित्यंतरं पाहिली की, आपण योग्य दिशेने पावले टाकत आहोत का ? अशी शंका यायला लागते. लोकशाहीची पाळेमुळे खोल रुजविण्यासाठी “सामाजिक ऐक्य, समता आणि शांती” ही त्रिसूत्री देशात राबविणे गरजेचे आहे हे आपण विसरत तर चाललो नाही ना ? याचा खोलवर विचार व्हायला हवा असं वाटतं.

आजचं आपल्या देशातील, आपल्या राज्यातील बिघडत चाललेलं वातावरण पाहता देशात सामाजिक समता निर्माण करण्यात आपण अजूनही यशस्वी झालो आहोत असं चित्र दिसत नाही, उलटपक्षी आपण कुठे तरी चुकीची पावलंचं टाकत आहोत अशी भीतीची पाल मनात चुकचुकते.

गेल्या सत्याहत्तर वर्षात कृषी, उद्योग, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, अंतराळ संशोधन, पायाभूत सुविधा, ऊर्जा यासारख्या क्षेत्रात आपण सर्वोत्तम प्रगती साधलेली आहे. आपली भरकटलेली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, गरीबी निर्मूलनासाठी वेळोवेळी टाकलेली अर्थपूर्ण पावलं, निरक्षरता दूर करण्यात मिळत असलेलं घवघवीत यश पाहाता आपण योग्य दिशेने पावले टाकत आहोत असं वाटतं असतानाचं याला कुठे तरी खीळ बसावी, ही प्रगती, उद्यमशीलता, हा आंतरराष्ट्रीय दबदबा कमी व्हावा, यासाठी विरोधी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटीरतावादी शक्ती फार जोमाने कार्यरत झाली आहे आणि आपण त्यांचे बळी ठरत आहोत, असं वाटायला लागलं आहे.

आज भारत एक मजबूत राष्ट्र म्हणून ओळखला जातो. हा एका दिवसात घडलेला चमत्कार नाही तर स्वातंत्रपूर्व काळात अनेक वर्ष आधीपासून त्यासाठी अनेक ज्ञातअज्ञातांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अनेकांनी काळकोठडीत वर्षानुवर्षे दिवस काढले. आजन्म कारावासाची शिक्षा भोगली, हिंसक, अहिंसक आंदोलनं केली आणि ब्रिटिशांना आपला देश सोडून जायला भाग पाडलं आणि पारतंत्र्याच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.
महत्प्रयासाने मिळविलेल्या स्वातंत्र्यानंतर अनेक संघर्ष, अंतर्गत अडचणी, आर्थिक समस्या यांना सामोरे जात आज देशाने विश्वात निश्चितपणे आपले एक स्थान निर्माण केले आहे. आज संपूर्ण जग भारताकडे, त्यांच्या आव्हानांकडे आकर्षित होत आहे. भारताने एक परिपक्व देश म्हणून आपला ठसा उमटविला आहे आणि हे सगळं आजवरच्या आपल्या एकीमुळे शक्य झालं.

सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी वेळोवेळी लोककल्याणकारी धोरणं आणि योजना आपल्या देशात राबविल्या गेल्या हे खरं असलं तरी देशातली गरीबी, मागासलेपणा दूर करण्यात आपण अजूनही यशस्वी झालो नाही हे ही कटुसत्य आहे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधीपासून ते राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, डॉ.मनमोहनसिंग आणि आता नरेंद्र मोदी या सर्व पंत प्रधानांनी देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर पुढे नेले. देशाने आर्थिक, लष्करी, अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळविलं आहे. आज भारत जगातील मोठी बाजारपेठ झाली आहे, अंतराळक्षेत्रात नवनवीन विक्रम केले आहेत. मंगळ मोहिमेत घवघवीत यश मिळवून अंतराळ क्षेत्रातही आपण नावलौकिक मिळवला आहे. आज देश आयटी क्षेत्रात अग्रेसर झाला आहे.

भारताची पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये सुरु झाली. त्यावेळी शेती, वीज, वाहातूक यावर विशेष लक्ष दिलं गेलं, त्यानंतर दुसर्‍या पंचवार्षिक योजनेत औद्योगिकीकरणावर विशेष लक्ष देण्यात आलं. १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री यांनी हरित, धवल क्रांती आणण्यासाठी पावलं उचलली. अनेक कृषी, औद्योगिक उत्पादने आपल्या देशात तयार करून त्यांची निर्यात क्षमता निर्माण करून लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत केला गेला. इंदिरा गांधी यांनी मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करून बँकांना कृषी क्षेत्राकडे वळवले. नरसिंह रावांनी जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणांमुळे भारताची परराष्ट्र गुंतवणूक, दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत झाली. नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात सुवर्ण चतुर्भुज योजना आखून चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई महामार्गाच्या नेटवर्कशी जोडलं, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आखली, निर्गुंतवणूक मंत्रालयाद्वारे थेट विदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, स्किल इंडियाच्या माध्यमातून देशातील कलागुणांना, तंत्रज्ञानाला वाव निर्माण केला. औद्योगिक कॉरिडॉर ची स्थापना केली. आता परदेशी कंपन्या भारतात यायला लागल्या आहेत तर भारतीय कंपन्या परदेशात स्थिर होऊ लागल्या आहेत.
हे आजचं वस्तुनिष्ठ वास्तव असलं तरी देशपातळीवर सामाजिक आणि आर्थिक समता आणण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही हे ही सत्य आहे. गरिबांना अन्न, पैसे देऊन हे प्रश्न मिटणार नसून रोजगाराच्या अधिक संधी, उत्पन्न वाढविण्याचे उपाय, मानसिकतेत बदल हे होणे गरजेचे ही आज काळाची गरज आहे.

अशा स्थितीत देश कितीही संपन्नतेकडे वाटचाल करीत असला तरी समाजव्यवस्थेत निकोपपणा आणण्यात आपण कितपत यशस्वी की अयशस्वी होत आहोत, यावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्षतेचे लक्ष्य संविधानात जरी आपण स्विकारलं असलं तरी ते वास्तवात अजूनही शक्य झालेलं नाही, किंबहुना आज देशातील अनेक राज्यांमध्ये घडत असलेल्या घटना पाहता विविधतेत एकता, सांस्कृतिक ऐक्य हे शब्द आपल्याला धोका तर देत नाहीत ना ? असा संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. देशाच्या काही भागांमध्ये चाललेला विषमतेचा उद्रेक, धर्मांतरासाठी चाललेला जीवघेणा अन्याय, अत्याचार, मणिपूर, बंगाल आणि आतापर्यंत वैचारिक दृष्टया संपन्न, शांत असलेल्या महाराष्ट्रात आता जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून समाजमनांमध्ये दरी निर्माण करण्याचे भयंकर प्रकार दुर्दैवाने पाहायला मिळत आहेत. यात कोणाचा फायदा आहे हे माहित नसलं तरी राज्याचं आणि पर्यायाने देशाचे फार मोठं नुकसान नक्कीच आहे. अशाप्रकारे माणसामाणसांमध्ये, जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये दरी, विषमतेला प्रोत्साहन देणंही देशहितासाठी मारकचं आहे असं मला वाटतं. त्याऐवजी याप्रश्नावर सर्वसमावेशक, समान दर्जा देणारा, आर्थिक असमतोल दूर करणारा, सर्व धर्मिय, सर्वजातीय विषमता मोडून देश एकसंघ ठेवणारा देशहितकारी निर्णय सर्वतोमुखी व्हायला हवा, हीच काळाची गरज आहे, हाच देश विपत्तीमुक्त करण्यावरचा उपाय आहे असं मला मनापासून वाटतं.

आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुन्हा एकदा आपला देश अधिक बलशाही, संपन्न, एकमुखी होण्यासाठी आपण सर्वांनीचं देशावर येऊ घातलेल्या धोक्याच्या घंटेचा बेसूर आवाज वेळीच ऐकून त्यानुसार सावधगिरीने पावलं टाकण्यासाठी, आपला देश विघटनापासून वाचविण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध होऊ या. एकजूटीसाठी एकत्र येऊ या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दलित, मागासवर्गीय जातीजमातींना त्यांच्यात आर्थिक, शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी काही वर्षासाठी आरक्षण देण्यात यावे, ते कायमस्वरूपी असण्याची गरज नाही, हे स्पष्ट केले असले तरी राजकीय स्वार्थासाठी, मतांसाठी हे आरक्षण अबाधित ठेवण्यात आले. आता इतर मागासवर्गीयांबरोबर मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होतो आहे म्हणून त्यांनाही आरक्षणात अंतर्भूत करण्यात यावे, या मागणीसाठी मोठमोठे मोर्चे काढून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये कडाक्याचे शाब्दिक युद्ध, हल्ले सुरू झाले आहेत, हे समाजजीवनासाठी अतिशय धोकादायक आहे. या आरक्षणाचा फायदा गरजवंतांपेक्षा धनदांडगेही कसे घेत आहेत, हे आपण पाहतो आहोत. हा भेदभाव वाढीला लावण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या जे खरचं मागास आहेत, शारिरीक, मानसिक दृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांनाचं फक्त आरक्षण देण्यात यावं आणि देशहितार्थ सामाजिक असमतोल सावरावा हीच शासनास विनंती करावीशी वाटते.

वीणा गावडे.

— लेखन : वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments