नमस्कार मंडळी.
नवीन वर्ष २०२५च्या आपणा सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्ष म्हटलं की, दरवर्षी बहुतेक सर्वजण चांगले बोलण्याचे, चांगले वागण्याचे, चांगला विचार करण्याचे, सत्कार्य करण्याचे, व्यसने सोडण्याचे, लवकर उठून फिरायला जाण्याचे, व्यायाम करण्याचे, सामाजिक कार्य करण्याचे असे अनेक प्रकारचे संकल्प करीत असतात.
परंतु, असे संकल्प करुन ते सिध्दीस नेणा-यांचे प्रमाण पाहीले असता ते हाताच्या बोटावर मोजता येईल इतके असते. तसं ते जवळजवळ नगण्यच म्हणता येईल असे दिसून येते. मुख्य म्हणजे, कोणतीही गोष्ट करताना ती गोष्ट मन लावून, मनापासूनच केली पाहिजे. तरच, ती गोष्ट किंवा ते काम व्यवस्थित होते. तसेच, त्याचे समाधान माणसाला मिळते. माणसाच्या जीवनातील ही खरी उपलब्धी आहे. सदैव अशाच प्रकारची उपलब्धता माणसाने नेहमी जीवनात प्राप्त केली पाहिजे. तरच, त्याच्या जीवनाचे सार्थक होईल.
पण ही झाली सरळमार्गाने आपले जीवन जगण्याची सरळमार्गी माणसाची पध्दत! पण, सध्याच्या या एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात जगणा-या लोकांची जीवन जगण्याची त-हा, त्यांचे स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत तर फारच अनाकलनीय, घातक व बेभरवशाची अशी झालेली आहे. त्याला कोणताही चांगला तर्क लावता येत नाही, याला कारण सध्याच्या कलियुगातील माणसांचे बदलत जाणारे स्वभाव आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी माणसामाणसात जो एकोपा होता, आत्मियता होती, ती आता राहिलेली नाही. त्यामुळे, माणसामाणसातील नात्यात, प्रेमात, त्यांच्या संवादात आता अंतर पडत चालले आहे. तसेच, हे अंतर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याला कारण माणसांची बदललेली जीवनशैली, पैशाविषयी त्याचा वाढत चाललेला हव्यास, अट्टाहास कारणीभूत आहे. अमाप संपत्ती, धनदौलत मिळविण्यासाठी माणसे अत्यंत नीच थराला जाऊन दूष्कृत्ये करीत आहेत. अधम वृत्तीची माणसे चांगल्या माणसांवर अत्याचार करीत आहेत. तसेच, संपत्ती धनापायी कित्येक जण तर अत्याचार व खूनही करीत आहेत. दिवसेंदिवस माणसातील माणुसकी नाहीशी होत चालली आहे. प्रत्येक क्षणाला माणुसकीचे प्रमाण अत्यंत कमी कमी होत चालले आहे. काही माणसे तर दरवर्षी ३१ डिसेंबरला नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या हाॅटेलमध्ये किंवा गुप्त ठिकाणी अफू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थांचे सेवन करुन नशिल्या, अश्लील अवस्थेत पार्ट्या करीत असतात. तसेच, रस्त्यावरुन बेफामपणे चारचाकी, दोनचाकी वाहने चालवित असतात.
दुर्दैवाने अशा पार्ट्यांमध्ये अनेक उच्चभ्रूच नव्हे तर मध्यमवर्गीय तरुणींचा ही सहभाग असल्याचे आणि तो वाढतही असल्याचे पोलिसांना अनेक पबवर, हाॅटेलमध्ये छापा टाकल्यावर आढळून आले आहे.
काही काही जिल्ह्यांमध्ये पोलिस अशा लोकांवर कारवाईही करीत असतात. अशा लोकांवर कायद्याचा कडक वचक बसला पाहिजे. तरच, नवीन वर्षाचे स्वागत सर्वसामान्यांना व्यवस्थितपणे साजरे करता येऊ शकेल. तसेच, वर्षभर सर्व जनतेला शांततेने व सुखाने स्वतःचे जीवन जगता येऊ शकेल. त्यासाठी, माणसांनी विशेषतः तरुण पिढीतील अवैधपणे, बेभानपणे
वागणा-या मुलामुलींनी स्वत:च्या बेशिस्त वागण्याला आवर घातला पाहिजे.
योग्य त्या शिस्तीचे पालन केले पाहिजे. भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील सर्व स्तरातील लोक विशेष करून तरुण पिढीतील तरुण तरुणी परदेशातील विविध प्रकारच्या वस्तू, दागदागिने, अत्याधुनिक फॅशनचे ड्रेस खरेदी करतात. त्यांच्या या गोष्टी आत्मसात करतात. पण, परदेशातील रस्त्यांवरील वाहतुकीबाबतची व इतर बाबतीतील कडक शिस्त मात्र आपल्या भारतातील सुशिक्षित लोक व तरुण पिढीतील युवक युवती आत्मसात करीत नाहीत. याला काय म्हणावे ? ही कसली जीवन पध्दती आहे ? माणसाचा लाभलेला अमुल्य असा जन्म सत्कार्य करुन सार्थकी लावणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु, सध्याच्या काळातील बहुतांशी माणसं ही धन, वित्त व सत्तेच्या मोहात व त्याबाबतच्या स्वार्थात गुरफटली गेली आहेत. त्यामुळे, त्यांना आचार, विचार, व नियमांचे भान राहिलेले नाही. वेळेचं भान व महत्त्वही राहिलेले नाही. अशा या माणसांच्या स्वार्थाच्या व सत्तेच्या खेळात सामान्य जनता होरपळली जात आहे. त्यातही, सामान्य लोकांना आमिष दाखवून संप, बंदचा खेळ खेळला जात आहे किंवा खेळविला जात आहे. बंदच्या काळात विविध दूकानदारांकडून दूप्पट, तिप्पट दराने भाववाढ करुन ग्राहकांची पिळवणूक केली जाते. याचा सामान्य जनतेला, ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सन २०२५ या नवीन वर्षात तरी हा स्वार्थाचा खेळ थांबला पाहिजे. फक्त स्वार्थाचाच उद्योग करणा-या लोकांनी हा स्वार्थाचा उद्योग त्वरित या वर्षापासून कायमचा बंद केला तरच जगातील समस्त नागरिकांना सुखाने आणि आनंदाने जगता येईल. तरच, ख-या अर्थाने हा नवीन वर्षाचा खरा संकल्प सिध्द होईल. माणसाच्या संपूर्ण आयुष्यात माणूस बॅंकेचं पासबुक जपत असतो आणि त्यातील रक्कम दिवसेंदिवस वाढविण्याच्या प्रयत्नातच तो आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असतो. पण, त्या पासबुकातील रक्कम मात्र तशीच राहिल, कमी होईल का वाढेल हे माणसाच्या हातात नसतं. तसंच, माणसाच्या जीवनात पासबुकपेक्षाही अत्यंत महत्वाचं बुक असतं, ते त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यावरच, अवलंबून असतं. ते म्हणजे त्याचं श्वासबुक आहे. या श्वासबुकावरच माणसाच्या आयुष्याची जीवनगाडी अविरत चालत असते. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, कोणत्याही माणसाचं या श्वासबुकाकडे लक्ष नाही. बॅंकेच्या पासबुकातील वाढणा-या किंवा कमी होणा-या रक्कमेकडे त्याचं लक्ष असतं. त्यानुसार, त्या त्या माणसाची पुढील कार्यवाही होत असते. मात्र, त्याच्या श्वासबुकाकडे त्या त्या माणसांचं अजिबात लक्ष नसतं. त्याच्या श्वासबुकातून एकेक श्वास कमी कमी होत आहे. त्याच्याकडे कोणत्याही माणसाचं लक्ष नाही. तो फक्त पैशाच्या पासबुकाच्या धुंदीतच जगत आहे. स्वतःच्या नि इतरांच्या ज्या आनंदासाठी, प्रेमासाठी, शांततेसाठी, सुख समाधानासाठी माणसांचा जन्म झालेला आहे. त्या गोष्टींकडे त्यांचं पुर्णतः दूर्लक्ष झालेलं आहे. तसेच,त्याचं दूर्लक्ष अजूनही अखंडपणे तसंच पूढे चालू आहे सेकंदाचा, मिनिटाचा, तासाचा, महिन्यांचा व वर्षांचा विचार करुन त्याप्रमाणे आनंदाने जगण्याचा, हसण्याचा तसेच, दूस-यांना आनंदी करण्याचा, दूस-यांना हसविण्याचा असा संकल्प नवीन वर्षात मात्र कोणी करीत नाही. तसे निदर्शनासही येत नाही. सध्याच्या काळात माणसांची वृत्ती आणि प्रवृत्ती स्वार्थी झालेली आहे. कोणीही एकदूस-यासाठी जगत नाही. असेच, सध्याच्या समाजजीवनाचे चित्र आहे.
प्रत्येक माणसाने मनाने ठाम निश्चय करून हे समाजजीवनाचे चित्र बदलले पाहिजे. दूस-यांच्या सुखासाठी कार्य केले पाहिजे. म्हणजे, स्वतःलाही सुख लाभते.पण, स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी काही माणसे जातीजातीत, समाजासमाजात द्वेष, अफवा पसरवून समाजाची, माणसांची व पर्यायाने देशाची शांतता व एकता भंग करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा लोकांवर शासकीय यंत्रणांनी वचक ठेवून कडक कारवाई केली पाहिजे. माणसाच्या वर्तणुकीचे फळ माणसांनि मिळत असतेंच. निसर्ग नियमच असा आहे की, तुम्ही जे कार्य कराल ते तुम्हाला दूप्पट स्वरुपात प्राप्त होते. जसे कर्म असेल तसे फळ मिळते हे गीतेचे तत्वज्ञान आहे, कर्मज्ञान आहे. संपुर्ण जगामध्ये भारत हा देशआदर्श नियमांचा, आदर्श आचारविचारांचा देश, आदर्श लोकशाहीचा देश आहे. तो तसाच आदर्श देश म्हणूनच जगात ओळखला गेला पाहिजे.
भगवान श्रीकृष्ण व भगवान श्री प्रभूरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पवित्र झालेला देश म्हणून गणला गेला पाहिजे.
जगातील अनेक देशांच्या शेकडो संस्कृती नष्ट झाल्या आहेत. परंतु हजारों वर्षांपासून अस्तित्वात असलेली हिंदूसंस्कृती अजूनही जगात गौरवाने, समर्थपणे विलसत आहे. हे भारताचे, म्हणजेच हिंदूस्थानचे चिरंतन वैशिष्ट्य आहे. प्रत्येक भारतीयाने मनात हा विचार, हे वैशिष्ट्य, ही संस्कृती मनात ठसवली पाहिजे. एकविसाव्या शतकाच्या भाषेत हा लोगो जपला पाहिजे. भारत देशातच पुढचा जन्म मिळावा असे परदेशी लोकांना वाटले पाहिजे. कारण, त्यादृष्टीने शेकडों परदेशी लोकांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे, ते ही संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि काही भारतीय लोक मात्र आचारविचारांचा, वागणुकीचा, त्यांच्या संस्कृतीचा म्हणजेच परदेशी संस्कृतीचा अवलंब करीत आहेत. ही खचितच, अशा लोकांसाठी लाजिरवाणी बाब आहे.हे त्या लोकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे. तसेच,अशा लोकांचे प्रमाणही वाढत चालले आहे.ही खचितच, खेदजनक बाब आहे. याचा सर्व भारतीयांनी साकल्याने विचार करावा. तसेच,
भारतीय संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर वृध्दींगत करावी. ख-या अर्थाने प्रत्येक नवीन वर्ष अशा प्रकारे साजरे करावे असे वाटते.
जय हिंद!जय महाराष्ट्र !
याविषयी सुसंगत अशी (माझीच) कविता पुढे देत आहे.
“धडा जीवनाचा”
सेकंदामागून सेकंद जावून सेकंदाचा मिनिट होतो
मिनितांमागुन मिनिट जावून त्याचा तास होतो
तासांमागून तास जावून तासांचा दिवस होतो
दिवसांमागून दिवस जावून त्यांचा महिना होतो
महिन्यांमागून महिने जावून महिन्यांचे वर्ष होते
सेकंद, तास, मिनिट, दिवस, महिने, वर्ष वाया जातात
एवढे सारे होऊनही माणसाला काही न कळते
माणसा माणसा, कधी तू जागा होवून सावरणार स्वतःला
दरवर्षी संकल्प करुन जात आहेस अधोगतीला
युगेयुगे बदलली तु
झा दूर्गूणी स्वभाव न बदलला
काळही बदलतो सदगुणाने
तू पण बदल रे माणसा !
आयुष्य तुझे थोडे
नको भरु पापांचे घडे
नववर्षात घे सुखाने जगण्याचे जगविण्याचे धडे
२०२५ हे नवे वर्ष सर्वांना सुखसमृध्दीचे व आनंदाचे जावो हीच हार्दिक शुभेच्छा !
— लेखन व काव्यरचना : मधुकर ए.निलेगावकर. पुणे
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
साधा सोपा संकल्प सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे कुठेही राग,लोप,दिसत नाही.जीवन ही एक आगगाडी आहे, आशेच्या रुळावर चालते,निराशेचा दुर सोडते.सहानभुती स्टेशन वर थांबते.