Wednesday, September 11, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : समारोप

आमची युरोप ट्रीप : समारोप

नमस्कार मंडळी.
आता पर्यंत आमची युरोप ट्रीप या लेखमालेचे १९ भाग प्रसिध्द झाले आहेत.

या लेखमालेचे वैशिष्टय म्हणजे लेखिका सुप्रिया सगरे यांनी केवळ प्रवास वर्णन न लिहिता, परदेशात आपली मुलं, मुली गेली की तिथे कशी राहतात याचे घडवलेले मनोज्ञ दर्शन हे प्रतिनिधिक स्वरूपाचेच म्हणावे लागेल. आशा आहे की, आपल्याला ते आवडले असेल.

या समारोपाच्या भागात आपण वाचणार आहोत स्वीडन व भारत देशातील तुलनात्मक विश्लेषण ज्यामुळे आपला भारत देश ही स्वच्छ,सुंदर होण्यास नक्कीच मदत होईल.
लेखिका सुप्रिया सगरे यांचे मनःपुर्वक आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

जगात कुठेही जा, आपल्या नकळत आपल्या देशात असलेले फायदे, तोटे व ज्या ठिकाणी फिरायला गेलो तिथले फायदे, तोटे ह्याची तुलना साहजिकच मनात सुरू होते. आपल्यासाठी ती एक भिन्न संस्कृती, विचारसरणी असते. आम्ही आता पर्यंत सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, मकाउ, दुबई, केनिया व भारतीय उपखंडातील नेपाळ (इथे तर भारतात असल्यासारखंच वाटते कारण दुकानांच्या पाट्या पण देवनागरी लिपी मध्ये आहेत 😃) व श्रीलंका अश्या अनेक देशात भ्रमंती केली.

प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये राहिलो व जास्तीत जास्त पर्यटन स्थळे बघण्याचा प्रयत्न केला. ह्या ट्रिप्स जास्तीत जास्त आठवड्याच्या होत्या. यामुळे स्थानिक लोकांशी फार मर्यादित संपर्क आला. मात्र लेका बरोबर महिनाभर स्वीडन मध्ये त्याच्या घरी राहिल्यावर व हिंडल्यावर बर्‍याच गोष्टींचे निरीक्षण केले जे इथे मांडावेसे वाटतय. ते काही महत्वाचे मुद्दे इथे आपण सविस्तर बघूयात.

1) हवामान व भौगोलिक स्थान :

भारत विषुववृत्ताच्या जवळ असल्याने उष्ण कटिबंधीय देश आहे. आपल्याकडे पावसाळी दिवस सोडून भरपूर सूर्यप्रकाश असतो.

आपल्याकडे भरपूर मोठा समुद्र किनारा क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, नद्यांची खोरी, वाळवंट तसेच उत्तरेला बर्फाळ प्रदेश असे वेगवेगळे भूप्रदेश आहेत.

स्वीडन हा देश युरोप च्या उत्तरेला असलेला देश आहे व नोव्हेंबर /डिसेंबर ते मार्च/एप्रिल पर्यंत इथे बर्फ व गारठा असतो. त्यामुळे तेथील उन्हाळ्यात (जून ते ऑगस्ट) स्थानिक लोक सूर्यप्रकाशाचा आनंद सणासारखा घेतात.

स्वीडन मध्ये हि डोंगराळ भाग, समुद्र किनारा, सपाट भूभाग, नद्या आणि मोठी पाणतळी आहेत.

2) जनसंख्या, खाद्य संस्कृती व कार्य संस्कृती :

भारताची लोकसंख्या 140 कोटी व क्षेत्रफळ 37, 87, 363 square km आहे. लोकसंख्येची घनता 431.11/sq km आहे.

आपल्याकडे राज्याप्रमाणे भरपूर व विविध खाद्य पदार्थ व संस्कृती आहे.

भारतात मुख्यत्वे शहरी व ग्रामीण अशी कार्य पद्धती विभागता येईल. शहरातील जीवन दगदगीचे तर खेड्यातील कार्य पद्धती त्यामानाने निरोगी आहे.

स्वीडनची लोकसंख्या 2021 च्या जनगणनेनुसार फक्त 1.04 कोटी व क्षेत्रफळ 4,50,295 square km आहे. लोकसंख्येची घनता फक्त 26/sq km आहे.

इथे मुख्यत्वे सेमला, churros असे बेकरी पदार्थ किंवा बर्गर (शाकाहारी /मांसाहारी), फिश, torta (आपल्या चपाती च Swedish version), meat / veg balls व भरपूर फळे (विशेषतः वेगवेगळ्या berries) लोक खातात.

इथली कार्यालयातील कार्यपद्धती अतिशय उत्तम आहे. इथे work life balance ला खूप महत्त्व आहे. तुमचे कामाचे ठराविक तास झाले की extra मीटिंग असा प्रकार नसतो. त्यामुळे कौटुंबिक वेळ छान मिळतो.

3) शेती व पूरक उद्योग :

भारतात शेती हि त्या त्या भागातील हवामाना प्रमाणे केली जाते. शिवाय आपल्याकडे 1.78 million square km शेत जमीन आहे.

पुरक उद्योगात दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, कुक्कुटपालन, मध माशी पालन, मशरुम व रेशीम शेती, चारा व पशुखाद्य निर्मिती, गांडूळ खत/खत निर्मिती, औषधी वनस्पती लागवड, कृषी पर्यटन उद्योग, फळ प्रकिया उद्योग, शेती माला पासून विविध पदार्थ असे भरपूर शेती पूरक व्यवसाय आहेत.

स्वीडनमध्ये शेती हि मुख्यत्वे दक्षिणेत सपाट भूभागावर होते. व शेती पूरक क्षेत्र साधारण पणे 34,192 square km आहे.

तेथे तृणधान्ये मुख्यत्वे जव (बार्ली), ओट्स, गहू, तेलबिया व भाज्या पिकवतात. फळांमध्ये सफरचंद, pear, वेगवेगळ्या berries (blueberries, strawberries, cloud berries, lingonberries, rowan berries, elder berries etc).

फळ प्रक्रिया उद्योग जसे की berries पासून जाम किंवा marmalade, गहू, बार्ली, ओट्स वापरून torta बनवणे, दुग्ध व्यवसाय तसेच अश्व (घोडे) पालन हे तेथील शेती पूरक व्यवसाय आहेत.

तिथे public गार्डन्स मध्ये असलेल्या फळ झाडांवर आलेली फळे कोणीही काढून खाऊ शकतात. हे मला खूप भारी वाटले😄

4) लोक, स्वभाव विशेष, भाषा व धर्म :

भारतात बहुसंख्य लोक हिंदू आहेत तसेच इतर धर्मीय (मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध) लोकही गुण्यागोविंदाने राहतात.

येथील लोक एकमेकांना अडचणीत मदत करतात. इथे एकमेकांजवळ बहुतांश लोक आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करतात.

राज्या प्रमाणे व भागा प्रमाणे येथे वेगवेगळ्या (780 भाषा) बोली भाषा आहेत.

स्वीडनमध्ये बहुसंख्य लोक ख्रिश्चन आहेत. तसेच इतर देशातून कामानिमित्त आलेले मुस्लिम, हिंदू हि आहेत. कोणालाही धर्मावरून भेदभाव केला जात नाही. माणसाच्या कामा प्रती असलेल्या समर्पणाला जास्त महत्व दिले जाते.

स्थानिक लोक थोडे भिडस्त असतात. स्वतःहून बोलत नाहीत. आपण हसलो तर मात्र हसून प्रतिसाद देतात. त्यामुळे मला फार छान वाटलं 😄. (मनात असं हुश्श झालं 😅)

इथे स्थानिक स्विडीश भाषे बरोबर फिनिश (Finland ची) सामी व इंग्लिश ह्या मुख्य बोली भाषा आहेत. येथील शाळांमध्ये इंग्लिश शिकवली जाते त्यामुळे बहुतांश लोक इंग्रजी बोलतात. त्याशिवाय वेगवेगळ्या देशातून कामानिमित्त आलेले लोक त्यांच्या भाषा बोलतात.

5) सामाजिक जीवन व आर्थिक परिस्थिती :

भारतात सामाजिक जीवन छान आहे. लोक एकमेकांकडे जातात. माणसे एकमेकांशी बोलतात. आपल्याकडे प्रत्येक वयोगटातील लोकांचा मित्र मैत्रिणीं चा गट असतो. कामाच्या ठिकाणी हि मैत्री जुळते. मुळात भारतीयांना ओळख नसली तरी हसून एकमेकांशी संवाद साधायची सवय असते.

आपल्याकडे खूप आर्थिक स्तर आहेत. अगदी अती श्रीमंत ते दारिद्र्य रेषेखालील लोक असे. बहुतांश मध्यम वर्गीय. आपल्या कडे जनसंख्या हि खूप आहे.

स्वीडनमध्ये हि कामाच्या ठिकाणी मैत्री जुळते हे लेकानं अनुभवले. तिथे टीम वर्क ला महत्त्व असल्याने एकमेकांना समजून काम पुढे नेतात. वैयक्तिक आयुष्यात स्विडीश लोक तसे भिडस्त असले तरी मुले मात्र एकत्र फुटबॉल खेळताना किंवा सायकल चालवताना बघितले. कदाचित तिथे घरकामाला बाई मिळत नाही म्हणून मोठे लोक घरकामात व्यस्त असतात. पण वेळ मिळाला की बाहेर फिरणे, सोसायटी च्या आवारात बेंचवर बसून गप्पा मारणे हे मी बघितले आहे. शिवाय भारतीय लोकांचा हि गट असतोच. ते आपल्या सणांप्रमाणे कार्यक्रम आयोजित करत असतात. भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम हि अश्या गटात व भारतीय दूतावासा कडून आयोजित होत असतात. त्यामुळे एकटेपणा जाणवत नाही.

स्वीडनमध्ये open economy आहे व innovative technology वर तिथे भर दिल्याने तेथील उद्योग समूह हि त्या दृष्टीने जगभरात व्यवसाय करताना आढळतात. ह्याची प्रमुख उदाहरणे म्हणजे ikea, Scania, Ericsson, Spotify, Electrolux, Volvo, Atlas Copco, Skanska, Sandvik, Klarma, Tetra Pak, Alfa Laval, Telia and many more. त्यांच्या 1970 पासून च्या आर्थिक धोरणांमुळे आता लोक चांगल्या आर्थिक स्थिती मध्ये जीवन जगतात. शिवाय सरकार तर्फे सोशल security हि असते. अगदी बाहेर देशातून कामानिमित्ताने आलेले लोकही आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहेत.
आफ्रिकन, पाकिस्तानी, बांगलादेशी लोक टॅक्सी चालवताना बघितले. ते हि तिथे सुस्थितीत राहतात त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी आहे.

6) सामाजिक सुरक्षा, सुव्यवस्था व सुविधा :

भारतात सामाजिक सुरक्षा हा विषय फार मोठा आहे आणि अजून त्यात खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारी व्यवस्थे बरोबर इथे सामाजिक सलोख्याचा समतोल राखण महत्वाच आहे.

सुविधांमध्ये infrastructure facilities रस्ते, सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सरकारी कार्यालयात होणारी कामे व त्यांना लागणारा वेळ हे सामान्य लोकांसाठी अजूनही काही प्रमाणात त्रासदायक आहे. सुधारणेला वाव आहे. मात्र सकारात्मक फरक नक्की आहे.

कचरा व्यवस्थापनात भारतात अजून खूप सुधारणा होण आवश्यक आहे. शिवाय लोकांनीही कचरा इकडे तिकडे न टाकता नीट कचरा कुंडीत नेवून टाकला पाहिजे. त्याबाबतीत आपल्याकडे ह्या प्रती नागरी भावनेचा (civic sense) अभाव दिसतो. मात्र आता काही शहरांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून टाकायची सवय हळू हळू लोकांना लागतेय.

स्वीडनमध्ये social security अंतर्गत तेथील नागरिकांना शिक्षण व आरोग्य सुविधा ह्या उत्तम रीतीने लोकांना दिल्या जातात. सरकार ते सर्वांना व्यवस्थित मिळेल ह्याची खात्री करते. शिवाय जेष्ठ नागरिकांसाठी हि त्यांच्याकडे बर्‍याच उपाययोजना आहेत. सामाजिक सुरक्षा (law and Order) दृष्टीने हि तिथे चांगली व्यवस्था आहे.

सामाजिक सुविधा हि अतिशय चांगल्या आहेत. रस्ते चांगले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहे. अगदी आपण कितीही सामान बरोबर असेल तरी सार्वजनिक वाहतूक सहज वापरू शकतो. खूप लोक तर इलेक्ट्रिक स्कूटर (लहानपणी आपण जी स्कूटर चालवायचो तशी पण बॅटरी operated), सायकल घेऊन सगळीकडे फिरतात व तीच स्कूटर, सायकल घेऊन बस व मेट्रो, लोकल ट्रेन मध्ये हि येतात व स्टेशन वर उतरून परत सायकल, स्कूटर नी जातात. मला हे खूप भारी वाटले. शिवाय त्यांच्या कडच्या पाळीव प्राणीही (कुत्रे/मांजर) सोबत घेऊन सार्वजनिक वाहतूक मधून प्रवास करतात. तिथे त्याची परवानगी आहे.

एकंदर आर्थिक स्थिती व राहणीमान ह्यामुळे स्वीडन happiness इंडेक्स मध्ये सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पहिला देश त्याच्या शेजारीच असलेला Finland आहे. पहिल्या दहा देशांच्या यादीत अगदी अमेरिका हि येत नाही. हे आपण गूगल वर बघू शकतो. आणि स्वीडन मध्ये फिरताना मला हि हे जाणवले.

शिवाय इथे कचरा व्यवस्थापन फार व्यवस्थित असल्याने रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असतात. कुठेही पानाच्या पिचकार्‍या हि नसतात 😅. इथे सुका कचरा सुद्धा प्लास्टिक, कागद व बॉक्स, मेटल, ग्लास, असे वेगवेगळे करून टाकावे लागतात. शिवाय स्वयंपाक घरातील ओला कचरा तर वेगळाच टाकावा लागतो. त्याबाबतीत इथे फार शिस्त पाळली जाते. त्यासाठी घरातही वेगवेगळ्या कचराकुंडी असतात व निवासी इमारती जवळही वेगवेगळ्या कचराकुंडी असतात. शिवाय सुपर मार्केट किंवा ट्रेन स्टेशनवर प्लॅस्टिक vending मशीन असतात. ज्यात प्लास्टिक कचरा टाकून त्या बदल्यात काही पैसे हि मिळतात. हि व्यवस्था फार चांगली वाटली.

7) आयात व निर्यात :

भारतात खनिज तेल, शस्त्र सामुग्री, सोने चांदी, मौल्यवान रत्ने (कच्च्या स्वरुपात), इलेक्ट्रॉनिक वस्तू, औद्योगिक यंत्रे, रासायनिक खते इत्यादी वस्तू आयात होतात. अन्न धान्याच्या बाबतीत मात्र आपल्या देश स्वयंपूर्ण आहे.

भारतातून निर्यात होणार्‍या वस्तूंमध्ये leather व त्याची उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने, घडवलेली रत्ने व सोन्याचे दागिने, automobile उत्पादने, Pharmaceutical उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये, सुती धागे, कपडे इत्यादी आहेत.

स्वीडनमध्ये machinery, पेट्रोलियम व पेट्रोलियम उत्पादने, रसायने, गाड्या, लोखंड व स्टील, कपडे व खाण्याचे पदार्थ आयात करते. हे सर्व European Union मार्फत होत असल्याने भारताच्या शेती मालाला (perishable व non perishable) पूर्ण युरोप हि एक चांगली बाजारपेठ आहे. आपल्या देशातील शेतकर्‍यांनी किंवा गट शेती करणार्‍यांनी स्वतः ह्या निर्यातीत उतरण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री फार्मची द्राक्ष तिथे लेकाला मिळाली होती. भारतीय शेती माल नियमित मिळाला तर फार छान होईल.

स्वीडनहून machinery, nuclear reactors, boilers, गाड्या, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, मिनरल ऑईल व डिस्टिलेशन उत्पादने, Pharmaceutical उत्पादने व मोठ्या प्रमाणात जंगले व झाडी असल्याने लाकूड व कागद व कागदाचे साहित्य निर्यात होते.

ह्या विश्लेषणात एकंदर सर्व मुद्द्यांवर चर्चा करायचा प्रयत्न केला आहे. तेथील आयुष्य वर्क लाईफ संतुलनामुळे व सार्वजनिक सोयी सुविधां मुळे मला तरी छान वाटले. शिवाय happiness index मध्ये जगात हा देश सहावा आहे. इथे मंत्री सुद्धा सार्वजनिक वाहतूक वापरतात व त्यांच्या बरोबर सुरक्षा रक्षक किंवा अजून काही लोकांचा ताफा असे काही नसते. अगदी सामान्य माणसा प्रमाणे वावरतात. तेथील स्थानिकांचे भारतीयांविषयी चांगले मत आहे. आशा करते की ह्या माहितीचा उपयोग ज्यांना तिथे पर्यटक म्हणा किंवा नोकरी निमित्ताने जायचे असेल तर नक्कीच उपयोगी पडेल 😊.

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments