कॉलनीतील आम्हा बच्चेकंपनीला वरिष्ठानकडून “वानरसेना” या नावाने गौरवण्यात आलं होतं. आम्ही सतत “एका घरातून दुसऱ्या घरात” पळताना दिसत असेल म्हणून कदाचित! पण तेव्हा मात्र “श्री रघुवीर की वानर सेना सेतू बांध चली” हे गाणं म्हणत आम्ही आमची कॉलर टाइट करायचो. आता मात्र तेव्हा आपण किती मूर्ख होतो या गोष्टीवर हसायला येते. असो…
पण शेवटी बालपणच ते निरागस ! तेव्हा ना घराला कुंपण होती ना मनाला. कधी जोशी काकूंचा बंड्या चिंटूकडे जेवताना दिसायचा तर चिंटू कधी पाटीलकाकूंकडे दिसायचा. आमच्या कॉलनीत मुला मुलींची कमी नव्हती. त्यामुळे खेळायला खूप जण असायची. अभ्यासाच्या वेळा सांभाळून आम्ही खूप खेळायचो. मी, पिंकी आणि सोनू आमचा त्रिकोण म्हणजे गांधीजींची तीन बंदर ! 🐒 सदैव आम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरायचं. या त्रिकोणाचा चौकोन आम्ही कधीच होऊ दिला नाही. पण आमच्या लहान भावांना मात्र आमच्या ग्रुप मध्ये एन्ट्री होती. कदाचित मोठ्या बहिणीचे प्रेम असेल ते. असो आमच्या कॉलनीमध्ये वयोगटाप्रमाणे ग्रुप होते.
या वयोगटाचे वर्गीकरण असे….
१) पहिला गट – वर्ग ८ ते १० म्हणजे सुपर सिनियर… ज्यांना आपल्याला खूप कळतं आणि आपण खूप हुशार आहोत याची नुकतीच जाणीव झालेली होती.
२) दुसरा गट – वर्ग ५ ते ७ म्हणजे सिनियर… जो सुपर सिनियर चे एकही काम न ऐकता त्यांना उलट उत्तर द्यायची हिंमत करू शकत होता. आणि हा गट ज्युनिअर कधीच आपल्या गटात सामील करून घ्यायचा नाही.
३) तिसरा गट – वर्ग २ ते ४ म्हणजे..ज्युनिअर “कच्चा लिंबू” म्हणजे आम्ही. जी सिनियरच्या मागे मागे फिरून त्यांची सगळी काम ऐकणारी, कॉलनीतील सर्व हळदीकुंकवाची बोलणी देणारी…
हे तीन गट आमच्या कॉलनीत खूप सक्रिय असायचे. पण अजून दोन गट मात्र स्वतःच्याच विश्वात रंगलेले असायचे . या दोन गटातील पहिला गट म्हणजे सुपर डुपर सिनियर म्हणजे वर्ग १० च्या पुढचे मुलमुली.. यांना अति कळत असायचं. त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे त्याच्याशी काही घेणेदेणे नसायचं. कारण त्यांच्या विश्वातून त्यांना बाहेर डोकवायला वेळ नसायचा. पण या गटाचं आणि आमचं घट्ट नातं होतं. कारण आम्ही त्यांचे “बालपोस्टमन”.. त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे सगळा “पत्रव्यवहार” म्हणजे “प्रेम पत्रव्यवहार” आमच्याकडून व्हायचा. ही फार जोखमीची जबाबदारी होती. कारण ते पत्र योग्य व्यक्तीच्या हातात पडले नाही तर ? काही दिवस तो किंवा ती नजर कैदेत असायचे. पण ही जोखमीची जबाबदारी आम्ही उत्तम प्रकारे पार पाडली. सवयीचा भाग अजून काय. 🤦♀️
अजून एक छोटासा गट म्हणजे वय वर्ष १ ते ६.. ज्यांचं विश्वच वेगळं होत. ते निव्वळ वरिष्ठांच्या देखरेखित खेळायचे. असा हा आमचा मोठा बालगोपाळांचा परिवार. संध्याकाळ झाली की आम्ही सगळेजण आपापल्या घरट्यातून बाहेर निघायचं. आणि जोवर आईच्या ३ हाका ऐकू येत नाही तोवर त्या कच्चा रस्त्यावर मन मुराद खेळायचो. तीन हाका यासाठी कारण दोन हाका ऐकू येऊन सुद्धा आमच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हत्या. पण तिसरी हाक मात्र पाठीत बसलेल्या फटक्यासह जाणवत होती.
अशातच आता आमच्या घरासमोरून पक्का रस्ता होणार अशी कुजबुज आम्हाला ऐकू येऊ लागली. पक्का रस्ता म्हणजे नेमकं काय याचा आम्ही आमच्या वयानुसार, बुद्धी कौशल्यासह कयास लावत होतो. या विषयावर घरात होणाऱ्या मोठ्यांच्या चर्चा ऐकून वानर सेना सभेत विषय मांडत होतो. आता घरासमोर पक्का रस्ता होणार या बातमीने मोठे सुखावले होते तर आम्हाला मात्र कुतूहालाने घेरलं होतं. शेवटी तो दिवस उजाडला. त्यादिवशी आम्ही सगळ्यांनी शाळेतून मुद्दाम रजा घेतली होती. काही मोठ्यांनी पण ऑफिस मधून रजा घेतली होती. कारण रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर काही वेळ त्या रस्त्यावरची वाहतूक बंद असायची. त्यादिवशी आमची वानर सेना सकाळीच आवरून घराबाहेर रस्ता बांधकाम विभागातील लोकांची आतुरतेने वाट पाहत होती.
ती लोक आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. डांबरीकरणाची पूर्वतयारी चालू झाली होती. रस्ता झाडणे, खडक काढणे ही कामे चालू असताना, गरज नसताना देखील खारीचा वाटा म्हणून आम्ही थोडी थोडी मदत करत होतो. नंतर ट्रक, रोड रोलर आमच्या कॉलनीत दाखल झाले. त्यांनी त्यांना दिलेली कामे चोख केलीत आणि पाहता पाहता पूर्ण रस्ता तयार झाला. पूर्ण तयार रस्ता पाहिल्यावर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. परंतु काही वेळ त्या रस्त्यावर कोणीच जायचं नाही अशी सक्त ताकीद आम्हा वानरसेनेला देण्यात आली होती. रस्ता पूर्ण होईस्तोवर संध्याकाळ झाली होती. आता उद्याच आपल्याला या रस्त्यावर चालायला मिळेल, या विचाराने कधी झोप लागली कळलेच नाही.
सकाळी उठून ब्रश तोंडात घेऊन आमची वानर सेना थेट घराबाहेर पडली . सुंदर काळा काळा क्षार, कुठेही खड्डा नसणारा रस्ता पाहून आमचे डोळे विस्फारले. नवीन असल्यामुळे रस्त्यावरचे डांबरही चकाकत होते. नवीन रस्त्यावर खेळताना आम्ही रस्त्याच्या कडेला चपला काढून खेळायचो. रस्त्यावर पडल्यावर आता कुणाचे गुडघे फुटत नव्हते की कोपरे सोलत नव्हते. सायकल चालवताना सुद्धा मज्जा येत होती. नवीन रस्त्यावर चप्पल घालून चालले की, रस्ता खराब होईल, असे माझ्या बाल मनाला वाटायचे. म्हणून मी माझ्या जिवलग मैत्रिणींच्या घरी जाताना पायातली चप्पल हातात घालून रस्त्यावरून अनवाणी जात असे. असं चालताना पाहून मला सगळेजण हसायचे. पण माझ्या बाल बुद्धीला ते समजत नव्हतं. कारण त्या गुळगुळीत रस्त्यावरून चालताना मला एक पण खडक की काटा टोचत नव्हता याचा मला खूप आनंद होत होता. पण म्हणतात ना “नऊ दिवस नवलाईचे !” काळाशार रस्ता कधी करड्या रंगाचा झाला आणि माझ्या हातातली चप्पल कधी पायात आली, हे कळलेच नाही.. पण आजही माझा हातात चप्पल घातलेला माझा फोटो मात्र मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तसाच छापला गेला आहे !!!
— लेखन : सौ. आश्लेषा गान.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान सुंदर…. कदाचित सगळ्यांनी एकदा तरी हातात चप्पल घातली असेलच येवढे नक्की….. आणि पायात कधी येते हे कळतच नाही
लहानपणीच्या बालीश आठवणी मनाच्या तिजोरीत छान साठवलेल्या आहेत. लहानपणी धपाटे खाताना वाटायचं केव्हा मोठे होणार, पण आता वाटतंय लहानपणच छान होते.👌👌