Saturday, July 27, 2024
Homeपर्यटनआमचे नेपाळ पर्यटन : २

आमचे नेपाळ पर्यटन : २

अशाप्रकारे, आमच्या नेपाळमधील पर्यटनाचा दुसरा दिवस उजाडला. आज १३ फेब्रुवारी जी मंडळी ट्रेनने येणार होती, ती अद्यापही काही कारणवश पोहोचली नव्हती. म्हणून आमच्यासह जी मंडळी आधीच पोहोचली, त्या सर्वांनी विचार केला की, आपण हॉटेलवर बसून राहण्यापेक्षा एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन येऊ या. मग हॉटेल मॅनेजर समवेत चर्चा करून “मनोकामना देवीच्या” दर्शनासाठी जाण्याचे ठरले आणि तयारीला लागलो.

त्याप्रमाणे सकाळी दहा वाजेपर्यत सर्वांनी तयारी व नाष्टा करून एकत्र जमायचे ठरले. तेथे जाण्यासाठी १० आसनांची एक चांगली टोयाटो गाडी सांगितली. ही गाडी बरोबर दहाच्या सुमारास हॉटेलच्या आवारात आली आणि आम्ही सर्वजण गाडीत आसनस्थ होऊन “मनोकामना” देवी दर्शनार्थ त्या दिशेने निघालो. काठमांडू पासून देवीचे मंदीर सुमारे १०० किलोमिटर अंतरावर असल्याचे ड्रायव्हरने सांगून किमान ४ ते ५ तासाचा प्रवास करावा लागेल, कारण रस्ता घाटमाथ्याचा- वळनांचा, अरूंद आणि मोठ्या वाहनांच्या वर्दळीचा असल्यामुळे वाहन फार संथ गतीने-सावधगिरीने चालवावे लागते. त्यामुळे ड्रायव्हरने घाई न करता वाहन चालविण्याची सुचना देण्यात आली. पुढे दोन तासाच्या प्रवासानंतर चहापाण्यासाठी
“साथी भाई संकल्प हॉटेल” जवळ ड्रायव्हरने गाडी थांबवली. आम्ही सर्वांनी नाष्टा-चहा घेतला आणि पुढच्या प्रवासाच्या दिशेने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजुने हिमालयाच्या पर्वत रांगातील दिसणारे उंचच उंच डोंगर, तर दुस-या बाजुने वळन रस्त्यावरील कितीतरी मिटर खोल दरी पाहून मनात भितीचा गोळा यायचा !!

काठमांडू ते “मनोकामना देवी” प्रवासात आम्ही निसर्गाच्या किमयेचा विचार करतांना, हिमालयीन पर्वत रांगामधले अनेक उंच पर्वत, तेथील निसर्गदत्त हिरवाई, या पर्वत रांगातून खळखळ वाहणा-या अनेक नद्या, उंच पर्वत रांगेच्या उतारावर आणि काही ठिकाणी पठार भागात वसलेली खेडे वजा छोटे मोठे गांव, विशिष्ठ पद्धतीने बांधलेली घरे, पर्वताच्या उतारावरील भागात कसण्यात येणारी शेती, या शेती मधले वाफे आणि त्यात लागवड करण्यात येणारा भाजीपाला अशा अनेक प्रकारची किमया पाहता पाहता आमचेच काय कोणाचेही मन आनंदाने आणि आश्चर्याने भरून येणार नाही काय ? नक्कीच येईल, यात काही शंकाच येणार नाही.

या प्रवासादरम्यान तासाच्या अंतरावर ड्रायव्हरने गाडी थांबवून सीएनजी – गाडीसाठी लागणारा वायु इंधन भरून घेतले. तिथे आम्ही खाली उतरून पर्वत रांगाच्या नजारा पाहतांना मनातून हरखून गेलो. तेंव्हा मला “काय तो डोंगर, काय ती झाडी अन् काय ते हॉटेल” या एका राजकारणी आमदाराच्या वाक्याची आठवण आल्याशिवाय राहली नाही. अशा एक ना अनेक आठवणींना उजाळा देत, “मनोकामना देवीच्या” पहिल्या डोंगर पायथ्याशी दोन वाजताच्या सुमारास पोहोचलो. आम्हाला वाटले इथेच कुठे तरी देवीचे मंदिर असेल अशी भावना होती. परंतु देवीचे मंदिर पहिल्या डोंगरापासून तिस-या डोंगरावर असल्याचे कळले आणि आम्ही थक्क झालो.

“मनोकामना देवीच्या’’ पहिल्या डोंगर परिसरातील “इच्छेश्वर महादेव” डोंगराच्या पायथ्याशी सुंदर बाग बनविण्यात आली असून, तेथे अनेक रंगी-बेरंगी फुलांची झाडे, डोंगर माथ्यावरून पडणारे पाणी आणि पाण्याच्या बेटातून उडते कारंजे, फुलाफुलांवर उडणारे रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून, आमच्या प्रवासात आलेला थकवा कुठच्या कुठे पळून गेला. याच ठिकाणी “मनोकामना देवीच्या” मंदिरावर जाणा-या रोपवेचे आरक्षण कार्यालय असुन तेथेच बसण्याची व्यवस्था आणि प्रसाधन व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सर्वजण फ्रेश झालो, मुलांनी रोपवेने जाण्या-येण्याच्या अर्थात परतीची तिकीटे काढली आणि आम्ही “रोपवेच्या केबलकारमध्ये” बसून “मनोकामना देवीच्या दर्शनाच्या ओढीने आतूर झालो होते. “इच्छेश्वर महादेव” मंदिराच्या डोंगरापासून तिस-या डोंगरावर ही देवी आसनस्थ झाली आहे.

आम्ही रोपवे केबलकारने जात असतांना “हिमालयीन पर्वत रांगामधली हिरवीगार झाडे आणि निसर्गदत्त सौंदर्य पाहून थक्कच झालो. चोहोबाजूंनी मोठमोठ्या पर्वतरांगा आणि दोन्ही पर्वतांमधली खोलच खोल दरी पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. सुमारे पंधरा-वीस मिनिटांच्या “केबलकार” प्रवासानंतर आम्ही “मनोकामना देवीच्या” डोंगरावर पोहोचलो. रोपवे स्टेशन जवळून सुमारे १५ मिनिटे त्या टुमदार गावातील चढावाच्या सपाट रस्त्याने व पुढे पाय-याने चढून गेल्यावर मंदिर परिसरात पोहोचलो. या मंदिर परिसरात अनेक देवी देवतांची मंदिरे असून त्याठिकाणी पुजापाठ-अभिषेक करून घेण्यासाठी काही पुजारी मंडळी देवी दर्शनासाठी आलेल्या प्रवाशांच्या मागे लागतांना दिसून येत होते. मात्र आम्हाला पुजापाठ वा अभिषेक करायचे नाही, तर फक्त देवीचे दर्शन करायचे असे सांगुन ह्या पुजापाठ व देवीचे दर्शन ३५० रुपयात करून देण्याच्या मागणीला अव्हेरून आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. याठिकाणी फारशी गर्दी नसल्यामुळे आमचे काही मिनिटातच “देवीचे दर्शन” घेऊन झाले.

दर्शन झाल्यावर देवीच्या डोंगरावरून निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत घेत फिरत होतो. आश्चर्य म्हणजे एवढ्या उंचीवर “संत्र्याची बाग आणि झाडावर लगडलेली केशरी रंगाची संत्री पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ? मग आम्ही एक-एक-दोन दोन किलो बागेतील फ्रेश संत्र्यांचा आस्वाद घेत घेत पुढे चालत होतो. एव्हाना चार वाजत आले होते. सर्वांना भुका लागल्या होत्या. म्हणून आम्ही काही वेळेतच “रोपवे-केबल कारने “इच्छेश्वर महादेवाच्या” डोंगरावरील “एका चांगल्या हॉटेल मध्ये जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळेतच गरम-गरम भोजनाचा आस्वाद घेतला. आता संध्याकाळचे पांच वाजून गेले होते, पर्वत रांगाच्या उंचीमुळे ब-यापैकी अंधारून यायला लागले होते. त्यामुळे आम्ही काठमांडू परतीच्या प्रवासासाठी निघून सुमारे अकरा वाजेच्या सुमारास हॉटेलवर सुखरूप पोहोचलो.
क्रमश:

राजाराम जाधव

— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments