आज गुरुवार ऋषी पंचमीचा दिवस म्हणून सकाळी सकाळी “पशुपतीनाथाचे” दर्शन घेण्यासाठी आम्ही तयारी केली. पशुपतीनाथाचे मंदिर आम्ही मुक्कामाला असलेल्या हॉटेल एव्हरेस्ट रिजेंसीच्या जवळच चालत पांचसात मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे सर्वजण चालतच मंदिराकडे निघालो. या मंदिराचा परिसर फार विस्तीर्ण आणि गर्दीने तुडूंब भरलेला पाहून आश्चर्यचकीत झालो. कारण, नेपाळमध्ये ऋषी पंचमीला फार मानतात. म्हणून या ठिकाणी, महायज्ञ मुल समारोह समितीच्या माध्यमातून “श्रीमद्भागवत पुराण सप्ताह ज्ञानमहायज्ञ २०८०” आयोजित करण्यात आला होता. शिवाय या ऋषी पंचमीच्या निमित्ताने नेपाळच्या अनेक भागातून भक्तगण त्यांच्या लहान मुलांच्या मुंजीच्या मुंडन करून घेण्याच्या निमित्ताने आलेले असल्यामुळे या परिसराला मोठ्या जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे येथील गर्दितून वाट काढत काढत पुढे जात होतो. परंतु या भाऊ गर्दीत कोणाचा कोणाला थाक लागत नव्हता. चप्पल ठेवायची सोय केलेल्या स्टॅड पर्यंत सुद्धा आम्हाला पोहोचता आले नाही. दर्शनासाठी असलेली भल्ली मोठी रांग पाहून किमान संपूर्ण दिवसातही आपला दर्शनासाठी नंबर लागेल की नाही, असे वाटायला लागले. म्हणून आम्ही शेवटी शक्य झाल्यास संध्याकाळी “पशुपतीनाथाचे दर्शन घ्यायचे” असे ठरवून पुढच्या प्रवासासाठी निघण्याचे ठरवून आम्ही हॉटेलवर परतलो.
दुपारी “भक्तापूर सांघा आणि ढोलेश्वर दर्शनासाठी जाण्याचे ठरवण्यात आले होते. म्हणून सकाळचा नास्ता आटोपून “भक्तापूर सांघाच्या” दिशेने आमची बस निघाली. मात्र, रस्त्यावरची ट्राफिक, अरुंद रस्ते आणि डोंगरमाथा- घाटातून बस धिम्या गतीने जात होती. त्यामुळे भक्तापूर सांघाला पोहोचायला जवळ जवळ तीन वाजून गेले होते. या गर्दीच्या- घाटमाथ्याच्या रस्त्यावर आमच्या दोन्ही बसची चुकामुक झाली. आमच्या बसच्या ड्रायव्हरने आधी “भक्तापूर सांघाला” जायचे म्हणून तिकडे घेऊन गेले, तर दुसरी बस “ढोलेश्वरच्या” दिशेने गेल्यामुळे आमची चुकामुक झाली. परत ड्रायव्हरची फोनाफोनी झाल्यावर, एकमेकांचा त्रागा पाहायला मिळाला. पण आता त्रागा करून काय फायदा? त्यामुळे त्या दिवशी आमचे फक्त “भक्तापूर सांघाचे दर्शन झाले. भक्तापूर सांघाला महादेवाचे मंदिर असून महादेवाची उभ्या स्थितितील मुर्ती आहे. हे मंदिर उंच टेकड्यावर असल्यामुळे तेथे पाय-याने चढत-दोन टेकड्या जोडलेल्या झुल्याच्या पुलावरून जावे लागणार होते. दोन टेकड्यांना जोडलेला झुल्याचा पुल आणि अनेक पाय-या चढून जाण्याची आमची हिंमत झाली नाही. परंतु आमच्या सोबत असलेल्या तरूण जोडपे आणि आमच्या मुलांनी डोंगरावरील महादेवाचे दर्शन घेऊन येण्याचा निर्धार केला. ही तरूण मंडळी पाय-या चढून झुलत्या झुल्याच्या पुलावरून जातांना खूप आनंद घेतना दिसून येत होते. मात्र आम्ही चार-पांच जण गाडीतच न बसता आजूबाजुच्या निसर्गाचा आनंद घ्यावा म्हणून बाहेर पडलो.
मुळातच नेपाळ देशाला निसर्गाने भरभरून दिले असले तरी, इथल्या स्थानिक लोकांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी वळन रस्ता असल्यामुळे ट्राफिक जाम होतांना दिसत होती. त्यातच एक टाटा सुमो गाडी घाटातच बंद पडल्यामुळे वाहनांची तुफान गर्दी वाढली होती, तर या सुमो गाडीचा वाहन चालक केविलवाणे पणाने गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत होता. एवढ्या उंचीच्या ठिकाणी ट्रफिक पोलीस कसे असणार ? म्हणून त्याच गाडीतील काही तरूण मुलांनी व इतर वाहनातील प्रवाशांनी “जोर लगाके हैशा- एक धक्का और दो” म्हणत ही गाडी रस्त्याच्या कडेला घेतल्यावर मागच्या वाहनांचा रस्ता मोकळा झाला आणि मागची थांबलेली वाहने पुढे मार्गस्त होऊ लागली. ह्या सगळ्या गंमती-जंमती पाहत आम्ही एका झोपडीवजा दुकानाजवळ आलो. तिथे चहा, चॉकलेट, बिस्किट आणि मक्याची कणसे एका शेकोटीवर भाजून देण्याचा एका जोडप्याचा व्यवसाय सुरू होता. याठिकाणी थंडीचा मामला असल्यामुळे आम्ही आधी आमचे हात-पाय शेकुन घेतले. मग त्या जोडप्याला मक्याची कणसे कशी दिली म्हणून विचारणा केली. “ये बरा पचास रूपै और ए छोता चालीस रुपये भाव सांगितल्यावर आमच्या सोबतच्या मित्राने, “ये भुट्टा तीस रुपयेसे लगा दो ?” “ये बरा भुट्टा हे, उसके चालीस रुपै दिया तो भी नही मिलेगा ? देना हे तो पचास रुपै और ये छोटेका चालीस रुपै देना परेगा ?” मग हा ना करत आम्हाला मोठी कणसं चाळीस रुपयाप्रमाणे दिली. अशा थंडीच्या वातावरणात गरमागरम मक्याची कणसं खाण्याचा आणि गरमा गरम चहाचा आनंद आम्ही घेतला.
बराच वेळ झाला तरी मुलं आणि इतर प्रवाशी मित्र परत आले नाहीत म्हणून वाट पाहत बसलो. काही वेळाने मुलं आलीत, परंतु सोबतची माणसं आली नाहीत. इकडे पांच वाजून गेल्यामुळे अंधार पडत चालल्याचे दिसत होते. मग ही मंडळी साडेपाचच्या सुमारास आल्यावर आम्ही काठमांडूच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघालो.
सुमारे साडेसहा वाजता आमची बस हॉटेलच्या आवारात पोहोचली. संध्याकाळी संत सेवालाल महाराज जयंती आणि मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम, हॉटेल रिजेंसी प्रेसिडेंट थामेलच्या सभग़ृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रमाणे आम्ही हॉटेलवर पोहोचल्यावर फ्रेश झालो आणि तयारी करून खाली लॉबीमध्ये आलो. थोडा नास्ता आणि चहापाणी घेऊन कार्यक्रामाच्या ठिकाणी संध्याकाळी सुमारे ७.१५ च्या सुमारास पोहोचलो. तोपर्यत दुस-या गाडीने निघालेली मंडळी अद्याप पर्यंत तिकडे पोहोचली नव्हती. मधल्या काळात हॉटेलच्या मॅनेजर व त्यांच्या स्टाफची स्टेज आणि इतर कामकाज पूर्ण करण्याची धावपळ सुरू होती. दरम्यानच्या काळात दुस-या गाडीतील प्रवासी मंडळीबरोबर डॉ. संघर्ष सावळे आणि आयोजक मंडळींनी सोबत आणलेले साहित्य, फोटो, बॅनर, फुलांचे हार-पुष्प गुच्छ, समई व इतर साहित्याची मांडामांडी सुरू केली आणि त्यानंतर सुमारे ८.०० वाजताच्या सुमारास मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालक प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी माईक हातात घेतला आणि सभाग़ृहात शांतता पसरली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहूणे व विशेष अतिथींना व्यासपिठावर स्थानापन्न होण्याची विनंती केल्यावर ही सर्व मंडळी स्थानापन्न झाल्यावर प्रथेनुसार दीप प्रज्वलन, प्रतिमांना पुष्पहार आदी सोपस्कार पूर्ण झाले. डॉ. संघर्ष सावळे यांचे प्रास्ताविक मधून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्दीष्ट सांगतांना त्याच्या “साहित्यधारा बहूउद्देशीय सेवा संस्थेची” सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक जागृतीबरोबरच संत – महात्म्यांच्या जयंतीबरोबरच सर्व समाजातील साहित्यिक, विचारवंत, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश असतो. जेणेकरून अशा कार्यक्रमातून आपसुकच समाज जाग़ृती होऊन समाजात लेखक-कवी, विचारवंताच्या विचाराला वाव आणि प्रसिद्धी मिळेल. असे मौलिक विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केल्यामुळे त्यांच्या उपक्रमाबद्दल आमच्याही मनात एक आस्था निर्माण झाली.
याप्रसंगी बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगदगुरू सेवालाल महाराज यांच्या ऐतिहासिक आणि प्रथमच देशाबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरील जयंती महोत्सव साजरा करण्याची विनंती आम्ही केल्यामुळे डॉ. संघर्ष सावळेंनी होकारात्मक प्रतिसाद दिला ही अभिनंदनीय बाब आहे. त्यानंतर सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवारांची ओळख, त्यांचे सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वंकष माहिती उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांच्या समोर सुत्र संचालक हिवरे (बुदृक) येथील स्वामी विवेकानंद आश्रमातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांच्या ओघवत्या शैलीतून हा परिचय करून देतांनाच त्या त्या मान्यरांचा सत्कार शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या सत्कार समारंभा नंतर काही पुस्तकांचा प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू झाला.
सुरूवातीला माझ्या “हुंदके सामाजिक वेदनेचे” या सामाजिक विचाराच्या पुस्तकाचे प्रकाशन मा. नामदेवजी चव्हाण (सेवानिवृत्त न्यायाधीश) यांच्या व प्रा. डॉ. अशोक पवार यांच्या हस्ते डॉ. संघर्ष सावळे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. अशोक पवार यांच्या जगदगुरू संत सेवालाल महाराज, गोविंद गुरू बणजारा आणि शहिद बिलास अशा तीन ग्रंथाचे प्रकाशन मान. नामदेवरावजी चव्हाण, राजाराम जाधव आणि डॉ. संघर्ष सावळे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पध्द्तीने पार पडला.
यानंतर ज्या कार्यक्रमाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत होते तो “कवी संमेलनाचा कार्यक्रम मा. अॅड.विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. या कार्यक्रमात डॉ. खंदारे, डॉ. बबनराव महामुने, श्रीमती शोभा वेले,मी आणि इतर मान्यवरांनी अतिशय रसभरीत काव्य रचनांचे सादरीकरण केले. रसिक श्रोत्यांनीही या काव्य रचनांना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र अॅड. विजयकुमार कस्तुरे यांच्या “माझी लाडली” या काव्य रचना ऐकून रसिकांनी प्रेक्षागृह डोक्यावर घेतले. हास्यकल्लोळ आणि टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेले.
आता रात्रीचे अकरा वाजून गेले होते, सर्वांना भुकाही लागल्या होत्या. म्हणून कवी संमेलनाचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. शेवटी डॉ. संघर्ष सावळे यांनी आजच्या कार्यक्रमामुळे आमच्या नेपाळ पर्यटन सहलीची आठवण कायम स्मरणात राहील अशी भावना व्यक्त करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने कवी संमेलनाची सांगता झाली.
क्रमश:
— लेखन : राजाराम जाधव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800