Wednesday, September 11, 2024
Homeपर्यटनआमचे नेपाळ पर्यटन : ४

आमचे नेपाळ पर्यटन : ४

आज सकाळी सुमारे ११.३० वाजता हॉटेल एव्हरेस्ट रिजेंसी येथून बसने श्रीगरेश्वरी माता मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. काठमांडूतील तीच ट्राफीक, सिग्नल्स पार करून श्री गरेश्वरी माता मंदिराच्या परिसरात पोहोचलो.

नेपाळमध्ये गरेश्वरी मातेची आख्यायिका फार पुरातन आहे. बागमती नदीच्या किनारी या देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे दर्शन लवकरच झाले. या मंदिराची रचना आणि त्यातील अनेक कोरीव कलाकुसरीची रचना पाहून फार आश्चर्य वाटले. कारण, हे मंदिर फार पुरातन काळात बांधल्या गेले असतांनाही एवढ्या कलाकुसरीने ते बांधले गेले आहे, त्यावरून नेपाळचे अर्थात तत्कालीन भारतीय आर्टीटेक्ट – बांधकाम क्षेत्र किती आधूनिक दर्जाचे होते, याची खात्री पटते.

याठिकाणी आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे श्री गरेश्वरी माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. म्हणून भक्त मंडळी अनेक देशातून दर्शनासाठी येतात हेही ऐकायला मिळाले. म्हणूनच तेथे एक जोडपे आणि त्यांच्या सोबतचे तीन-चार लोकांच्या आणि ब्राम्हण पुजा-यांच्या साक्षीने जीवन भराच्या साथ संगतीची गाठ बांधून लग्नाच्या बेडीत अडकण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यात आम्ही सामील होवून व तेथे उभे राहून साक्षीदार होण्याचा योग आला. आमच्या मुलांनी फोटो सेशन केले. पुढे या नव दांपत्याना शुभेच्छा देवुन मार्गस्थ झालो.

आता आमचा जत्था बुद्ध पार्कच्या दिशेने निघाला, श्री गरेश्वरी माता मंदिर ते बुद्धपार्क सुमारे एक तासाचा रस्ता आहे. पुन्हा अरुंद रस्ता, ट्राफीक, सिग्नल्स पार करत करत आमची गाडी धापा टाकत धावत होती. या बुद्धपार्कच्या परिसरात सुमारे दोन वाजता पोहोचलो. बुद्धपार्कचा परिसर उंच टेकडीवर असल्यामुळे अनेक पाय-याने आपण वर चढू का? हा प्रश्न आमच्या काही साथीदार पर्यटकांच्या मनात आला. त्यांच्या म्हणण्याला आम्हीही दुजोरा दिला. मात्र, प्रथम या डोंगराच्या पायथ्याशी असलेली भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली भव्य मुर्ती, इतर तीन भक्तगणांची पद्मासनात बसलेल्या मुर्ती, जवळून वाहणारे पाण्याचे बेट आणि परिसरातील हिरवाई, शांत वातावरण पाहून आमच्या मनातही आनंद वाटला. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, अशा शांत, निरामय वातावरणात कशी समाधी लावून बसले असतील ? याबद्दल आमच्याही मनात कुतुहल निर्माण झाले.

आपण आता अनेक पाय-या चढून या उंच डोंगरावर जावे किंवा कसे हा प्र्श्न काही पर्यटक मंडळींच्या मनात आला असला, तरी मात्र काही मंडळींच्या सकारात्मक मानसिक तयारीने आमचा प्रश्न सोडवला. माझी अर्धांगिनी सौ ज्योती जाधव हिला पाठिच्या एल डिस्कचा आणि पाठीच्या मणक्यांचा त्रास असूनही आपण या अनेक पाय-या चढत या डोंगरावर जायचे आहे. हा तिचा निर्धार सांगतांना अनेक वृद्ध माणसे-महिला जर डोंगरावर पाय-याने चढून जात आहेत. मग आपण अजून तेवढे म्हातारे आहोत काय ? या एका वाक्याने आमच्याही मनात या उंच डोंगरावर पाय-याने चढून जाण्याचा निर्धार केला आणि पाय-यामागे पाय-या पार करून या उंच डोंगराच्या शिखरावर पोहोचलो. प्रथम या डोंगरावरील अनेक बुद्धकालीन छोटी मोठी दगडांची मंदिरे, त्यावरील रंगीबेरंगी कलाकुसरी पाहून थक्कच झालो.

मंदिर परिसरातही काही गडबड गोंधळ, लाऊड स्पिकरवर मोठ्या आवाजातील आरत्या, किंवा नारळ फुलांची दुकाने, दुकानदारांचा हार -फुले, नारळ पेढे विकत घेण्याचा, त्यायोगे आपल्या चपला सुरक्षीत राहतील असा सल्ला देणारे कोणी सल्लागार याठिकाणी शोधूनही दिसले नाहीत ? सगळीकडे आपापल्या पद्धतीने शांतपणे, संयमाने उभे राहून फक्त जोडून दर्शन घ्यावे, येथे कोणतीही दानपेटी मंदिराच्या समोर किंवा ताटात दक्षिणा टाकण्या साठी भक्तांकडे ट्क् लावून पाहणार भट-पुजारी दिसला नाही. आपण अनेक मंदिरात दर्शनासाठी जातो, तेंव्हा असे चित्र पाहायला मिळते काय ? आमचे तर शांत मनाने बुद्धदर्शन झाले. आता या उंच डोंगराच्या कडेवरून काठमांडू, नेपाळचे विहंगमक दृष्य पाहता आले. तिकडील डोंगराच्या उतारावरील आणि सपाट परिसरात वसलेले छोटे मोठे घर, कुठेतरी कारखान्याच्या उंच धुराड्याच्या चिमणीतून निघणारे धूर, अनेक अरूंद तर काही वळने घेत जाणारे मोठे रस्ते आणि दोन्ही बाजुने जाणारा वाहने दिसत होती. या टेकड्या- डोंगरावरची हिरवाई पाहून खूप छान वाटत होते. त्यामुळे आम्हाला इकडे आल्याचे समाधान वाटत होते.

पुढे चालत चालत काही दुकानांच्या परिसरात आलो. या ठिकाणी आम्हाला आश्चर्य वाटले की, एवढ्या उंच ठिकाणी हस्तकलेने आणि ओतीव कामातून बणविण्यात आलेल्या कासे-पितळीच्या घडीव काम केलेल्या अनेक वस्तु त्यांच्या दुकानातून विकायला ठेवण्यात आल्या होत्या. या वस्तु मौल्यवान आणि मोठ्या किंमतीच्या वाटत होत्या. म्हणून त्या विकत घेण्याच्या भानगडीत पडावे की नाही असे विचार मनात येऊन गेले. मात्र आपण एवढ्या लांब आलो आहोत तर काही तरी आठवण म्हणून घेण्यासाठी सौ ना सांगितले. मग तिही प्रथम चार-पांच दुकाने न्याहाळत फिरली, आणि मला म्हटले आपली नात आणि सुनांसाठी गळ्यातल्या हस्तकलेने बनविलेल्या खड्यांच्या-मोंग्याचे हार घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यासाठी दुजोरा दिल्यावरही पुन्हा चारपांच दुकानात जावून भाव काढले. तिला पसंत पडलेल्या चार-पांच हार काढून भाव विचारले, तेंव्हा बाराशे रुपयाला प्रती हार भाव सांगताच मला नको म्हणून दुकानातून काढता पाय घेतला.

ही आमची माघार पाहून दुकानदाराने पुन्हा आवाज देवून परत बोलावून, आपको क्या लगता है ? कितनेमे लेना है ये तो बताओ ? मग मीच सांगितले आप अगर रिझनेबली बताएंगे तो हम ले सकते है ? त्याने एक हजाराच्या पेक्षा कमी किंमतीने देणार नाही ? असे सांगितल्यावर आम्ही पुढे निघालो ? पुन्हा त्याने आप बतावो, तेंव्हा मी प्रती हार सातशे रुपयाप्रमाणे देईल ? तेंव्हा तो नऊशे-आठशे करत आम्ही सातशे रुपयाप्रमाणे पाच मोंग्याचे हार विकत घेतले. मग तिला आवडलेला मोंग्याचा हिरव्या-निळ्या रंगाचा हार तिच्या गळ्यात मोठ्या खुशीने घातला. मग मी तिला म्हणालो, हा तुला आवडलेला मोंग्याचा हार मला त्याच्या किंमतीपेक्षा तुझ्या चेह-यावरील आनंद मोठा किंमतीवान वाटतो. मग त्यासाठी मी पैशासाठी जास्त घासाघीस का करावी ? मग तिने खरी विचारी गृहीणी म्हणून टिपीकल उत्तर दिले, बाराशे रुपये प्रती हार सांगणारा दुकानदार आपल्याला सातशे रूपया प्रमाणे कां दिले ? त्याला परवडत असेल म्हणूनच ना ? माणसांकडे पाहून हे दुकानदार असेच ग्राहकाला लुटतात. हे वाक्य ऐकल्यावर मी काय बोलावे हेच कळत नव्हते. काही क्षण मी तिच्या चेह-याकडे पाहतच राहिलो “बिनव्यवहारी नवरा म्हणून”.

पुढच्या दुकानात न्याहाळतांना तिला कासेच्या सांध्यातून बनवलेली गाय-अन् तिच्या बछ्ड्याची कलाकुसरीने बनवलेली प्रतिमा-मुर्ती आवडली, तिने माझ्याकडे पाहून घ्यायची का ? तुला आवडली असेल तर घे ? कशाला पाहिजे तुला ? असे विचारल्यावर देवघरात ठेवायला. मग साधारण विचार करून भाव काढला, दुकानदाराने भाव सांगितले अडीच हजार, हा भाव ऐकल्यावर नकोय मला, घेऊ कधीतरी मुंबईला भरणा-या प्रदर्शनात किंवा गावी गेल्यावर दिसली की घेता येईल. ही नुसती वस्तुची किंमतीच नाही, तर बायकांचा जो संसारातील व्यवहारीपणा आहे, तो पाहून कोणताही माणूस थक्क होणार नाही का ?

आता घड्याळात तीन वाजून गेले होते. पोटात भूकेचा आवाज येत होता. पुन्हा या उंच डोंगरावरून पाय-यानेच खाली उतरायचे होते. मात्र चढन चढ्ण्यापेक्षा पाया-या उतरत जायला थोडे सहज आणि सोपे जाते. म्हणून पाय-यामागे पाय-या उतरून आम्ही पायथ्याशी आलो. खाली आल्यावर आमच्या सोबतची मंडळी एका झाडाखाली कट्ट्यावर बसून असल्याचे दिसले. त्यांनाही भूका लागल्याचे दिसून येते. मग आमचा मोर्चा जवळपासच्या ब-यापैकी जेवणाची व्यवस्था होईल अशा हॉटेलचा शोध घेवून आसनस्थ झालो. जेवणाच्या मेन्यु कार्डवरून नजर फिरवली कोणी काय घ्यायचे यावरच चर्चा रंगली. मग मुलांनीच त्यांचे आवडीचे जेवणाचे पदार्थ सांगितले आणि सिनियर मंडळींनी राईस प्लेटची ऑर्डर दिली. भुकेची वेळ झाल्यामुळे यथेच्छ जेवण केले. बाहेर पडल्यावर बस जवळ एकत्र आल्यावर हॉटेलच्या परतीच्या प्रवासाला निघालो.

आमच्या परतीच्या प्रवासात काठमांडू परिसरातील हिरवीगार हिरवाई न्याहाळत होतो. त्याच वेळी गाडीमध्ये नेपाळी भाषेतील सुमधूर गाणे ऐकत होतो. नेपाळी भाषेतील ते सुमधूर गाण्याचे बोल, “तेजाई कौन ना की जे मांझा, ओह मांझा” आणि “ओ गोरी चलते जा, सारेगामी चलते जा” यासारखी गाणे ऐकून आमचे कान तृप्त झाले होते. पाहता पाहता आम्ही हॉटेलच्या परिसरात येण्यापूर्वी “पशुपतीनाथाच्या” दर्शनासाठी उतरलो.

संध्याकाळचे सहा वाजत होते. “पशुपतीनाथाची” संध्याकाळी होणारी आरती काही क्षणातच सुरू होणार होती. तेथील गर्दी कालच्या मानाने कमी होती. ही आरती सुरु होण्यापूर्वी परिसरातील मंदिर दर्शन आणि बाहेरचे फोटो सेशन झाले. कारण पशुपतीनाथ मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. तेथे तैनात असलेले काही ड्रेसवरचे आणि साध्या ड्रेस् मधील सेक्युरीटी शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे मोबाईल आणि कॅमेरे बंद करायला लावून आतमध्ये सोडत होते. आम्ही पशुपतीनाथांच्या आवारात मागच्या बाजुला असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराजवळ पोहोचलो आणि काही वेळेतच त्या मंदिरातली आरती सुरू झाली. ती आरती संपल्यावर थोड्या वेळेतच “भगवान पशुपतीनाथांची” आरती सुरू झाली, धूप आरती, प्रसाद घेतला आणि “पशुपतीनाथांबरोबरच, भगवान श्रीकृष्णांच्या आरतीचा दुर्लभ लाभ मिळाल्याचा आनंद मनात घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.
क्रमशः

राजाराम जाधव

— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments