नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल चे नियमित लेखक, कवी, निवृत्त सहसचिव श्री राजाराम जाधव हे नुकतेच नेपाळ पर्यटन करून आले. दररोज वाचू या, त्यांच्या नेपाळ पर्यटनाचा सचित्र वृत्तांत…
– संपादक
आपल्या मनात कोणत्याही ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याची इच्छा असेल तर नक्कीच सवड काढून तसे नियोजन करता येते. मग ते आपल्या राहण्याच्या परिसरातील असो, राज्यातील वा परदेशातील असो, मग आपल्या आर्थिक कुवतीनुसार अशा ठिकाणी भेट देण्याचा विचार केला, तर अशा पर्यटनाचा आनंद आपल्याला घेता येतो. त्यासाठी आपल्याकडे असलेला पैसा, निवांत वेळ, ऋतुमान आणि आपल्या परिवारा बरोबरच आपले ओळखीचे, अनोळखीचे मित्रपरिवासह एखाद्या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून वा वैयक्तिक नियोजनातून अशा पर्यटनाच्या ठिकाणी जाता येते. हल्ली अशा स्थानिक व जागतीक स्तरावरील पर्यटनाचे आयोजन करणा-या अनेक संस्था कार्यरत आहेत.
नुकतेच छत्रपती संभाजी नगर स्थित पर्यटन संस्थेच्या माध्यमातून नेपाळ देशातील पर्यटनासाठी जाण्याचा योग आला. त्याला एक कारणही होते. या पर्यटन संस्थेचे प्रमुख डॉ. संघर्ष सावळे या अर्थशास्त्राचे संशोधक आणि सामाजिक विचाराने भारलेल्या तरूणाच्या मनात केवळ पर्यटनच नाही तर, या निमित्ताने समाजातील लेखक – कवींच्या साहित्याला एक बहूयायामी लिखानाची उंची वाढवण्याच्या दृष्टीकोणातून त्यांच्या सामाजिक लिखाणाला पुरस्कार देऊन गौरव करण्याचा फार मोठा संकल्प असल्यामुळे “साहित्यधारा बहूउद्देशिय सेवा संस्थेच्या” माध्यमातून देशात-परदेशात अशा पर्यटन सहलींचे आयोजन करत असल्याची भावना माझ्यासोबत बोलतांना डॉ. संघर्ष सावळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे मला खूप छान वाटले. पुढे माझ्यासोबत बोलतांना त्यांनी सांगितले की, साहेब, आपल्या सामाजिक विचारांचे लिखाण आम्ही नेहमीच वर्तमान पत्रात वा सोशल मिडीयावर वाचत असतो. आपले लिखाण हे सामाजिक विचाराने भारलेले असते म्हणून आमच्या पर्यटन संस्थेने आपल्याला “समाजभूषण साहित्यिक व लेखकाचा पुरस्कार” देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हे सांगतांना त्यासाठी आपल्याला नेपाळ येथे दिनांक ११ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयोजित सहलीला आमच्या सोबत यायचे आहे त्यासाठी नाममात्र व आपल्या सोयीचा प्रवास खर्च करावा लागेल. त्यावेळी मी विचारात पडलो की, माझी ओळख नसतांनाही ही व्यक्ती आपल्याल्या पुरस्कार देतो म्हणतात याची शहानिशा केल्याशिवाय आपण होकार कसा द्यायचा ? म्हणून मी त्यांना लगेच होकार दिला नाही. बघू या म्हणून सांगितले आणि माझा संवाद थांबवला.
या संदर्भात, छत्रपती संभाजीनगरला माझ्या ओळखीच्या प्राध्यापक डॉ. अशोक पवार या मित्राकडून डॉ. संघर्ष सावळे यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या पर्यटन संस्थेची माहिती जाणून घेतली. त्यावेळी या प्राध्यापक मित्राने मला संघर्ष सावळेबद्दल जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी थक्कच झालो. त्यांनी सांगितले की, संघर्ष हा माझा संशोधक विद्यार्थी असून तो अर्थशास्त्राच्या सुवर्णपदकाचा मानकरी आणि स्कॉटलंडचा संशोधक अंबॅसाडर आहे. त्यांचे अनेक संशोधन लिखाण आंतरराष्टीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. एवढेच नाही तर तो अगदी सामान्य परिवारातील मुलगा असल्यामुळे अनेक प्रसंगी आर्थिक मदत देत असल्यामुळे त्याने ही उंची गाठली असल्याचे सांगितले. त्यामुळे माझी खात्री पटली.
एक-दोन दिवसांनी पुन्हा डॉ. संघर्ष सावळेंचा मला फोन आला नी विचारले की, साहेब मला प्रा. डॉ. अशोक पवार सरांनी आपल्यासोबत बोलून आपला बायोडाटा आणि साहित्यिक लिखाणाचा तपशील मागवून घेण्याचे सांगितले आहे. मग काय करायचे ? त्यावेळी मी त्यांच्या संशोधनाचे आणि सामाजिक कामाच्या धडपडीचे कौतुक केले. कारण, आपल्या आजुबाजुला अनेक शिक्षित-उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांची फौज पाहून काही तरूण आई- वडिलांच्या आडोशाला राहून अंगात मरगळ ठेवून राहतात, तर काही विलाज नसलेली सुशिक्षित मुलं हाताला मिळेल ती कामे करून आपल्या परिवाराला आधार देत असल्याचे पाहत असतो. मात्र, संघर्षचे कौतुक यासाठी की, त्यांच्या वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्यावरही विधवा आई व लहान भावांची – परिवाराची काळजी घेत संघर्षने आपला लढा स्वत:च लढत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि अर्थशास्त्राचा सुवर्ण पदवीधारक, वाचस्पती, संशोधक होण्याचा संघर्षमय शैक्षणिक प्रवास पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आणि आम्ही नेपाळ देशाच्या पर्यटन सहलीसाठी येण्याचे मान्य केल्यावर त्यानेही आनंद व्यक्त केला.
एक आठवड्यानंतर पुन्हा संघर्षने फोन करून सांगितले की, साहेब, आमच्या “साहित्यधारा बहूउद्देशिय सेवा संस्थेने आपल्या सामाजिक साहित्य लिखाणाबद्दल “समाजभूषण साहित्यिक व लेखक” हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा स्विकार करण्याची विनंती आहे. त्यावेळी आम्ही अबोल झालो. त्यावेळी त्याने राहण्याच्या व्यवस्थेचेच पैसे भरण्याची अपेक्षा व्यक्त केली, पुरस्कारासंबंधीचा खर्च संस्था करेल असेही त्याने स्पष्ट केले. म्हणून आम्ही या पर्यटनासाठी होकार दिला.
पाहता पाहता ११ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. आमची एअर इंडीयाची फ्लाईट क्रमांक AI0806 मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते काठमांडू AI0215 मुंबईहून कनेक्टेड फ्लाईट सकाळी आठ वाजताची असल्यामुळे आम्ही ५.४५ वाजताच सीएसआय आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, येथे पोहोचलो. माझ्या सोबत माझी अर्धांगिनी सौ ज्योती जाधव आणि धाकटा मुलगा प्रतिक जाधव होता. सकाळी सकाळी विमानतळावर ये-जा करणा-या प्रवाशांची तुफान गर्दी पाहून अचंबा वाटला. पुढे आम्ही आमचे चेक इन आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून निवांत झालो. आम्ही ब-याच वेळा राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय मार्गाने विमान प्रवास केला असल्यामुळे बिनधास्तपणे सर्व गोष्टींची प्रक्रिया पूर्ण करून एअर इंडियाच्या विशिष्ट गेटजवळच्या बैठक व्यवस्थेच्या खुर्च्यात जावून बसलो.
एव्हाना ७ वाजुन गेले होते. काही वेळेतच विमान कंपनीच्या एक्झिक्युट्युवने विमानात बसण्यासाठी अनाउंसमेंट केली आणि सर्व उपस्थित प्रवासी आपापले तिकीट तपासणी करून पुढे जाण्यासाठी रांगेत उभे राहीले. त्याप्रमाणे आम्हीही रांगेत उभे राहिलो आणि काही वेळेतच विमान उड्डानासाठी तयार झाले. विमानात स्थानापन्न झाल्यावर फ्लाईट अटेंडंटने आणिबाणीच्या प्रसंगी काय आणि कसे तयार राहयला पाहिजे यासंदर्भातील सादरीकरण केले. मुंबई-दिल्लीचा प्रवास २.१५ तासाचा असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. अशा प्रकारे आमचा मुंबई –दिल्ली प्रवास झाला.
पुढे दिल्ली-काठमांडू प्रवासासाठी अशीच तपासणीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर दिल्ली विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विशिष्ट गेटजवळ स्थानापन्न झालो. ही काठमांडूची फ्लाईट दुपारी १२.४० वाजता असल्यामुळे नियोजित वेळेत तिकडे पोहोचलो होतो. मात्र काही प्रशासकीय कारणामुळे ही फ्ल्लाईट दुपारी ३.१५ वाजता सुटेल अशी माहिती तेथील इंडिकेटरवर दाखविण्यात आली. मात्र, यासंदर्भात कंपनीकडून काही ठोस माहिती प्रवाशांना दिली नाही. पुन्हा विमानाच्या उड्डानाच्या नियोजित वेळेत बदल करून ४.४५ वाजता विमान काठमांडूसाठी उड्डान करेल अशी अनाउंसमेंट करण्यात आल्यावर काही प्रवाशांनी तेथे गोंधळ घातला. त्यावेळी खरे कारण सांगतांना एक वैमानिक काही कारणास्तव विमानतळावर पोहोचले नाही, म्हणून दिलगिरी व्यक्त करून सर्व प्रवाशांच्या चहा नास्त्याची जाग्यावरच व्यवस्था केली. त्याप्रमाणे, AI0215 या फ्लाईटचे उड्डाण ४.४५ वाजता झाले आणि आम्ही काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरलो.
आमचे राहण्यासाठी आरक्षित केलेले हॉटेल एव्हरेस्ट रिजेंसी विमानतळाजवळच दहा मिनिटाच्या अंतरावर होते. तेथे काही मिनिटातच पोहोचलो. रिसेप्शन काऊंटरवरील मॅनेजरकडे आमची ओळखपत्रे दाखवून एक्ज़िक्युटीव रूम्स ताब्यात घेतल्या. बॅगा एका बाजुला ठेवल्या आणि संपूर्ण दिवसभराच्या थकव्यामुळे कॉटवर निवांतपणे झोकून दिले. काही वेळ आराम केल्यावर फ्रेश झालो आणि रात्रीच्या जेवणाचा कॉल आला. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आमच्या सहप्रवाशांसह सर्वांनी यथेच्छ जेवण केले. सहप्रवाशांसोबत ओळख परिचय झाला. तेथे थोडावेळ गप्पागोष्टी करत थांबलो आणि काही वेळेतच निद्रादेवीच्या कुशीत पहूडलो.
क्रमशः
— लेखन : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800