Saturday, July 20, 2024
Homeलेखआयुष्याची जमापुंजी

आयुष्याची जमापुंजी

मनुष्य आपले जीवन सुखी, यशस्वी करण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. जगतांना अनेक अनुभव येतात. सुखदुःख, यश अपयश मिळते. आपल्यावर निस्सीम, निस्वार्थ प्रेम करणारे रक्ताचे किंवा कुठलेही नाते नसतांना जीव लावणारे हितचिंतक लाभतात. हे सगळे अनुभव म्हणजेच आयुष्याची जमापुंजी ! शिवाय जगण्यासाठी आर्थिक सुबत्ता हवीच ! म्हणून आयुष्याच्या संध्याकाळी परावलंबी जीवन आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून थोडीफार आर्थिक बाजूही भक्कम हवीच!

संसार चालवितांना अनेक विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करता करता आयुष्य निघून जाते. कुणावर लक्ष्मीचा वरदहस्त! तर कुणाच्या नशिबी कायम लक्ष्मीने पाठ फिरवलेली ! आर्थिक चढउतार हे तर जीवनाचे खास वैशिष्टय ! सगळे आलबेल असतांना स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असतांनाही कुणाचे जीवन सगळ्यांची हाजीहाजी करण्यात निघून जाते. स्वतःसाठी जगणे होतच नाही. शरीर थकल्यावर त्याला वाटते की अरे, आपण इतके कष्ट केले, स्वतःचे मन मारून केवळ दुसऱ्यासाठी जगलो, शेवटी काय मिळाले मला ? काय गमावले व काय कमावले हा आयुष्याचा जमाखर्च विचारात घेतला जातो.

मंडळी हा विचार म्हणजेच आयुष्याची जमापुंजी ! पैसा आज आहे, उद्या नाही ! प्रकृती आज ठणठणीत असेल पण उद्या कुणी पाहिला ? मग आयुष्याची जमापुंजी मोजणारे एकक काय ? तर माझ्या मते आयुष्याच्या संध्याकाळी जर मन शांत, संतुष्ट, समाधानी असेल तर खऱ्या अर्थाने आयुष्यात काही मिळविले, जमा केले असे होईल. मानसिक समाधान हेच महत्वाचे ! उतरत्या वयात गरजाही पूर्वीपेक्षा कमी झालेल्या असतात. व्यवस्थित जेवण, आवश्यक ती औषधे मिळावी व त्यासाठी येणारा खर्च करण्याची स्वतःची आर्थिक स्थिती असणे इतकीही जमापुंजी संतुष्ट राहण्यासाठी पुरेशी असते.

माझ्या मते या वयात आयुष्याची जमापुंजी कोणती तर पूर्णपणे मानसिक समाधानी वृत्ती ! हेवेदावे भांडण तंटे नसणे ! ईश्वरावर श्रद्धा ठेवून उरलेले आयुष्य आनंदाने घालविता येणे हीच खरी आयुष्याची जमापुंजी ! सगळ्यांना आनंदी ठेवणे आहे त्या परिस्थितीत, ठेवीले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान ही खरी जमापुंजी.

मी जेव्हा स्वतःबद्दल विचार करते की, आपली जमापुंजी काय ? जीवनात उदभवणाऱ्या नेहमीच्या गरजा तर पूर्ण झाल्याच! काही सुखदुःखाचे, मानहानीचे प्रसंगही आलेत. ते सगळ्यांच्याच जीवनात येतात. पण माझी जी जमापुंजी आहे तिच्यापुढे हे सगळे अप्रिय मुद्दे मला खूपच गौण वाटतात. आयुष्यात अनेक अशा व्यक्ती भेटल्या की ज्यानी माझ्यावर निर्हेतुक प्रेम केले मला मानसिक आधार दिला, जीवनाच्या ह्या प्रवासात निस्वार्थ प्रेम करणारे मला आपले म्हणणारे मायेने विचारपुस करणारे व स्वतःच्या भावना व्यक्त करणारे, माझ्याजवळ मन मोकळे करणारे अनेक प्रवासी मला भेटले हीच माझी जमापुंजी आहे. ही जमापुंजी इतकी मोठ्ठी आहे की त्याची गणना कोणत्याच मापकाने नाही करता येणार. ही माझी प्रिय स्नेही मंडळी सतत मला आनंद देण्याचा, प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांचा काहीही फायदा नसतांना मनापासून माझ्यावर मला आपली समजतात, प्रेम करतात.

ही यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजात वावरताना किती जणांशी मनाचे नाते जुळले आहे हीच खरी आयुष्याची जमापुंजी !! आणि ह्या मानसिक अलोट सुखाच्या जमापुंजीने माझे भावविश्व समृद्ध आहे. ही जमापुंजी अशी आहे की दुसऱ्यासाठी कितीही खर्च केली तरी ती कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे ! या जमापुंजीच्या जोरावर मी खूप सुखी समाधानी आनंदी आहे.
पटतयं का तुम्हाला ?

प्रतिभा पिटके

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments