महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’आविष्कार-2023-24’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवाचे दि. 12 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, ’आविष्कार-2023-24’ आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचे उद्घाटन दि. 12 जानेवारी 2024 रोजी विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार श्री.हसन मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी याकरीता विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल यांच्या प्रेरणेतून ‘आविष्कार’ संशोधन महोत्सव साकार झाला आहे. मा. कुलपती कार्यालाने ‘आविष्कार 2023-24’ या आंतरविद्यापीठ स्तरीय सोळाव्या संशोधन प्रकल्प महोत्सव आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सोपविली आहे.
या अनुषंगाने संशोधन महोत्सवात राज्यातील 24 विद्यापीठांमधून अंदाजित दीड हजार विद्यार्थी व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सुमारे 950 पेक्षा अधिक विद्यार्थी या संशोधन प्रदर्शनात सहभाग नांेदविणार आहेत. तसेच आपले संशोधन प्रकल्प व प्रतिकृतिंचे प्रदर्शन मांडणार असून आपले संशोधन कौशल्ये, भित्तीपत्रके, प्रतिकृती, प्रकल्प व दृकश्राव्य सादरीकरण या विविध माध्यमातून सादर करणार आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, या संशोधन महोत्सवामध्ये विविध संवर्गातील मूल्यमापन करणे सोयीचे व्हावे म्हणूण सर्व अभ्यासक्रमांची सहा संवर्गामध्ये विभागणी केली आहे. त्यात
1. मानव्यविद्या, भाषा व ललीतकला
2. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी
3. विज्ञान
4. शेती आणि पशुसंवर्धन
5. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
6. वैद्यक व औषध निर्माणशास्त्र
हे सहा संवर्ग आहेत. या संवर्गामध्ये संशोधन प्रकल्प व सादरीकरण होणार आहे. या संवर्गामध्ये पदवीपूर्व (युजी), पदव्युत्तर (पीजी), निष्णात (पोस्ट पीजी, एम.फिल./पीएच.डी.) अश्या तीन स्तरावर सहभागी होऊन संशोधन प्रकल्प सादर करतील. या संशोधन महोत्सवात मांडण्यात येणाऱ्या विविध संशोधन प्रकल्प पात्र होण्यासाठी राज्यातील 24 विद्यापीठांमधून आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यापीठातर्फे स्वतंत्र संघ निवडण्यात आलेल असून तो या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी तीन फेर्यांमधून मूल्यमापन करण्यात येईल संवर्गनिहाय मान्यवर परीक्षकांकडून संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन झाल्यानंतर विविध पैलूंबाबत चर्चा होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल. या प्रकल्पाचे परीक्षकांकडून मूल्यमापन करतांना सदर संशोधनातील नाविन्यता, सादरीकरण, मूळ कल्पना, उपयोजित मूल्ये व समाजाला याचा होणारा उपयोग अशा विविध कसोटयांवर मूल्यमापन करुन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक संवर्गनिहाय प्रकल्पांना प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे तसचे स्पर्धेत सर्व सहभागींना दि. 15 जानेवारी 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे यांनी सांगितले की, विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार’ संशोधन महोत्सवात सहभागी विद्यार्थी, शिक्षक व परीक्षकांकरीता विद्यापीठाकडून निवास, भोजन व वाहनांची सुविधा करण्यात आली आली आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी व संलग्नीत महाविद्यालयांचे प्रतिनिधींची विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. ‘आविष्कार 2023-24’ आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4ः00 वाजता विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आविष्कार 2023-24’ आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचा दूरध्वनी क्र. 0253-2539173 किंवा 2539174 यावर संपर्क साधावा. या राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800