Wednesday, April 23, 2025
Homeपर्यटनइंग्लंड : वसंतॠतू

इंग्लंड : वसंतॠतू

पुण्यातल्या घरी, एक दिवस सकाळी सकाळी डोअरबेल वाजली आणि मी डोळे चोळत दरवाजाकडं गेलो. इतक्या सकाळी कोण आलं असेल ? दरवाजा उघडून पाहिलं आणि पत्नीला हाक दिली.
“तुझ्याकडं कोण तरी बाई आल्यात”.
“दुपारी यायला सांगा त्यांना”.
“आत्ताच तुझ्याशी बोलायचंय त्यांना”.
पत्नी काहीशी चरफडतच बाहेर आली.तिने बघितले तर दारात आमची मुलगी, सायली उभी होती. इंग्लंडवरून ती आली होती. तिला पहाताच, लगबगीनं पत्नीनं तिच्या बॅगा घरात घेतल्या. तिच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता.
“आधी सांगितलं का नाही गं बाळा ?”
“सरप्राईज दिलं तुम्हाला”.
“जा अशीच बाथरूममध्ये. हातपाय धुवून घे.मी तुला मस्तपैकी काॅफी आणि नाष्टा करते”.

सायली जवळपास महिनाभर पुण्यालाच होती. ती फेब्रुवारीत परत जाणार होती.
“आईपप्पा, तुम्ही माझ्यासोबत तिकडं चला”.
“बाळा, दोन चार दिवसांत आमची मनमंथन साहित्य ग्रुपच्या वार्षिक साहित्य संमेलनाविषयी ऑनलाईन सभा आहे. या वेळेलाही मी जाणार आहे. ते संमेलन फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्यात असेल . त्यामुळे मला थांबावं लागेल”. काहीशा नाराजीनंच सायलीनं ‘हो’ म्हटलं.

मनमंथनची सभा झाली आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात नागपूरजवळ ‘माहुली अॅग्रो टुरिझम रिसॉर्टवर’ या वर्षाचं तिसरं साहित्य संमेलन आयोजित करण्याचं ठरलं.

नागपूरला जाण्याचं आणि परतीचं विमानाचं तिकीट सायलीनंच ऑनलाईन काढलं.

नागपूरला यापूर्वी मी दोन तीन वेळा गेलो होतो. या वेळी नुकताच वसंत ऋतू सुरू झाला आणि त्यात एका निसर्गरम्य रिसॉर्टवर साहित्य संमेलन ! नागपूरच्या संत्रा बर्फीसारख्या गोड आठवणी घेऊन मी परतलो.

आम्ही मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवडय़ात सायलीकडं जायचं ठरवलं. १२ तारखेला पहाटे मुंबईहून ‘व्हर्जिना अटलांटा’ फ्लाईटनं जायचं आमचं तिकीट सायलीनंच काढलं होतं.

आदल्या दिवशी सायंकाळी पुण्याहून निघून मुंबईला जायचं; पहाटेच्या फ्लाईटनं लंडन ! आम्ही सगळी आवराआवर करत होतो. अचानक सायलीचा व्हिडिओ काॅल आला.”व्हर्जिना अटलांटा फ्लाईटला काहीतरी इश्यू झालाय. तुमचं ते बुकिंग कॅन्सल केलंय”.
“मग ?”
“त्याऐवजी १२ तारखेला दुपारी एकच्या ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाईटमध्ये तुमचं बुकिंग केलंय.”
एखादी एस्टी कॅन्सल झाल्यावर दुसऱ्या एस्टीत सीट मिळाल्याचा अनुभव पूर्वी होता.’पदरी पडलं…’ असं म्हणून आम्ही त्या फ्लाईटच्या दृष्टीनं तयारी करून १२ मार्चला मुंबईहून निघालो.
रात्री आकराच्या सुमारास (इथल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता) हिथ्रो विमानतळावर पोहोचलो. इथं आलो तरी, मनाने आपण तिकडचे असतो.

इथं आलो तर मरणाची थंडी. विमानात अनेक चित्रपट थोडेथोडे पाहिले. त्यात ‘श्यामची आई’ हा नवीन चित्रपट होता. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला म्हणून साने गुरूजींना बर्फावर झोपवून इंग्रजांनी त्यांचा छळ केला होता. ‘बर्फावर झोपवणे’ ही शिक्षा कशी होते हे मला इथली थंडी अनुभवली तेव्हा समजले. आपल्याकडं ‘होळी जळाली थंडी पळाली’ असं म्हणतात. इथं उलट !

सायंकाळी विमानतळावर उतरून सोबतचे सामान घेऊन बाहेर पडलो. सायली आम्हाला न्यायला विमानतळावर आली होतीच. सायंकाळची वेळ असूनही मध्यरात्र झाल्यासारखं सगळीकडं वातावरण सुनसान होतं.

पुस्तकांतून ‘गुलाबी थंडी’ हा शब्दप्रयोग वाचला होता.मात्र ही थंडी काळीकभिन्न वाटत होती. चाकू, तलवार अशी शस्त्रं तीक्ष्ण असतात हे माहीत होतं. ही थंडीही अशीच धारदार, तीक्ष्ण वाटत होती.
लहानपणची एक आठवण झाली. आमच्या गावी दर गुरुवारी जवळच्या ओतूर गावचा आठवडे बाजार असायचा. म्हणून त्या दिवशी शाळा सकाळची असायची. ऐन थंडीत दूरवरच्या वाड्यावस्त्यांवरून अनेक मुलं-मुली पायी चालत शाळेत येत असत. अंगात स्वेटर, लोकरीची टोपी नसायची. थंडीनं ओठ फुटलेले. अशा अवस्थेत कुडकुडत ते शाळेत येताना मी पाहिले होते. त्यांना काय वेदना होत असतील ?
साधारणत: तासाभरचा उबेरमधून प्रवास करून आम्ही सायलीच्या घरी पोहोचलो.

प्रवासानं शिणलो होतो. मात्र हातपाय धुवायचीही इच्छा नव्हती. कपडे बदलून हाॅलमध्ये बसलो. रात्रीचे अवघे नऊच वाजले होते तरीही, डोळ्यावर झोप आली होती.
सायलीनं तिच्या हातानं गरम चहा करून आणला. तो वाफाळलेला चहा पिताना सगळी थंडी आणि थकवा कधी निघून गेला समजलंच नाही.
पण आता इथे आहे तो पर्यंत तरी थंडीशी दोस्ती करावी लागणार होती !

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे. ह. मु. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता