Sunday, April 21, 2024
Homeलेखउंट...

उंट…

नुकतेच सुरू झालेलं इंग्रजी वर्ष २०२४ हे युनेस्को तर्फे camelids म्हणजे उंट वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
– संपादक

जगात उंट हा अत्यंत विपरीत परिस्थितीतही जगु शकणारा प्राणी, विशेषतः वाळवंटात आढळणारा व तेथील लोकांचा आधार. पण हाच उंट आणि त्याची प्रजा आता हळूहळू कमी होत चालली आहे. मागील दहा वर्षात ऊंटांची संख्या ३७% ने कमी झाली आहे. पण ऊंटावरून शेळ्या मेंढ्या हाकणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

भारतात ९४ टक्के ऊंट राजस्थान तर बाकी गुजरात आणि इतर राज्यात आढळतात. रेती मध्ये ताशी ६० कि. मी वेगाने पळणारा एकमेव प्राणी असल्यानेच ऊंटाला वाळवंटातील जहाज ही उपमा दिली जाते .सामानाच्या वाहतूकीसाठी उंट वाळवंटात अत्यंत उपयुक्त. ऊंटांच्या पायाची पसरट घडण त्याला रेतीवर चालायला मदत करत असते. राजस्थानच्या वाळवंटात सीमेवर बीएसएफची खास कॅमल बटालियन आहे. ऊंटावरून सीमेची देखभाल होत असते.

अन्न व पाण्याशिवाय चार चार दिवस जगु शकणारा प्राणी म्हणजे उंट. एकाच वेळी ५०/६० लिटर पाणी पोटात साठवून ठेवण्याची त्याची क्षमता असते. मदार म्हणजे ऊंटांच्या पाठीवर असणारा उंच कुबड सारखा मांसल भाग. त्यात ऊंट चरबी साठवून ठेवतो व ह्या चरबी वर १५ दिवस जगतो. ह्या मदार वर त्याची जगण्याची मदार असतें. काही ऊंट दोन कुबड म्हणजे मदार असलेले आढळतात.

बुद्धीबळातला ऊंट तिरपा चालतो पण प्रत्यक्षात मात्र तसा ऊंट सरळ मार्गी. फक्त बहुतांशी वेळा मान तिरपी ठेवून चालतो. १२/१५ फुट उंच व साधारण ५००/५५० किलो वजनाचा असतो. आजकाल ऊंटाचा वापर मुलांना समुद्र किनारी फेरफटका मारायला असतो एवढंच माहिती. ऊंटाला संस्कृत मध्ये ऊष्ट्र म्हणतात. ऊष्ट्रासन हे आसन म्हणजे ऊंटासारखा आकार निर्माण करणे.

ऊंटणीच्या दुधाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. तसं दुध पिण्या योग्यच नव्हे तर औषधी असते. ऊंटणीच्या दुधाने मधुमेह बरा होतो म्हणूनच ऊंटणीचे दुध ₹६०० ते ₹२५०० पर्यंत विकले जाते. म्हणूनच कदाचित ऊंटणीच्या दुधाला पांढरे सोने म्हणतात. राजस्थानच्या जैसलमेर येथे ऊंटणीच्या दुधाची डेअरी आहे व तेथून ते विक्री साठी बाहेर ही पाठविले जाते.

दुसरं म्हणजे ऊंटांच्या अश्रूंची किंमत. ऊंटांच्या अश्रूंमध्ये सापाच्या विषाला नामोहरम करण्यासाठीचे ॲंटी डोट्स आढळतात. ऊंटांच्या डोळ्यात कधी इंफेक्शन होत नाही म्हणजे ऊंटाला डोळे येत नाही.

ऊंटांची स्वारी करणे एक मजेशीर व आनंद दायक अनुभव. ऊंटाचं बसणं हे एक अनिश्चित असते कधी उजवा पाय दुमडून तर कधी डावा पाय दुमडून बसतो म्हणूनच हिंदीत ऊंट कीस करवट बैठेगा अशी म्हण प्रचलित आहे.

बघुया २०२४ हे निवडणूकांच ही वर्ष आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये पार्लमेंटच्या तर अमेरिकेत अध्यक्ष पदांची निवडणूक आहे. तसेच इतर आठ राज्यांचा विधानसभेच्या निवडणुका आहेत. म्हणूनच कदाचित ह्या अनिश्चिततेचे व्यवस्थित उदाहरण ऊंट कीस करवट बैठेगा असं असल्याने ह्या वर्षाला ऊंट वर्ष म्हणून घोषित केले असावे.

ऊंटावरचा शहाणा अशी अजून एक उक्ती आहे. मुर्खा सारखा सल्ला देणाऱ्या महाभागां साठी वापरली जाते. आता याचात ऊंटाला उगीच दोष नसताना लपेटून घेतले आहे. अर्थात मुर्खाला पाठीवर बसवले म्हणून असावे.

तर अशा ह्या प्रजाती कडे लक्ष वेधण्यासाठी व नामशेष होण्यापासून वाचवण्याचा हेतूने २०२४ हे वर्ष ऊंटांना समर्पित केले आहे. तसे ऊंटाकडून शिकण्यासाठी बरंच काही आहे. विशेषतः प्रतिकूल परिस्थितीत ही कसे जगावे हे आपण ऊंटा कडून शिकुया. फक्त ऊंटावरचा शहाणा न बनता.तर अशा ऊंट वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रकाश शर्मा

— लेखन : ओमप्रकाश शर्मा. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments