उच्च शिक्षण हा विकासाचा पासपोर्ट आहे. त्याचा विस्तार झालेला असला तरी गुणवत्ता वाढलेली नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना जागरूक राहून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरून प्रयत्नपूर्वक विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केले.
ज्ञानदीप शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात प्रा. डॉ. डी. एन. मोरे लिखित ‘उच्च शिक्षण धोरण : आव्हाने आणि दिशा‘ या ग्रंथावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. श्यामल पत्की, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ. सूर्यकांत जोगदंड, नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, प्राचार्य डॉ. श्रीमती कुसुम मोरे, सौ. सुनीता मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.गव्हाणे पुढे म्हणाले की, सरकार शिक्षण क्षेत्रातून काढता पाय घेण्याची भूमिका घेत आहे. शिक्षण खाजगी क्षेत्राच्या ताब्यात देण्याची भूमिका घेत आहे. पण खासगी व सरकारी या दोन्ही शाळा सुरू राहायला हव्यात. त्यांच्यात निकोप स्पर्धा असावी. त्यातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. यातून देशाचा आणि राज्याचा विकास होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 हे अत्यंत प्रभावी आहे, पण त्याची प्रभावी अमंलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यात जीडीपीच्या 6 टक्के आर्थिक तरतूद करावी लागते, ती केलेली दिसून येत नाही. पुरेसा शिक्षक वर्ग नेमावा लागत असतो, शाळांमध्ये उत्तम प्रकारच्या सोयी-सुविधा असणे गरजेचे आहे. ग्रंथालये असावी लागतात. पण दुर्दैवाने अशी व्यवस्था आपल्याकडील हजारो शाळांमध्ये असल्याचे दिसत नाही. नवीन शैक्षणिक धोरण तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.आरोग्य व शिक्षण या दोन विषयांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. उत्तम दर्जाच्या सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत योग्य ते प्रशिक्षण न दिले गेल्याने प्राध्यापक वर्ग संभ्रमात आहे. सरकारने या प्रकरणी योग्य पाठबळ दिले तर हे उत्तम प्रकारे राबवले जाऊ शकते.
समाजातील सर्व घटकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून हे काम हाती घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर डॉ.डी.एन.मोरे यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या पलीकडे जाऊन उच्च शिक्षणात विशेष रस घेवून लिहिलेले पुस्तक म्हणजे मराठीतला सर्वांत उत्तम ग्रंथ आहे. त्यात विचारांची स्पष्टता, अभ्यासाची सखोलता आणि गुणवत्तेची मौलिकता आहे. डॉ.मोरे हे अभ्यासूपणे सातत्याने या विषयावर लिहित आले असून 150 व्याख्याने देखील दिलेली आहेत. एक ग्रंथ म्हणून 12 विषयांची केलेलो मांडणी आणि चिकित्सा करण्याची वृत्ती अभिनंदनीय असल्याचेही डॉ.गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. चासकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण सर्वांनी प्रभावीपणे राबवावे. त्यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करील असे सांगितले.
डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
डॉ. मोरे यांनी प्रस्ताविकातून आपला पुस्तक लेखन प्रवास सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संदीप काळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संगीता अवचार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्ता सावंत, डॉ. तुकाराम हापगुंडे, डॉ. रोहिदास नितोंडे, डॉ. बाजीराव वडवळे, प्रा. संदीप गायकवाड, डॉ. मुकुंद कवडे, डॉ. दत्ता यादव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी माजी आ.गंगाधर पटने, जगदीश कदम, प्रा.बालाजी कोम्पलवार, दीपनाथ पत्की, उपप्राचार्य डॉ अशोक सिद्धेवाड, नवनिहालसिंग जागीरदार, प्रा.डॉ.दिलीप चव्हाण, डॉ. मा.मा. जाधव, प्राचार्य डॉ कणसे, डॉ. विना पाटील, प्राचार्य अशोक गवते, प्राचार्य डॉ. कामळजकर, प्राचार्य करुणा देशमुख आदींची उपस्थिती होती.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800