एकदम बालपणात कापडण्याला गेले मी नि मला माझा आठवणीतला गाव दिसू लागला. दिवाळी म्हणजे खरिपाचा हंगाम. माझ्या बालपणी मी शेतात बाजरी, ज्वारी, कापूस शेंगा, हिवाळ्यात रब्बीच्या हंगामात गहू, हरबरा अशी डोलणारी पिके पाहिली आहेत. हिरव्यागार गवताळ बांधावरून आम्ही शेतात पोहचत असू. पाऊस इतका लहरी नव्हता. पिके बरी येत असत. ज्यांच्याकडे बऱ्यापैकी जमिनी असत ते शेतकरी खाऊन पिवून सुखी होते. त्यात आमचे ही कुटुंब होते.वडिलांची खादी भांडारातली नोकरी व राजकारण, जोडीला शेती असे बऱ्यापैकी चाललेले असे. घरात खाण्यापिण्याची सुबत्ता होती. गावचे राजकारण व समाजकारण पूर्ण वडिलांच्या हाती होते.
आजूबाजुला जशी सुखी कुटुंबे होती तशी निव्वळ हातावर पोट असणारी कुटुंबेही होती. वयाने लहान असले तरी सारे बघत होते. तेंव्हा नाही पण आज त्याचा अन्वयार्थ लावता येतो आहे. आमच्या घरी कपाशी वेचायला बायकांना (मजुरीने)
बोलवायला, मुकादम महिलेला तसे सांगायला मला जावे लागे की उद्या कापूस वेचायला इतक्या बायका हव्यात. ऐन दिवाळीतली ही गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे. मग ती मुकादम महिला ज्यांच्या ज्यांच्या शेतात वेचणी आहे तिथे तितक्या महिलांना पाठवत असे. विचार करा, आजची आपली दिवाळी व ह्या कष्टकरी महिलांची तेंव्हाची दिवाळी अशी ऐन दिवाळीत रोज कामाला (व्हका म्हणजे बोलावणे) येईल ना ? ह्या चिंतेत जात असे. सकाळी १० ते ५ दिवसभर कापूस वेचायचा तेव्हा दिवसाला १ रूपया रोज मिळत असे. तो ही खूप वाटत असे असा तो जमाना होता. घरी निघतांना चूल पेटवण्यासाठी सरपण गोळा करत यायचे. त्याची मोळी डोक्यावर घ्यायची व घरचा रस्ता धरायचा! घरात गेल्या बरोबर चिल्यापिल्यांसाठी चूल पेटवायची व भाकरी थापायच्या ! ह्यांची कसली हो दिवाळी ? ऐन दिवाळीत रोज काम मिळाले तर पोटात पोटभर भाकरी पडणार नाही तर फाका ! असे ह्यांचे जीवन मी पाहिले आहे. कसली दिवाळी नि कसले काय ?
हातावर पोट असणारे हे सारे समाजातील उपेक्षितच ना ? रोजच्या भाकरीची मारामार होती तेंव्हा यांना पक्वान्ने कशी
मिळणार ? आणि नवे कपडे ? बाप रे ! तो विचार तर मनालाही शिवत नसे. आम्ही पण दिवाळीसाठी नवे कपडे शिवलेले व
घातलेले मला आठवत नाही. ही सगळी थेरं (पैसे उडविण्याची) नव्या जमान्यातील आहेत. तेंव्हा असे काही वातावरणच नव्हते. लेकी माहेरी यायच्या व आई बरोबर रोज रोजगाराला जायच्या. मगच त्या पैशातून एखादे लुगडे पोलके तिला मिळत असे. सारी कष्टकऱ्यांची उपेक्षितांची दुनिया मी फार जवळून पाहिली आहे. अजून याहून भयानक उपेक्षित होते ज्यांना समाज व्यवस्थेनेच नाकारले होते, त्यांची वस्ती तर गावापासून लांब एका कोपऱ्यात असे ज्यांना तेंव्हा किमान माणूस म्हणून
जगण्याचा अधिकारही कर्मठ समाजाने नाकारला होता. त्यांची स्थिती तर अत्यंत दयनिय होती. मंडळी जवळ जवळ ६०/६५ वर्षांपूर्वीचे सामाजिक वास्तव मी तुमच्या समोर मांडते आहे हे लक्षात घ्या.
पण, माझे वडिल फार मोठे स्वातंत्र्य सैनिक व अत्यंत पुरोगामी विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी गांवकुसा बाहेरील लोकांनाही सतत आपल्या सोबत बाळगले व त्यांचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला व तेच बाळकडू आम्हा भावंडांच्याही
नसानसात मुरले. आमच्या देवडीत सर्व जाती धर्माची मंडळी मांडीला मांडी लावून बसलेली असत. आजही ते दृष्य मला
डोळ्यांसमोर जसेच्या तसे दिसते. पूर्ण गावाचाच वसा व विडा वडिलांनी उचलला होता व त्यांना कोर्टात न जाता आमच्या
घरीच न्याय मिळत असे, मग प्रश्न कोणताही असो. त्यामुळे गावातल्या उपेक्षितांनाही आपण उपेक्षित असल्याचे या अर्थाने
जाणवले नाही अर्थात गरिबीशी लढाई होतीच जी अजूनही खेड्यापाड्यात बऱ्याच उपेक्षितांच्या नशिबी आहे व आपल्याकडे आदिवासी पाडे व झोपडपट्यातून हा प्रश्न गंभीर आहे.
म्हणून मी आता जाणतेपणी या समस्येकडे बघते व त्यांच्या साठी काही करता येईल काय याचा शोध घेत असते. किंबहुना अशा उपेक्षितांकडे दुर्लक्ष करून मी दिवाळी साजरी करूच शकत नाही हे ही सांगते. नाशिकला इंजिनिअर प्रमोद गायकवाड यांची अशा उपेक्षित दुर्लक्षित घटकांसाठी काम करणारी ”सोशल नेटवर्किंग सर्व्हिस” नावाची संस्था आहे तिच्याशी आम्ही स्वत:ला जोडून घेतले आहे. प्रत्यक्ष आदिवासी पाड्यांवरही ऐन दिवाळीत आम्ही २/३ वर्ष गेलो व सक्रिय राहिलो. ही संस्था दुर्गम भागात, डोंगरावर जिथे तीव्र पाणी टंचाई आहे अशा जागी आदिवासींसाठी दऱ्या खोऱ्यात विहिरी खोदून आदिवासींच्या दारापर्यंत पाणी (नळा द्वारे) पोहोचवण्याचे काम करते. सरकारी मदतीने नव्हे तर समाजाकडून स्वेच्छेने जे मदत देतील त्यांच्याकडून ती घेऊन ही मंडळी काम करतात व आता पर्यंत २५/३० जागी त्यांनी अशी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. परदेशस्थ भारतीयही या कामात मागे नाहीत ते सढळ हाताने फंडस् देतात.
या पाड्यांवर दरवर्षी ही मंडळी आधी आदिवासीं साठी दिवाळी साजरी करतात. पहिला फराळ हे आदिवासी आधी खातील मगच आपण खायचा असे ठरवून नाशिक शहरातील खूप डॅा. मंडळी दिवाळीच्या दोन दिवस आधी फराळ, कपडे, पुस्तके वह्या पेन्सिली साड्या चादरी चटया असे जे जे जीवनावश्यक सामान आहे ते आपापल्यापरीने खरेदी करून आपल्या गाड्यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन या सामानाचे वाटप करतात. अलिकडे तर तिथे लायब्ररी उघडून मुलांसाठी शेकडो पुस्तकांचीही व्यवस्था गायकवाडांनी केली आहे. त्यांना अनेक डॅा. साथ देतात व पैसाही देतात. आम्ही कुटुंबिय फंडस् देतो कारण नेहमीच काही जाणे शक्य होत नाही. शिवाय गरजू चार मुलांचा शैक्षणिक खर्चही आम्ही दरवर्षी करत असतो. आदिवासींसाठी पैसे पंधरा दिवसांपूर्वीच मुलाने संस्थेकडे सोपवले आहेत. ह्या वर्षी तर मी इंग्लंड मध्ये आहे, त्यांचे मला बोलावणे होते, एका लायब्ररीच्या ओपनिंग साठी पुस्तके घेऊन मलाही जायचे होते, बघू या काही दिवसांनी जाईन.
आपल्या आजुबाजुला शेकडो असे गरजू उपेक्षित आहेत की आपण नुसती करंगळी लावली तरी त्यांचे भविष्य बदलू शकते, हो नां ? मग अशा उपेक्षितांची दिवाळी आधी व आपली नंतर असे प्रत्येकाने ठरवून टाकू या ना ? काय हरकत आहे आपल्याच देशबांधवांना कुठल्या न् कुठल्या रूपात मदत करायला ? चला तर मग शुभस्य शिघ्रंम् सुरूवात करू या, म्हणतात ना..” कल करे सो आज कर, आज करे सो अब” …
— लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुमतीताई अगदी हृदयाला भिडणार लेख आहे .वास्तवातील कटू सत्याची जाणिव करून दिलीत🙏🙏 ,तूम्ही दिलेली हाक यथार्थ आहे