सखी मिठीत एकांताची, निवांतलेल्या वाटा,
निशब्द किनाऱ्यावरती, शब्दांच्या धुसर लाटा
काही न बोलता बोले गाभाऱ्यातील बोल,
चिरव्याकुळ एकांताच्या मिठीत पाझरे ओल
खेळांत सावल्यांच्याही का चंद्र डोकवे थोडा,
फसलेल्या सारीपटावर का डाव रंगतो वेडा ?
सांजेच्या गर्द क्षितिजी, भाव दाटतो थोडा,
आत्मदर्शनावेळी एकांतसखीचा ओढा
घन अंतराळ स्पर्शाचे, मन अवखळ एकांताचे,
भिजलेल्या दवस्पर्शाने गुंफले गीत श्वासांचे
साद अंतरंगाची शांत निरामय वाणी,
ओलांडून अंतर सारे, येतसे दुरांतून कोणी

— रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800