Tuesday, July 23, 2024
Homeसाहित्यएक पुस्तक सहा परीक्षणे : ४

एक पुस्तक सहा परीक्षणे : ४

आम्ही अधिकारी झालो “एक प्रेरणादायी पुस्तक”

तांब्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्याला, यशस्वी होणेसाठी कठोर परिश्रम, सतत मेहनत याला पर्याय नसतो. खडतर आयुष्य जगताना, येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाताना हाल अपेष्टा सोसाव्या लागतात, परंतु आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान हे कोरंच असतं, ते कसं सजवायचं, धजवायचं, घडवायचं, हे शवटी प्रत्येकाच्या हातात असतं. याची प्रचिती लेखक व न्यूज स्टोरी टुडे या वेबपोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या त्यांच्या पुस्तकात वाचताना मिळते. सरकारी अधिकारी होणे ही तशी अत्यंत अवघड बाब, बिकट वाटेवरचा प्रवासच जणुं. अशा अधिकारी बनणाऱ्या एकूण पस्तीस यशस्वी मान्यवर अधिकाऱ्यांची ओळख, यशोगाथा या पुस्तकात उलगडून सांगितली आहे.

कष्टप्रद जीवन जगताना अधिकारी बनण्याचे स्वप्नं पुर्ण होईल का ? असा प्रश्न जर विचारला तर बहुदा नाही असे उत्तर मिळेल, परंतु या पस्तीस अधिकाऱ्यांची थोडक्यात करून दिलेली ओळख, माहिती वाचली की आपल्याला जाणवतं की, होय अधिकारी बनण्याचं स्वप्न नक्कीच सत्यात उतरवता येईल. त्याकरिता आपल्या आयुष्याला महत्वपूर्ण दिशा कशी द्यायची, कठोर परिश्रम कसे करायचे, जीवनात वेळप्रसंगी तडजोडी कशा करायच्या, आपल्या आवडीनिवडींना दूर लोटून विजयश्री कशी खेचून आणायची याची यशोगाथा ‘आम्ही अधिकारी झालो’ या पुस्तकात वाचायला मिळते.

शुन्यातून विश्व निर्माण करताना दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की, आपल्या आयुष्याला किती सुंदर बनवता येते, घडवता येते याचे अनमोल असे आदर्श धडे या पुस्तकात वाचायला मिळतात. अंधाराला सूर्य दूर करतो तद्वतच छोटा कंदीलही, स्वतःला कमी न लेखता जिद्दीने प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे, हाच विचार करून हे अधिकारी घडले आहेत याची जाणिव होते. सामान्य परिस्थितीतील परंतु हुषार जिद्दी व्यक्तिमत्वांच्या यशस्वितेच्या पैलूंवर लेखकाने या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ पस्तीस यशस्वी अधिकाऱ्यांची ओळख इतकंच मर्यादित न रहाता, आपल्या परिचयातील, नात्यागोत्यातील, ओळखीतील काही व्यक्ती, अधिकारी आपल्या डोळ्यासमोर उभ्या रहातात हे या पुस्तकाचे यश आहे, असं मला वाटतं. माझे पुण्याचे मित्र जेष्ठ कवी – लेखक श्री सूर्यकांत द वैद्य, त्यांच्या एका कवितेत लिहितात ……….

‘कोठे चुकले कोठे हुकले उगाच करत बसलात विचार
खडकमाळ फोडून तुम्ही फुलवलात ना मस्त शिवार
रुळला चाकरमार्ग सोडून तुमची गाडी धाव धावली
ठोकरा खात विनाउसंत ध्येयापाशी येऊन थांबली’

प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या यशासाठी किती चपखल आहेत ना या ओळी ! केवळ अधिकारी होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीच नव्हे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी, मनांत योजलेलं साकारण्यासाठी, इतरांसाठी यशस्वितेचा ठसा मागे ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी निश्चितच हे पुस्तक मार्गदर्शक, उपयुक्त व प्रेरणादायी आहे यात काही शंकाच नाही.

लेखक देवेंद्र भुजबळ हे पत्रकार, दुरदर्शन निर्माता, महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती खात्यात उपसंचालक तदनंतर संचालक पदावर कार्यरत होते. निवृत्त झाल्यानंतर आता ‘हे विश्वची आपले घर’ असे मानून “न्यूज स्टोरी टुडे” या वेबपोर्टलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिकांना वाचकांच्या भेटीला आणले आहे. देवेंद्र यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित केली असून अजून काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर प्रवास करत आहेत. उच्च विद्याभूषित असणारे देवेंद्र मित्रत्वाचं नातं सौहार्दपूर्ण जपणारे, संवेदनशील भावनेचे व मनमिळावू आहेत अन ते माझे मित्र आहेत याचा मला मनस्वी आनंद व अभिमान आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नी सौ अलका भुजबळ यांचाही अनमोल वाटा आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. अशा या हरहुन्नरी लेखकाचे ‘आम्ही अधिकारी झालो’ हे पुस्तक, अत्यंत उत्कृष्ठ बांधणी – छपाईने उत्तम असून वाचनीय व प्रेरणादायी आहे हे निखालस सत्यच. वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल किंबहुना आपल्या संग्रही ठेवावे असे वाटेल. देवेंद्रना त्यांच्या भावी लिखाणाला, त्यांच्या उपक्रमांना माझ्या अनेक शुभेच्छा.

(पुस्तक : ‘आम्ही अधिकारी झालो’, लेखक : श्री देवेंद्र भुजबळ, प्रकाशक : न्यूज स्टोरी टुडे, पृष्ठे : १५०, मूल्य : २५० रुपये, संपर्क : ९८६९४८४८००)

सुनील चिटणीस

— परीक्षण : सुनील शरद चिटणीस. पनवेल.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

        🌹🌹🌹🌹🌹
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः