३५ यशवंतांची यशोगाथा.. “आम्ही अधिकारी झालो”
बालपण, विद्यार्थी दशेतील बिकट कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या कठोर परिश्रमानी यशोशिखर गाठणा-या ३५ कीर्तीवंत अधिका-यांच्या यशोगाथांचा लेखाजोखा आपल्या सकस लेखणीतून सर्वंकषपणे
श्री देवेंद्र भुजबळ यांनी “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकातून घेतला आहे.
विशेष म्हणजे या पुस्तकात माझी स्वतःची “कॅन्टीनबॉय ते जॉइंट सेक्रेटरी” ही यश कथा देखील समाविष्ट करण्यात आली आहे. याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
खरं म्हणजे, जी मुलंमुली विद्यार्थी जीवनातूनच एक विशिष्ट ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून गुरू जनांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतात, अशी सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजूरांच्या व सामान्य परिवारातील मुलंमुली आता अनेक आव्हानात्मक स्पर्धा परीक्षेच्या विशेषतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत पदार्पण करत आहेत, ही अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे.
आमचे मित्र श्री देवेंद्र भुजबळ यांनी अशा यशवंत वीरांचा शोध घेत “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक लिहून ‘न्युज स्टोरी टुडे’च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांच्या सहकार्याने प्रकाशित करून आजच्या तरुणांसाठी मोठेच काम केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सन्मा रमेश बैस यांच्या हस्ते या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा राजभवनात संपन्न झाला. यावेळी मा राज्यपाल महोदयांनी “आम्ही अधिकारी झालो” बद्दल मौलिक विचार मांडले.
सदर पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे.तर मल पृष्ठावर दिलेली थोर कवी, गझलकार यांची रचना फारच ऊर्जा देणारी आहे.
असे हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक-दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.
श्री भुजबळ साहेब यांच्या या पुस्तकाचे स्वागत युवक, युवती, त्यांचे पालक समाजातील सहृदयी वाचक, मित्र मंडळी नक्कीच करतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो.
— परीक्षण : राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, महाराष्ट्र शासन
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800