प्रद्युम्न कुमार महानंदियाचा जन्म १९४९ मध्ये अंगुल जिल्ह्यातील अथमल्लिक उपविभागातील कंधापाडा गावात एका ओडिया भाषिक विणकर कुटुंबात झाला. त्यांनी महेंद्र हायस्कूल, अथमल्लिक येथे शिक्षण घेतले.त्यानंतर नंतर पुढील शिक्षणासाठी विश्व-भारतीमध्ये प्रवेश घेतला. आर्ट स्कूलमध्ये प्रवेश मिळाला खरा पण शैक्षणिक फी देता न आल्याने शिक्षण सोडून घरी परतावे लागले.
जेव्हां त्याला वाईट वाटत होते, तेव्हां त्याची आई त्याला म्हणाली की, “त्याच्या कुंडलीनुसार, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. एखाद्या दिवशी एका अशा स्त्रीशी लग्न करेल “जिची राशी वृषभ असेल, ती दूरच्या भूमीवरून येईल, ती संगीततज्ज्ञ असेल आणि जंगलाची मालक असेल”.
कलेचा ध्यास स्वस्थ बसून देत नव्हता. थोडेफार पैसे जमवून प्रद्युम्न गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट्स, खल्लीकोट येथे दाखल झाला. आणि १९७१मध्ये दिल्लीतील कॉलेज ऑफ आर्ट येथे प्रवेश घेतला. येथेच माननीय इंदिरा गांधी यांचे सुरेख चित्र रेखाटले आणि पोर्ट्रेट चितारणारा उत्तम कलाकार अशी प्रसिद्धी प्राप्त झाली. उपजीविका हा मुख्य प्रश्न होताच पण या कीर्तीचा फायदा असा झाला की, कॅनॉट प्लेस येथील सुप्रसिद्ध पवित्र कारंज्याखाली बसून पोर्ट्रेट काढण्यासाठी त्याने अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असता सहज मिळाली. फकरुद्दीन अली अहमद, अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेश्कोवा, बीडी जट्टी इत्यादींची रेखाचित्रे तो काढत गेला आणि स्केच आर्टिस्ट म्हणून स्वतःचे नाव कमावले. अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या कलेविषयी लिहिले. त्याची ख्याती पार स्वीडनपर्यंत पोहोचली जेथे शार्लोट नांवाची १९ वर्षीय विद्यार्थिनी रहात होती. “10 मिनिटांत एक पोर्ट्रेट बनवण्याच्या” त्याच्या दाव्याने आपलेही पोर्ट्रेट काढून घ्यावे या उत्सुकतेपोटी ती तिच्या मैत्रिणींसह दिल्लीला निघाली आणि प्रसिद्ध हिप्पी ट्रेलने – युरोप, तुर्की, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ओलांडून – 22 दिवस ड्राइविंग करत भारतात पोहोचली. त्याने काढलेल्या पोर्ट्रेटने ती प्रभावित झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याचा निर्णय घेतला. (परत भेटण्यासाठी तो एक बहाणा होता कां ?) तिचे चित्र रेखाटतांना तिच्या सौंदर्याने तो अतिशय प्रभावित झाला होता आणि ती त्याच्या कलेने. खरं तर दोघेही प्रथम भेटीतच प्रेमात पडले (Love at first sight) आईचे बोलणे आठवून त्याने वॉन शेडविन (शार्लोट)ला विचारले, की तिच्या मालकीचे जंगल आहे कां ?
वॉन शेडविन, जी स्वीडिश खानदानी कुटुंबातील होती, तिने उत्तर दिले की तिच्या मालकीचे जंगल आहे आणि पुढील प्रश्नोत्तरांतून ती पियानो वाजवते आणि तिची राशी देखील वृषभ आहे, हे ही कळले.
कालांतराने बीबीसीला मुलाखत देतांना प्रद्युम्नने हेच सांगितले की, “तो एक आतील आवाज होता ज्याने मला सांगितले की ती तीच आहे. आमच्या पहिल्या भेटीत आम्ही चुंबकासारखे एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. हे पहिल्या दृष्टीक्षेपातील प्रेम होते,” मात्र तो पुढे असाही विचार करत होता की “मी कसे काय हे प्रश्न तिला विचारले?” पण धीर करून त्याने तिला चहासाठी आमंत्रित केले. मग मात्र थोडा घाबरला. पण तिने त्याचे आमंत्रण स्वीकारले. तिला तो प्रामाणिक वाटला आणि मुख्य म्हणजे त्याने हे प्रश्न कां विचारले हे तिला जाणून घ्यायचे होते.विविध संभाषणानंतर तिने त्याच्यासोबत ओरिसाला भेट देण्याचे मान्य केले.तिने तिथे पहिले ठिकाण पाहिले ते प्रसिद्ध कोणार्क मंदिर! ते पाहिल्यावर ती अवाक् झाली. त्याने कारण विचारताच ती म्हणाली, “लंडनमधील माझ्या स्टुडंट रूममध्ये मंदिराच्या दगडी चाकाची ही प्रतिमा माझ्याकडे होती, पण ही जागा नेमकी कुठे आहे याची मला कल्पना नव्हती. आणि इथे मी चक्क त्यासमोर उभी आहे !”
दोघे प्रेमात आकंठ बुडाले आणि तो तिला आपल्या गांवी घेऊन गेला.त्याच्या वडिलांना भेटायला जातांना ती चक्क साडी नेसली होती. सारे कौतुकमिश्रित आश्चर्याने बघत होते.साऱ्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी आदिवासी परंपरेनुसार लग्न केले.दिल्लीला परत आल्यावर वॉन शेडविनला स्वीडनला परत जावे लागले पण जाण्यापूर्वी तिने प्रद्युम्नाला तिच्यासोबत येण्यास आर्जवे केली परंतु त्याला लगेच जाणे शक्य नव्हते पण नक्की येण्याचे वचन त्याने तिला दिले.
वर्षभर पत्राद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. आता जाण्याचे ठरविले त्याने पण त्याच्याकडे विमान तिकीट घेण्यासाठी पैसे नव्हते. मग त्याने असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता.
वाचकहो, इथूनच या प्रेमकहाणीला कलाटणी मिळाली आणि ती जगांत एकमेवाद्वितीय ठरली. जे काही जवळ होते ते विकून त्याने सेकंडहँड सायकल खरेदी केली आणि निघाला स्वीडनमधील बोरास येथे, त्याच्या प्रियतमेकडे, ती आली त्याच वाटेने !
पी.के. महानंदिया म्हणतात, २२ जानेवारी १९७७ रोजी त्यांचा प्रवास सुरू झाला आणि ते दररोज सुमारे ७० कि.मी.(४४ मैल) सायकल चालवत असत. त्यांना अफगाणिस्तानात त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण आली नाही. “कला माझ्या मदतीस आली . मी लोकांचे पोर्ट्रेट बनवायचो आणि त्यासाठी लोक मला पैसे देत.”
तर काहींनी तर त्यांना अन्न आणि निवाराही दिला.प्रद्युम्न सांगतात “१९७० च्या दशकातील जग खूप वेगळे होते.उदाहरणार्थ, अफगाणिस्तान हा एक वेगळा देश होता. तो शांत आणि सुंदर होता. लोकांना कलेची आवड होती आणि देशाचा मोठा भाग लोकवस्तीचा नव्हता.तेथील अनेक हॉटेल्सने वॉशिंग रूम आणि सायकल रिपेअरिंगसारख्या सुविधा पुरवल्या.ते दिवस वेगळे होते. मला वाटते की लोकांकडे माझ्यासारख्या भटक्याचे मनोरंजन करण्यासाठी जास्त मोकळा वेळ होता.”
बहुतेक देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नव्हती. अफगाणिस्तानात लोकांना हिंदी समजते, पण इराणमध्ये गेल्यावर भाषेची समस्या निर्माण झाली.मात्र पुन्हां कला बचावासाठी आली. त्यांचे अनुभवाचे बोल …. “प्रेम ही सार्वत्रिक भाषा आहे आणि लोकांना ती समजते.” मजल दरमजल करीत पुढे जात असतांना खूपवेळा थकवा जाणवायचा. त्याबद्दल सांगतांना ते म्हणतात, “खूप वेळा माझे पाय दुखत असत पण शार्लोटला भेटण्याची आणि नवीन ठिकाणे पाहण्याच्या उत्साहाने मी पुढे जात होतो.” अखेर ४ महिने ३ आठवडे सायकलवरून सतत प्रवास करीत प्रद्युम्न २८ मे रोजी युरोपला पोहोचला – इस्तंबूल आणि व्हिएन्ना मार्गे, आणि नंतर ट्रेनने गोटेन्बर्गला गेला.त्याला समोर पाहून अतीव हर्ष आणि तिच्या पालकांना आश्चर्य, सांस्कृतिक धक्का! पण इतक्या कठीण परिस्थितीतून आलेल्या त्याला आणि दोघांच्या प्रचंड प्रेमाला स्वीकारून सर्वांच्या ब्लेसिंगने त्यांचे पुन्हां स्वीडनमध्ये अधिकृतपणे लग्न झाले.
खरे प्रेम किती ताकदवान असते हेच प्रद्युम्न-शार्लोट (वॉन शेडविन) जोडीने दाखवून दिले. चित्रपटात नायक-नायिकेचे मिलन झाले की चित्रपट संपतो पण खऱ्या आयुष्यात त्याचा पार्ट २ सुरु होतो आणि त्यांतच प्रेमाचा कस लागतो.
त्याबाबत प्रद्युम्न सांगतात,””मला युरोपियन संस्कृतीबद्दल काहीच माहिती नव्हती. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, पण तिने मला प्रत्येक पावलावर साथ दिली.”
प्रद्युम्न महानंदिया स्वीडनमध्ये एक कलाकार(आर्टिस्ट) म्हणून प्रसिद्ध आहेत आणि स्वीडिश सरकारसाठी कला आणि संस्कृती सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची चित्रे जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित झाली आहेत आणि त्यांना युनिसेफच्या ग्रीटिंग कार्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. ४ जानेवारी २०१२ रोजी, त्यांना भुवनेश्वर, ओडिशा येथील उत्कल युनिव्हर्सिटी ऑफ कल्चर (UUC) कडून मानद डॉक्टरेट पदवी (ऑनरीस कॉझा) प्रदान करण्यात आली. ओडिशा सरकारने त्यांना स्वीडनमधील ओडिया सांस्कृतिक राजदूत म्हणूनही नियुक्त केले होते.भारतीय चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी महानंदिया आणि वॉन शेडविन यांच्या प्रेमकथेवर “Two Angels on Earth and Their Life Path ” चित्रपट बनवण्याची योजना आखत आहेत मात्र सिद्धार्थ, एमिली या त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांची कथा अमर करायची आहे आणि म्हणून त्यांनी स्क्रिप्ट स्वतः लिहिण्याचा आणि सह-निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठ्या पदांवर कार्यरत असूनही अत्यंत साधे, निर्मळव्यक्तिमत्व असलेले, ७४ वर्षीय प्रद्युम्न शार्लोटबद्दल बोलतात, ” ती माझ्यासाठी सदैव खास (special ) आहे. मी १९७५ मध्ये जसे तिच्यावर प्रेम करत होतो तसेच आजही करतो”. ( अर्थात तिचेही तेच म्हणणे असेल, यांत दुमत नाही. ) मात्र ते पुढे म्हणतात, ” मला अजूनही समजले नाही की,लोकांना असे कां वाटते की सायकलने युरोपला जाणे ही एक मोठी गोष्ट आहे. मला जे करायचे होते ते मी केले, माझ्याकडे पैसे नव्हते पण मला तिला भेटायचेच होते. मी प्रेमासाठी सायकल चालवत होतो” आणि हळूच एक गुपितही हसत हसत सांगतात, ” सायकल चालवणे मात्र मला कधीच आवडत नव्हते”.
यालाच ” प्रेमासाठी काय वाट्टेल ते “…म्हणायचे कां ?
— लेखन : नीला बर्वे, सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800