सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या दुसऱ्या कार्यक्रमात दहा वक्त्यांनी दहा लेखकांच्या दहा पुस्तकांवर ‘मला आवडलेले पुस्तक’ या उपक्रमाखाली विचार मांडले. सर्वच वक्त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मत व्यक्त करुन दीड तासाहून अधिक काळ साहित्य रसिकांना खिळवून ठेवले. ओरोस येथील राव बहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सभागृहात हा वाग्यज्ञ दहा समिधांनी संपन्न झाला.

ओरोस येथील राव बहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सहकार्याने ‘मला आवडलेले पुस्तक’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात झाला. यात सुधीर गोठणकर, शेफाली कशाळीकर, नम्रता रासम, डॉ. सई लळीत, सुरेश पवार, आर्या बागवे, मनोहर सरमळकर, सुस्मिता राणे, वैदेही आरोंदेकर आणि मिताली मुळीक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश लळीत यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनी या व्यासपीठाचे औपचारिक उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या व्याख्यानाने व मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या कविता गायनाने झाले. या मालिकेतील हा दुसरा कार्यक्रम आहे. कार्यक्रमात जास्तीत जास्त साहित्यरसिकांना सहभाग घेता यावा यासाठी ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर निवडक वक्त्यांनी आपले मत व्यक्त करावे, अशी ही संकल्पना होती. तिला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि दहा वक्त्यांनी नावनोंदणी केली. सर्वच वक्त्यांनी दिलेल्या वेळेत पुस्तकाचा नेटका परिचय करुन त्या पुस्तकांची आपल्याला भावलेली वैशिष्ट्ये सांगितली. व्यासपीठाच्या पुढील कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

या कार्यक्रमात सुधीर गोठणकर (पार्टनर – व. पु. काळे), शेफाली कशाळीकर (व्यक्ती आणि वल्ली – पु. ल. देशपांडे), नम्रता रासम (श्यामची आई -साने गुरुजी), डॉ. सई लळीत (बेरड – भीमराव गस्ती), सुरेश पवार (अक्करमाशी – प्रा. शरणकुमार लिंबाळे), आर्या बागवे (यश तुमच्या हातात – शिव खेरा), मनोहर सरमळकर (फकिरा -अण्णाभाऊ साठे), सुस्मिता राणे (बहिणाबाईची गाणी), मिताली मुळीक (मन मे है विश्वास – विश्वास नांगरे पाटील) आणि वैदेही आरोंदेकर (व्हाय नॉट आय – वृंदा भार्गवे) यांनी सहभाग घेतला.
रसिकांना दीड तासाच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारच्या दहा पुस्तकांवर वाचकांचे मत ऐकण्याची संधी यामुळे मिळाली. या उपक्रमाचे उपस्थित साहित्यप्रेमींनी स्वागत केले.
कार्यक्रमाला सर्वश्री शंकर कोकितकर, पुरुषोत्तम लाडू कदम, डॉ. अनिल ठोसरे, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, प्रिया आजगावकर, रामचंद्र घोगळे, बाळकृष्ण शिरवणकर, संजय रावराणे, उमेशचंद्र रासम, उदय दळवी, नम्रता पाताडे, मेघना उपानेकर, नेहा कशाळीकर, वैष्णवी परब यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. यावेळी सर्व वक्त्यांना डॉ. सई लळीत यांनी ‘प्राचार्य महेंद्र नाटेकर स्मृतीग्रंथ’ भेट दिला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800