अज्जू ! माझ्या आईची आई ! तिला ह्या जगात अज्जू हाक मारणारा मी एकमेव. माझ्या अज्जूबद्दल मला प्रचंड अभिमान ! लहानपणी म्हणे मी फक्त तिच्या मांडीवर ठाण मांडून बसायचा.
तर आज का कुणास ठाऊक मला अज्जूची तीव्रतेने आठवण येत होती. तिला भेटायला, तीच्याकडे जायला मन मोकाट धावत होतं.
तशी आईची परवानगी घेऊन आजच्या एस.टी ने आजीच्या गावाला जायचा बेत पक्का केला. तशी आईनी अज्जूला आवडणारे लिंबाचं व आंब्याच लोणचं, पापड, कुरड्या, लसणाची चटणी, तीच्यासाठी एक लुगडं, जे मी खास माझ्या निवडीने आणलं वगैरे गोष्टी माझ्या बरोबर दिल्या.
एस. टी. स्टॅंड घरापासून १०-१५ मिनिटावर होता. बसचं टाईम रात्रीच्या १०:१५ चं होत. एकदाची बस आली. तशी बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. साधारण १०-१५ प्रवासीच होते.
बस खडखडत निघाली. बाहेरची शोभा पाहून झाल्यावर थोडीशी पेंग यायला लागली. बस अशी साधारण १।।-२ तासानी वळण घेऊन एका टपरीपाशी थांबून १०-१५ मीनिटा नी निघाली. आता रात्रीचे जवळ-जवळ १२:१५ वाजले होते. तसं एका विहीरीच्या आसपास मी उतरलो.
चंद्रकोरीच्या अर्ध्या प्रकाशात मी विहीरी जवळ गेलो. तहान तर लागली होतीच. तशी मी पाण्याची बाटली घेतली होती. पण विहीरीचं पाणी पिऊ का नको, ह्या संभ्रमात असतानाच मला एक म्हातारी, जिचे पुढचे दोन दात पडलेले, मळकट फाटकं लुगडं, केस भिसारलेले पण चेहरा काहीसा हसरा, डोळ्यात विचित्र चमक !
मला आवाज आला. गावाला निघालास काय ?
पण मध्ये कुठे काही नाही. तुला काय लागलं तर माझी आठवण काढ.
मी तसाच पुढे निघालो. ‘गिलगिले‘, अज्जूचा गाव यायला अजून दोन एक तास सहज जाणार होते. तशात माझ्या कडील विजेरीच्या सह्याने मी पुढे पुढे जात राहत होतो.
पुढे परत एक विहीर दिसली. परत तीच म्हातारी विहीरीच्या बांधावर बसलेली दिसली व तिच्याकडे एक मळकट बोचकं होतं. मी चांगलाच चरकलो पण तसं दाखवलं मात्र नाही. मी हळूच तिला कळणार नाही, इतक्या बेताने तिच्याकडे नजर टाकली. तर तिचे पाय उलटे दिसले. हाताची बोटं वेडी वाकडी झालेली दिसली. तशी ती म्हणाली,
‘गिलगिले‘ यायला अजून अर्धा पाऊण रस्ता चालायला लागेल.
एकदाची गिलगिलीची वेस लागली व माझा जीव भांड्यात पडला. आता रात्रीचे जवळ – जवळ ३-३।। झाले होते.
इकडून १०-१५ पावलं चालली की आलच गिलगिले व अज्जूची घर ! झुंजूमुंजू होतं आलं होतं. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता.
तशी अज्जू रोज पहाटे ४-४ ।। ला उठत असे. आता इतक्या लवकर उठून अज्जू काय करत असेल ? मला आश्चर्य वाटायच.
दाराजवळ जाताच मी ‘अज्जू’ करून जोराने हाक मारली. ती हाक शांतता भेदून अज्जूच्या कानावर पडली. अज्जूला ‘अज्जू’ म्हणणारा मी एकटाच असल्याने म्हातारीने,
‘कोण ? सुभाष काय रे ?’ म्हणून दार उघडले. मला पाहून तिला कोण आनंद झाला होता.
तिच्या थरथरत्या हाताने मला खुण करून दारातच उभा रहायला सांगितले.
आत गेली, भाकरीचा तुकडा, मीठ, मोहरी घेऊन आला. माझी दृष्ट काढली व मगच मला घरात घेतले.
मी तिच्या पायावर डोक ठेवलं. आता माझ्या अश्रूंचा बांध फुटला होता. किती वेळ मी तिचे पवित्र पाय अश्रूंनी धुऊन घेतले. मला उठवून तिने जोरात कुशीत घेतलं व अगदी लहान मुलासारखे माझे पापे घेतले. काय बोलू आणि काय नको असं तिला झालं होतं.
कुऱ्हाड्यातून कोंबड्यांच आरवणं ऐकू येत होतं, बेड्या मधून गांईंचं हंबरणं ऐकू येत होत. लांबून कुठनतरी मोरांचा केकारव ऐकू येत होता.
साधारण सात वाजता अज्जूचे विश्र्वासू कामगार आले. त्यातील रामाने मला थोड निरखून पहात, सुभाष ? म्हणून हाक मारली. मला कोण आनंद झाला. इतक्या वर्षांनंतरही मला कोणी ओळखलं होतं.
गाईंना चारा, कोंबड्याना खाणं घालून आठच्या सुमारास आम्ही नदीवर गेलो. तेथे येथेच्छ पोहून झाल्यावर व गड्यांनी गोड्या नदीतील पाण्या मधील दोन मोठे मासे पकडून आणले.
घरी आल्या आल्या अज्जूने मला धारोष्ण दूध दिले व सर्वांना गरमा गरम दूध भाकरी देऊन नाष्ट्याची सोय केली व मग सर्वजण आपल्याला राखून दिलेली कामे करण्यास निघून गेले.
दुपारी १-१।। चे सुमारास अज्जूच्या हातचे गरमागरम कालवण, भात खाऊन वामकुक्षी घेण्यासाठी मी खोलीत गेलो. चारच्या सुमारास देवळातून भजनाचे सूर येऊ लागले. तसे माझे पाय आपोआप देवळाकडे वळले. रात्री आठच्या सुमारास देवळात आरती संपन्न झाली.
मन अगदी प्रसन्न झाल. वाटलं इथेच येऊन कायम रहावे. पण मग मुंबईच्या घराचं काय ?
मुंबईला आई-वडील, बायको मुलं आहेत. त्यांना थोडी इथे करमणार आहे. शिवाय तिथे त्यांचे मित्र मैत्रिणी, नोकरी, कॉलेज, व्यवहार असल्यामुळे घरी तर परतायलाच लागणार आहे.
अज्जूला मी सांगितले की तू आता माझ्या बरोबर मुंबईला चल तर म्हणते कशी, ‘अरे बाबा, नको रे ती मुंबई, तिकडूनचा तो कलकलाट. माझं डोकं दुखायला लागतं. इथे मी शांत वातावरणात व छान पर्यावरणात सुखात जगत आहे. इथे १०-१५ घरचं आहेत, पण सर्वजण एकमेकांसाठी जीव टाकतात. केशव वाणी आठवड्याच सर्वांचं सामान जिल्ह्यात जाऊन आठवणीने गोष्टी घेऊन येतो.
येथे पैशाला तोटा नाही, घरचं दूधदूभते, दारातील ताजा भाजीपाला, कोणाला कोणाचा मत्सर नाही, द्वेष नाही. म्हणूनच सांगते, “गिलगिले हीच माझी पंढरी !”

— लेखन : सुभाष श्रृंगारपुरे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800