दुपारचे जेवण झालं..
सुस्ती आली म्हणून, बेडवर लोळत पडलो.. झोप कसली येते..पण… तितक्यात फोन ची रिंग वाजायला लागली… आता कोण असेल ? हातात मोबाईल घेऊन, फोन उचलणार तोच.. रिंग चा आवाज बंद झाला होता.. नाव नव्हते.. अनोळखी नंबर.. म्हणून फोन खाली ठेवणार, तर परत रिंग वाजली… लगेच बघितले, तर तोच अनोळखी नंबर.. फोन जागेवर ठेऊन दिला आणि विचार करीत बसलो.. उद्या राखी पौर्णिमा..दर वेळी मी असाच उदास होत रहातो. लहानपणापासून हे असच चाललय, कारण मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे आनंदाचा क्षण, पण माझ्यासाठी नाही. इतका मी अभागी. परत रिंग वाजली..,’ ट्रिंग ss.. ट्रिंग ss…’ मी दुर्लक्ष केले… पण क्षणभर थांबली की, परत रिंग व्हायची.. खात्री केली तर, तोच.. मघाचाच नंबर…अरे s यार.. कोण असेल बरं..? त्राग्यानेच.. फोन उचलला…..
दादा s.. काय रे.. केव्हाचा फोन लावते.. तु फोन का नव्हता उचलत..?
हो s.. हो ss.. जरा.. माझे ऐकनार का..? मला कोणी बहीण नाही.. ठेव.. फोन..
अरे s दादा.. एक मिनिट, फोन कट करू नको. मला माहित आहे, तुला बहीण नाही आणि आणि मलाही कोणी भाऊ नाही.. पण मी म्हणते.. असेल तुझ्या मनात, राग.. पण..
थोडा वेळ खर्च करुन.. माझ्या कडून राखी बांधली.. ? तर.. मला ही धन्य वाटेल ना !
एक छोट्याश्या प्रसंगाने, जर कोणी सुखावत असेल.. तर कोणते असे पाप घडणार आहे. प्लीज s…. एकदाच.. उद्या ये आणि राखी बांधून लगेच, निघून जा.. मी नाही तुला थांबवणार..
ती.. हुंदके देत रडायलाच लागली.. मला ही असह्य झालं.. एक मुलगी.. केवळ राखी बांधण्यासाठी विनंती करते…. आणि मी… किती मूर्ख… अरे.. अनोळखी असली म्हणून काय झालं?.. घेतली बांधून राखी.. तर काय नुकसान होणार आहे ???..
हां.. ठीक आहे.. मग, तूच ये.. ना माझ्या घरी..
ती कशी बशी शांत झाली, स्वतःला सावरत…
दादा s मी नाही येऊं शकत.. तुलाच यावं लागेल.. मी तुला.. पत्ता पाठवते.. आठवणीने यायचं हं… आणि हो.. येताना राखी पण घेऊन ये….
फोन कट….. काय अजब मुलगी आहे..? म्हणे येताना.. राखी पण घेऊन ये…..,’ ये दूनियामे कैसे.. कैसे.. लोग रहते हैं ?’ असो…. बघता येईल, उद्याची बात उद्या…. मी आपली बिनधास्त झोपलो…
ते म्हणतात ना की, रात गयी.. बात गयी.. तसं काही नाही… सकाळी ठीक ११:०० व्हॉट्सॲप वर मेसेज आला…,’ दादा s.. तुझी मी वाट पहाते..’. खाली पत्ता होताच.. मी आपली तयारी केली.. आता राखी ss.. च काय…? कुठून घ्यावी ??? विचार करता करता.. आठवलं की, गेल्या वर्षी.. मानलेल्या बहिणीने राखी बांधली होती.. ती मी जपून ठेवली होती, कपाटात… त्याचं अस झालं की,… आमची सौ…. तुम्हाला माहितीच आहे की, बायकांची बुध्दी ला…. डोकं लावू नये.. शंका.. नुसत्या शंका.. भरलेल्या असतात, यांच्या डोक्यात.. भावा बहिणींच्या पवित्र नात्याला देखील.. सोडत नाही… तिच्यावर असाच घाणेरडा आरोप घेऊन.. खुप वाद घातला होता…. शेवटीं मीच विषय बंद केला.. तेव्हाही असच.. त्या बहिणीने.. मला शपथ घातली..,’ तु नाही आला.. तर.. तर.. मी या जगात.. दिसणार नाही…’. अखेर मी चोरीछिपे जाऊन आलो.. घरात येण्या पूर्वीच.. मनगटावरील बांधलेली.. पवित्र राखी.. काढून खिशात ठेवली.. नंतर रात्री कपाटात.. लॉकर मध्ये ठेऊन दिली.. तीच राखी काढली, अन् खिशात ठेवली.. निघालो कारण..१२:२९ ची लोकल पकडून जायचे….
लोकल अगदी वेळेवर आली.. या लोकलने..नेरूळ.. तिथून ठाणे.. ठाण्याहून.. कल्याण.. असा प्रवास करीत गेलो.. कल्याण स्टेशन वर २:०० वाजले.. ईस्ट ला.. स्टेशनच्या बाहेर पडलो.. स्काय वॉक.. वरून खाली उतरलो.. शेअरिंग ऑटो होत्याच.. लाईन लागलेली.. होती.
चला s मंदिर.. मंदिर.. एक सीट फक्त.. बसा लवकर..
मी मोबाईल काढून परत चेक केलं..,’ जरी मरी माता मंदिर.. तिसगाव..असे होते.. मी आपलं सहज रिक्षा वाला.. विचारले. तर तो म्हणाला… हा.. तिकडेच जाणार आहे..१५ रुपये पडतील.. ठीक आहे.. म्हणत.. रिक्षात बसलो.. कसला.. कोंबलो म्हणा.. अहो s मागे चार पुढे दोन.. ड्रायव्हर शेजारी.. त्याशिवाय रिक्षा जागची हालत नाही.. शिवाय एकदा बसलं की, बसलं.. उतरायचं नाही.. सीट.. पुर्ण झाले आणि.. निघालो एकदाचं..१० मिनिटांचे आत आलं मंदिर.. मी पण उतरून घेतलं.. जरा फ्रेश व्हावे म्हणून.. जवळच.. उसाचा रस वाला होता.. थोड तोंडावर पाणी माराव आणि.. एक ग्लास रस प्यावा.. जरा आत्मशांती होईल.. आणि हो…. झाली पण.. तेव्हढाच गारवा.. आता पुढचा प्रवास.. साईनाथ बिल्डिंग.. शोध घेत घेत.. सौ.. च्या शब्दात सांगायचं झालं तर..,” तोंडाचा वापर केला की, कुठलाही पत्ता सापडतो..” मी पण, तोंडाचा वापर केला अन् मुक्कामी पोहोचलो.
फ्लॅट नंबर १०३.. बेल चे बटन दाबून सोडले..डिंग s डाँग s… आई ss… दादा आला वाटते.. दार उघड… आवाज ओळखीचा वाटला… मी माझे बुट काढून.. ठेवले.. अन् दार उघडले.. आई काहीच बोलली नाही… पण… समोरच खुर्चीत बसलेली मुलगी…. आनंदाने स्वागत करीत….
दादा.. तु आलास.. बस सोफ्यावर.. आरामात बस.. दमला असशील ना…. लांबचा प्रवास..
नाही.. तसं काही नाही.. सवय आहे मला..
एवढंच बोललो अन्.. शांत बसलो… तिच्या आईने.. पाणी आणून दिले.. मी एक एक.. घोट घेत.. घेत.. निरीक्षण करीत होतो… काल फोन वर.. बडबड करणारी खट्याळ मुलगी.. आता शांत दिसत होती.. निर्विकार चेहऱ्याने पण आनंदी चेहरा दिसत होता.. एक शाल गुंडाळून.. खुर्चीत बसलेली होती.. बहुतेक.. तब्बेत ठीक नसेल म्हणून.. असेल… काही तरी बोलायचं म्हणून.. मी सहज विचारले…
आजारी आहेस का..?
नाही.. नाही.. तसं काही नाही, ठीक आहे.. हे आपलं.. उगा.. नेहमीचच.. शाल.. म्हणजे.. झाकून पाकून… बर असतं म्हणून.
तिने उत्तर दिले.. तिची आई हातात पूजेचं साहित्य असलेलं एक ताट घेऊन आली.. टीपॉय वर ठेऊन.. त्या मुलीच्या जवळ सरकवला.. दुसरी खुर्ची आणून.. ती पण.. जवळच ठेवली.. तयारी बघून मी म्हटल..
मी खालीच बसतो.. चालेल मला.. जमीनीवर बसून योग्य राहिल ना… भारतीय बैठक…
नाही.. खुर्चीवरच बस दादा.. अशीच ओवाळते मी तुला….
मी पण काहीच बोललो नाही, आणि खुर्चीत बसलो.. तिच्या समोर.. तिच्या आईने फुलवात असलेली निरांजन.. पेटवली आणि.. मग.. मुलीने.. खांद्यावरची शाल.. सरकवून मांडीवर ठेवली.. अन् बसल्या जागीच.. माझे औक्षण केले.. मी ही खिशातील राखी काढून ताटात ठेवली होतीच.. पेढ्याचा घास घेऊन मला भरवला.. आणि.. आपल्या नाजूक हाताने माझ्या मनगटावर राखी बांधली.. मी पूजेचे ताट रिकामे जाऊं नये म्हणून.. खिशातून पाकीट काढून एक शंभर ची नोट काढली.. ताटात ठेऊ लागलो.. झटक्यात तिने माझा धरीत……
नको दादा.. ओवाळणी काहीच नको.. तु आला.. राखी बांधली.. बस.. हेचं माझ्यासाठी खुप झालं….
मी तिचा हात बाजूला करीत..
ताट रिकामे ठेवायचे नसते… असु दे…
ताटात नोट ठेवली.. आणि गडबडीत.. मांडीवर असलेली शाल खाली पडली.. आणि लाईट चा शॉक बसावा तसा.. मी शॉक झालो.. आणि बघतच राहिलो.. डोळ्यावर विश्वास बसेना.. इतकं भयानक दृष्य.. समोर होत.. एक मिनिटपूर्वी जिने.. राखी बांधली.. ती.. हो.. ती बहिण.. अपंग होती.. गुडघ्या पासून खाली.. दोन्हीही पाय नव्हते.. खळखळ डोळ्यातून पाणी यायला लागलें…. तसाच उठलो आणि.. पट्कन खाली पडलेली शाल उचलून.. त्या बहिणीच्या खांद्यावर नीट.. पांघरली.. एक टक.. तिचा चेहरा न्हाहळत राहिलो.. तिचेही डोळे.. अश्रूंनी डबडबले होते.. तिचे अश्रू मी टिपले.. आणि.. धीर देत….
तायडे ss… या दादाला माफ कर.. काल मी.. तुला.. काही काही.. बोललो..s…. दादाला क्षमा कर…..
येताना मी मिठाई आणली होती.. थोडी तिला भरवली.. बाकी बॉक्स.. तिच्या आईच्या हातात दिला.. आणि निघाव….. पण तिथून पाय निघेचना… तरी पण.. जड अंतःकरणाने…
तायडे s.. येतो मी.. निघायला पाहिजे… अरे s.. हो.. एक विचारायचं राहूनच गेलं होतं… ते s… तुला माझा नंबर कोणी दिला?
सांगु..? खरं सांगू.. का? माझ्या पनवेल च्या बहिणीने… तीच.. ती गेल्या वर्षी तुला राखी बांधली होती…ती..
— लेखन : सुभाष कासार. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खरंच खूप सुंदर कथा… सगळं दृश्य डोळ्यापुढे उभे राहत.. 👌
मानलेली बहिण ही रक्षाबंधनावर आधारित कथा.सुरवातीला एक टिपिकल वाटणारी ही कथा उत्तरार्धात विलक्षण वळण घेते.डोळ्यात पाणी आणणारा आणि धक्कादायकही शेवट.
संवाद शैलीही सुरेख.