सुमारे पंचवीस वर्षापूर्वी चि. सौरभच्या हट्टानुसार आज्जीने त्याला गोष्ट सांगायला सुरुवात केली.
सायंकाळी कन्याशाळा सुटण्यापूर्वी शिपाईमामा लगबगीनं नोटीस घेऊन वर्गात शिरला. सर्व मुलीं उत्सुकतेने गुरुजींच्या नोटीस वाचनाकडे कान देऊन ऐकू लागल्या. “सर्वं मुलींना कळविण्यात येते की, उद्या वार्षिक स्नेहसंमेलनांनिमित्त छोटी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. उद्याच्या स्पर्धेतुन सुंदर हाताची निवड करण्यात येणार आहे. तरी सर्व मुलींनी स्पर्धेत सहभागी व्हावे. हे ऐकून सर्व मुली जाम खुश झाल्या. सर्वानी आनंदाने एकच गलका केला. प्रत्येक मुलगी मी माझा हात नटवून कसा सुंदर बनवणार याचं मनोरथ रचु लागल्या. शेवटच्या बाकावर बसलेली गायत्री परिस्थितीने गरीब असूनही आनंदाने हात कसा सजवावा याचा विचार करु लागली. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि शाळा सुटली. घरी परततांना साऱ्या मुलीं आपला हात कसा सजवनार याचीच चर्चा करत चालल्या होत्या.
गायत्रीला वडील नव्हते. आई धुणे-भांडी व मोलमजुरी करुन संसाराचा गाडा कसातरी ओढत होती. आज गायत्री आईकडून मेहंदी काढून घेण्याचं ठरवीत घराकडे निघाली होती. आईला हे सगळं घरात गेल्या गेल्या सांगायचं असे मनाशी ठरवत ती झोपडीत शिरली. पण पाहते तो आई कोपऱ्यात पोत्यावर कण्हत पडलेली तिला दिसली.
“आई काय झालं ग ? का झोपलीस”?
आई म्हणाली,”गायु मला बरं वाटत नाही. थंडी वाजून आलीय”.
“आई दवाखाण्यात जाऊया काय ?” असे असाह्यपणे विचारताच म्हणाली.
“नको बेटी, मी घरातली एक गोळी घेतली आहे. बरं वाटेल उद्यापर्यंत. तु तेवढं सांज होतेय दीवाबत्ती कर अन् चुलीवर थोडा भात ठेव. सकाळची आमटी पुरेशी होईल”.
गायत्री परिस्थितीचं भान ठेवून कामाला लागली. मात्र मनातून ती घाबरलेली होती. आई लवकर बरी होईल ना ? याची तिला आता धास्ती लागली होती. गायुला घर कामाची सवय होतीच. पण आज तिच्यावर सगळीच जबाबदारी पडली होती. चुकत-माकत तिने सगळं काम उरकलं. आईला गरम भात आमटी वाढून जेवायला आग्रह करू लागली. पण तापाने आईचे तोंड कडू झाले होते. गायूच्या आग्रहाने तिने कसेतरी दोन घास खाल्ले. आईने गायुलाच पोटभर जेऊन झोपण्यापूर्वी तिचं अंग दाबायला सांगितले. थोड्या वेळाने आई म्हणाली, “सकाळपर्यंत मला नक्की बरं वाटल, तू झोप आता”. तशी गायु देखील खूप थकली होती. त्यामूळे आईजवळ लागलीच झोपी गेली.
सकाळी आईला थोडसं बरं वाटताच तिनं जमेल तसा स्वयंपाक केला. पण अजून तिला थकवा जाणवत होता. गायत्री तिला मदत करीत होती. आई म्हणाली, “गायु मला अजून थकवा हाय पण सांजेपर्यंत बरं वाटेल. पण तू शाळेत जातांना वाटेतल्या दोन घरातील भांडी घासून जाशील का ? त्या मावशींना सांग, माझी तब्बेत बरी नाही. उदया नक्की कामाला येईल म्हणून”. गायुला परिस्थीतीमुळे जबाबदारीची जाणीव होती. जेवण करुन दप्तर पाठीला लावत आईनं सांगितलेल्या कामावर ती गेली. तेथील भांडी घासायचे कामं उरकून धावतच शाळेत पोहचली. उशीर झाल्यानं धापा टाकत मागे तिच्या बाकावर जाऊन बसली. दप्तर काढून ठेवत आसपास पाहते तरं सर्व मुलीं पूर्ण तयारीनिशी स्पर्धेची वाट पहात होत्या.ती एकदम भानावर आली. आईच्या आजारपणामुळे आजची स्पर्धा ती पार विसरून गेली होती. ती अगदी हिरमुसली पण तिच्याकडे आता कोणताही पर्याय नव्हता.
इतक्यात शिक्षक वर्गात शिरले आणि म्हणाले, “मुलींनो सुंदर हाताची निवड करायला सुरुवात करायची काय?” तसा मुलींनी लागलीच मोठ्या उत्साहात होकार दिला. शिक्षकांनी प्रत्येक मुलींचा हात तपासायला सुरवात केली. एका कागदावर ते नोंदी घेऊ लागले. सर्व मुलींनी स्पर्धेसाठी हात सजवले होते. काही मुलींनी तर नवीन कपडे देखील घातलें होतें. शिक्षक शेवटच्या बाकावर गायूच्या जवळ येताच ती एकदम हिरमुसलेली दिसली. स्पर्धेची तयारी करु न शकल्याने ती मनोमन नाराज झाली होती. शिक्षकांना आपला हात न दाखवताच खाली मान घालून उभी राहिली. शिक्षकांना नकळत याची जाणीव झाली. तरीही ते चौकशीसाठी म्हणाले, “गायत्री तुला आज स्पर्धा आहे हे माहीत होते ना ?” त्या वर तीने मान खाली ठेवूनच ‘हो’ म्हंटले. त्यावर शिक्षक म्हणाले, “मग तुझा हात दाखव पाहु. तू का तयारी केली नाहीस ?” त्यावर आपला हात शिक्षकाना दाखवताच गायत्रीस हुंदका फुटला अन् ती चक्क रडू लागली. तिचा हात कामाने, भांडी घासल्याने काळपट रापलेला दिसत होता. शिक्षकांनी तिला जवळ घेत पाठीवर हात थोपटून विचारले, “काय झालं ? शांत हो. सांग बघु काय झाले ते?” गायत्रीने आवंढा गिळत सर्व हकीकत सांगितली. शिक्षकांना तिच्या परिस्थितीचा अंदाज आला.”हरकत नाही” असे म्हणत तिच्या पाठीवर थापटत तिला शांत करुन ते निघून गेले. काहीवेळ शांततेत गेल्यावर पुढचां तास सुरु झाला.
मधल्या सुट्टीत इतर सर्व मुलींची माझाच कसा पहिला नंबर येईल याची चर्चा सुरु होती. सायंकाळच्या सुट्टीनंतर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाची लगबग सुरु झाली. मुख्याध्यापक व इतर शिक्षक स्थानापन्न झाले. औपचारिक सुरवातीनंतर स्पर्धेचा निकाल सांगण्यास सुरुवात केली. प्रथमत: तिसरा अन मग दुसरा नंबर जाहीर करण्यात आला. सर्व मुलींची उत्सुकता ताणली गेली. कारण ज्या मुलींना पहिल्या नंबरची खात्री वाटत होती त्यांना दुसऱ्या व तिसऱ्या नंबर वर समाधान मानावे लागले होते. शेवटी शिक्षकानी पहिला नंबर घोषित करताना मुलींनाच प्रश्न विचारला. ओळखा पाहू कोण असेल पहिली ? पण कोणीच बोलले नाही. शेवटी शांततेचा भंग करत शिक्षकांनी पहिला नंबर गायत्रीचा आल्याचे सांगितले. तसे सर्व मुलींना नवल वाटले. इकडे मात्र गायत्रीला आपण काय ऐकतोय यावर विश्वास बसेना. ती संभ्रमावस्थेत एकदम मोहरून व हरकून गेली होती. तिला हे सर्व अनपेक्षित वाटत होते. अगदी तिला नंबर जाहीर होताच उठून बक्षीस घेण्याचेही भान राहिले नव्हते.
शेवटी समारोपीय भाषणात मुख्याध्यापक म्हणाले,”मुलींनो सर्वानी सुंदर हाताच्या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. पण एक गोष्ट ध्यानात घ्या. स्पर्धेसाठी तुम्ही सर्वानी पूर्ण तयारी केली. स्पर्धेसाठी हात आकर्षक बनवण्यासाठी बरेच प्रयत्न देखील केलात. हात सजवलात. पण त्यामुळे हात केवळ सजेल, नटेल किंवा सुंदर दिसेल. पण त्याच हाताने जर काम केले किंवा कष्ट केले तर तोच हात अतिसुंदर बनतो किंबहुना त्याची प्रतिष्ठा कितीतरी पटीने वाढते. म्हणूनच आज स्पर्धेची खरी मानकरी गायत्री ठरली आहे. तिचाच हात सर्वात सुंदर आहे. “सर्व मुलीनां देखील यातून योग्य बोध मिळाला. मुलींनीही टाळ्यांचा कडकडाट करत कार्यक्रम संपन्न झाला.
अशा प्रकारे कष्टकरी हाताला खऱ्या अर्थाने सुंदर हाताचा मान मिळाला होता.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कष्टकरी हाताचे महत्त्व पटवून देणारी अतिशय सुंदर, भावपूर्ण कथा 🙏💐
धन्यवाद
कष्टकरी हाताचे महत्त्व पटवून देणारी अतिशय सुंदर भावपूर्ण कथा 🙏💐
धन्यवाद