तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे हल्ली जो तो भ्रमणध्वनीच्या जाळ्यात अडकलेला आहे. त्याला तरुणाई तरी कशी अपवाद असेल? इतर छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद, विविध छंद जपत त्यातून स्वानंदाची निर्मिती शब्दातीत असते, चित्त प्रसन्न करणारी असते. जीवनी रंगत वाढवणारी असते.
आज युवा पिढीला ऊर्जा मिळेल, नवप्रेरणा मिळेल अशा एका वेधून घेणाऱ्या व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. वयाच्या सोळाव्या वर्षी अकवीच्या परीक्षेत यशस्वी होऊन नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील कु.कुमुद, सौ. कुमुद विलास कदरकर बनून सातारमध्ये आल्या. काही कारणाने २५ व्या वर्षी दोन मोठ्या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी सांगितले होते की या रुग्णाची जगण्याची खात्री कमी आहे.
त्याच सौ. कुमुद विलास कदरकर काकूंनी नुकतेच ७२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ७२ वर्षाच्या सौ. कुमुद विलास कदरकर काकू म्हणजे खळखळता चैतन्याचा झरा आहेत. समाधानाचे गोड गुपित आहेत. निखळ आनंदाने भरलेली ओंजळ आहे. ज्या हर क्षणी जीवनानंद वेचत असतात आणि मुक्तहस्ते उधळतही असतात.
त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यातले हे वेगळेपण सहज दृष्टीस येते. वयाच्या मानाने काकूंची तब्येत अगदी उत्तम आहे. मी तर असे म्हणेन की एकदंर छंद जपण्याच्या आवडीमुळे कुमुद काकू म्हणजे सत्तरीतले प्रसन्न तारुण्य आहेत.
सुखी संसाराची वाटचाल सुरु असताना लग्नानंतर ६ – ७ वर्षांनी प्री. डिग्री परीक्षा देऊन काकूंनी बी.ए पूर्ण केले. संसार वेल बहरत असताना वयाच्या चाळीशीत काकूंनी मराठी विषय घेऊन एम ए पूर्ण केले. त्यावेळचा काळ वेगळा होता, लोकांचे विचार वेगळे होते तरी घराच्यांच्या साथीमुळे काकू शिक्षण घेत राहिल्या. एक मात्र आवर्जून सांगावेसे वाटते की बरेच जण म्हणतात वय झाले.. आता काय करणार ?
जर मनाची तयारी असेल, स्वतःवर विश्वास नि काही करून दाखवायची इच्छा असेल तर वयाचा अडसर कोठेही येत नाही हे नक्की आहे.
पुढे वयाच्या ५८व्या वर्षी काकूंनी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्यांना काकू म्हणणारी एक मुलगी त्यांची गुरू होती आणि काकू एक प्रामाणिक, आज्ञाधारक विद्यार्थीनी. तिथे वयाचा, अनुभवाचा मोठेपणा नव्हता फक्त एक साधना करण्याची तळमळ होती. शिकण्याची जिद्द होती. शास्त्रीय संगीत शिकायला वरच्या मजल्यावर पायऱ्या चढून जावे लागायचे. पायऱ्या चढताना काकूंना त्रास व्हायचा तरी त्यांनी अगदी मनापासून संगीत शिकले आणि संगीतामधील तीन परीक्षा देऊन उत्तम यश प्राप्त केले. या वयातही परीक्षा क्रमांक, परीक्षा खोली शोधणे अशा गोष्टींचा त्यांनी पुरेपूर आनंद घेतला. उत्साहाने त्या सगळे करायच्या. त्यांच्या तोंडून हे सर्व ऐकताना ती खुशी, तो उल्हास आपल्यापर्यंत अगदी सहजपणे पोहचते. ६५ व्या वर्षी त्यांनी बाजाची पेटी (हार्मोनियम) घेतली. आज ७२ व्या वर्षातही काकूंना रागांचा, स्वरांचा अभ्यास करायला आवडते. त्या नियमित सराव करत असतात.
घरातील कामे करत गुणगुणत असतात. याशिवाय संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढणे, इंग्रजी बोलायला शिकणे, गाडी चालवणे, चित्रकला, भरतकाम, विणकाम करणे अशा कितीतरी गोष्टी शिकल्या आहेत. आजही काकू दारात रांगोळी काढतात, भरतकाम करतात, अंगणातील फुलापानांपासून वेगवेगळ्या कलाकृती तयार करतात. इतकेच काय काकू सुंदर सुगरण आहेत. प्रत्येक पदार्थ घरातच बनवण्याकडे त्यांचा कल असतो. टापटीप, स्वच्छता हे त्यांचे गुण अनुकरणीय आहेत.
वयाच्या मानाने अनेक गोष्टींना आता फरक पडत असला तरी जितके होईल तितके येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत त्या मनापासून करतात.
कुमुद काकू घर संसार जितक्या उत्तम प्रकारे सांभाळतात तसाच त्यांचा सामाजिक वावरही आहे. साधारण १९८५-८६ पासून सलग १४ वर्षे ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही अशा मुलांसाठी काकू गणित नि इंग्रजी विषयांच्या शिकवण्या घेत होत्या तेही अगदी कमी शुल्क आकारून . कित्येकदा त्यांनी मोफत तरी मनापासून शिकवलेले आहे. ज्यात रिक्षावाले, भाजीवाले, चौकीदार, दूधवाले अशांची मुले असायची आणि जे आजही काकूंना भेटायला येतात. नोकरीवर किंवा परदेशी जाताना ही मुले आवर्जून काकूंचा आशीर्वाद घ्यायला येतात. काकूंसाठी असे अनुभव सुख म्हणजे काय हे सांगणारे असतात. आंतरिक समाधान देणारे असतात.
इतक्या सगळ्या वेगवेगळ्या व्यापातून काकूंचा वेधून घेणारा छंद म्हणजे त्यांचे लेखन. काकूंना लिखाणाची प्रचंड आवड आहे. त्यातही ललित लेखन फार प्रिय.
काकूंची निसर्गाबद्दलची आत्मिक ओढ त्यांच्या लिखाणातून दिसत असते. त्यांचे ललित लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तर टाळेबंदीच्या काळात फक्त फुलांवर लिहिलेल्या चारोळ्यांचेही एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.
वर्तमानपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. शिवाय आत्मचरित्र परीक्षण, पुस्तक परीक्षण, विविध विषयांवर चर्चा, ललितलेख वाचन असे विविधांगी कार्यक्रम सातारा आकाशवाणी वरती काकू नेहमी करत असतात.
सुनेसाठी कविता, सुनेच्या डोहाळे जेवणावेळी गीत नंतर बारशाच्या वेळी पाळणा, नातवाने पहिले पाऊल टाकले तेव्हा, नातवाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी, लेकीचे माहेरपण अशा कितीतरी साजिऱ्या गोजिऱ्या प्रसंगी काकूंनी स्वतः काव्य रचून गायले आहे आणि ते सर्व प्रसंग प्रत्येकाच्या हृदयावर छापले गेले आहेत.
हल्लीच्या व्यस्त जीवनमानात कोणाला कोणाशी बोलायलाही वेळ नसतो. शिवाय मनातील प्रत्येक गोष्ट बोलून दाखवता येतेच याचीही खात्री नसते. महामारीच्या काळात काकू आपल्या घरातील प्रत्येकाला पत्र द्यायच्या. जे काही मनातील भाव आहेत ते सर्व त्या कागदावर अलवार उतरून त्या पत्र लिहायच्या. अगदी त्यांच्या डॉक्टरांनाही धन्यवाद मानन्यासाठी चिट्ठी द्यायच्या. अशी आगळी वेगळी कौतुकाची भेट पाहून डॉक्टरांचेही मन प्रफुल्लित व्हायचे. सध्या त्यावेळच्या डॉक्टरांची डॉक्टर झालेली मुलेही काकूंना छान ओळखतात.
काका काकूंना दोघांनाही वाचनाची आवड आहे. आत्मचरित्र, प्रवास वर्णन असे वास्तविक दर्शन घडवणारे वाचायला त्यांना आवडते. त्यांच्या मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
साधारण ३० वर्षांपासून काकाकाकू त्यांच्या घरच्या बागेत रमतात. कधीही त्यांनी माळी किंवा इतर बाहेरच्या व्यक्तीला बागेच्या कामासाठी ठेवले नाही. झाडांना पाणी देणे, खत झाडांना घालणे, स्वच्छता, कलम तयार करणे अशी कित्येक कामे काका आणि काकू दोघेच करतात.
लक्षात घेण्यासारखी अजून एक बाब म्हणजे स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून खत बनवणे असो वा नारळाच्या केसरापासून कोकोपीट, झाडांसाठी जीवामृत तयार करणे असो वा झाडांच्या पालापाचोळ्याचा सुयोग्य वापर किंवा बागेतले आंबे झेलणीने उतरवून ते पिकायला ठेवणे .. इत्यादी सर्व कामे करताना किंवा बागे संदर्भात विविध प्रयोग करून पाहताना काका काकूंची ही जोडी मनापासून त्यात रमून जाते. जरी काकूंचे आत्ता वय ७२ अन काकांचे ८३ असले तरी त्यांचे हे छंद त्यांना जीवन मार्ग सुखद करून देतात. सकारात्मकता, जिद्द, इच्छा मनाला प्रसन्न करतात नि जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात फक्त सुखचं गवसत राहते, समाधानच मिळते.
काकूंचे लग्न झाले तेव्हाचा काळ वेगळा होता, लोकांची विचारसरणी वेगळी होती. मुलं मोठी झाल्यावर तोही काळ वेगळा.. विचारसरणीही वेगळी आणि सध्याच्या तरुणाईचा काळ तर फारच वेगळा नि आधुनिक पिढीची तंत्रज्ञान काळातील विचारसरणीही फार निराळी ..
अशा या प्रत्येक पिढीशी, प्रत्येक काळाशी काकूंना जुळवून घेणे सहज साध्य झाले कारण त्यांची उच्च विचारसरणी. प्रत्येकालाच आपले विचार पटतात असे नाही.. त्यामुळे तिथे ताणून धरण्यापेक्षा सोडून देत पुढे चालायचे. तरचं दोघेही आनंदाने राहू शकतात हे काकूंचे म्हणणे अगदी रास्त आहे. बदलती परिस्थिती आपलीशी केली की पथ सुलभ होत जातो. नवीन दिशा मिळत जाते.
काकूंचा अजून एक घेण्यासारखा गुण म्हणजे माणसं जोडणं. नाती- मग ती रक्ताची असो वा मानलेली मैत्रीची असोत, त्या अंतःकरणापासून नाती जपण्याचा प्रयत्न करत असतात.प्रत्येकाला त्या मनापासून दाद देतात. प्रत्येक आवडलेल्या सुंदर गोष्टींचे त्या मनभरून कौतुक करत असतात.
निसर्गावर काकूंचे प्रेम तर आहेच पण कितीतरी जगातील नवलाईच्या गोष्टी त्यांना भुरळ पाडतात. घरात बसूनही जगातील अनेक आश्चर्यांना पाहू शकतो हे त्यांना भावते. तंत्रज्ञान युगाने होणाऱ्या फायद्यांचे काकू नेहमी स्वागतच करतात.
सुविचारांचा भक्कम पाया काकूंना परिपूर्ण करतो.
उत्कृष्ट गृहिणी, लेखिका, गायिका, कवयित्री, शिक्षिका, मैत्रीण.. इत्यादी अशा अष्टपैलू काकूंवर शारदेचा वरद हस्त आहे. ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे ‘ हे फक्त त्या म्हणत नाहीत तर आपल्या कृतीतून वागून दाखवतात.
प्रत्येकजण दुसऱ्यांच्या चुका बघत असतो पण स्वनिरीक्षण करून चुका कबूल करायला मोठं मन लागतं. नाती जपायची असतील तर निर्मळ मनाने समोरच्याला आपलेसे बनवून क्षमा करणे हा श्रेष्ठ गुण बाळगावा लागतो. जो गुण काकूंकडे आहे.त्या म्हणतात, लिहिणे सोपे असते. पण लिहितो तसे आपण वागतोच असे नाही. जेव्हा दुसऱ्याला केलेला उपदेश आपण स्वतः आचरणात आणू तेव्हाच माणुसकीचे मोल समजू शकते.
काकूंच्या मनाचा निर्मळपणा त्यांच्या प्रत्येक कृतीतून, चालण्या बोलण्यातून, माणसं जपायच्या प्रांजळ भूमिकेतून दिसून येतो. अशा गुणी, हुशार सुनेचा काकूंच्या सासूबाईंना फार अभिमान वाटायचा.
साधारण ५६ वर्षांपूर्वी काकांनी अगदी दृढतेने, प्रेमाने काकूंचा हात हातात घेतलेला. या सुखद जीवन यात्रेत रेशमी प्रितीची आता मनमोहक कलाकृती निर्माण झालेली दिसते. काकांचे प्रेम, साथ, विश्वास काकूंसाठी दैवाने दिलेली अत्युत्तम भेट आहे.
किती तरी छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी असतात ज्या सुख म्हणजे काय हे दाखवत असतात. अशा गोष्टी पाहण्याचे दृष्टीसौंदर्य काकूंकडे आहे. ज्या त्यांना भरभरून आनंद देतात, जीवनाचे नव्याने दर्शन करवितात. आज ७२ व्या वर्षीही तितकीच जीवनाविषयी आस्था दाखवतात.
रसिक मनाच्या कलाकार काकू प्रत्येक गोष्टीचे सोने करतात. प्रेम करायला शिकवतात. बदलत्या काळाला जवळ करून जगण्याची उमेद देतात. रीत दावतात. हा सुंदर माणसाचा जन्म मिळाल्याबद्दल त्या ईश्वराविषयी कृतज्ञ तर आहेतच पण आयुष्यात अनेक काही प्रसंग काही व्यक्ती बरंचस शिकवून जातात, आयुष्याबद्दल निराळा विचार करण्यास भाग पाडतात, चांगले वाईट धडे देतात.. अशा सर्वांबद्दल काकूंच्या मनात कृतज्ञताच असते. आभार आणि कौतुकाची भावना म्हणजे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध. असे माणुसकीचे सुरेल गीत गाणाऱ्या कुमुद काकूंना आणि काकांना उत्तम आयुरारोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
— लेखन : सौ. मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर शब्दांत संक्षिप्त पण सर्वांगाने व्यक्तिमत्वाचे सार्थ चित्रण मनिषा पाटील ताईंनी केले आहे. सोबत अनेक फोटो, व्हिडिओ असल्याने लगेच त्या त्या विषयातील संदर्भ अधिक प्रकर्षाने जाणवतात. सर्व कलागुण संपन्न असे आदर्श व्यक्तिमत्व आई म्हणून मला लाभले यासाठी परमेश्वराचे मनापासून आभार.🙏👍 अलका ताई भुजबळ व सरांचे ही धन्यवाद. आपल्या इतर ही अनेक पोस्ट खुप माहितीपूर्ण आणि सुंदर आहेत. नेहमीच संपर्कात राहायला नक्की आवडेल. खुप शुभेच्छा.🙏🙏
वासंती खाडिलकर नासिक,30/11/24
कदरकरताईंची मुलगी शिवानी माझी मैत्रिण!काकूंचा जीवन प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.आयुष्यातला एकही क्षण त्यांनी रिकामा घालवला नसेल असं त्यांचं व्यक्तिमत्त्व.सतात नाविन्याचा ध्यास व सर्व झोकून देऊन प्राविण्य मिळवण्यातच त्यांच्या सदातरुण रहाण्याचे रहस्य आहे! त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!!
कुमुदताई माझ्या विहीणबाई! माझी लेक त्यांच्या घरात त्यांच्या मुलाला म्हणजे विशालला दिली आहे. सुविद्य पती-पत्नी माझ्या लेकीला सासू-सासरे म्हणून लाभले. खूप प्रेमळ आहेत दोघेही! परमेश्वराचे मनापासून आभार.
त्यांच्या चांगुलपणाच्या अनेक गोष्टी /अनुभव माझ्याकडे आहेत.
वानगी दाखल एक-दोन सांगते. माझी लेक केतकी लग्नापूर्वी साताऱ्याला त्यांच्या घरी जाणार होती. तिच्या सासर्यांनी दहा-बारा पालेभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे दहा-बारा बिस्किटांचे पुढे आणून कुमुद ताई समोर ठेवले. अहो एवढी बिस्किटे आणि भाज्या कशाला आणल्या. केतकीला जे आवडेल ती भाजी कर. तिला आवडतील ती बिस्किटे की खाईल. एवढा विचार येणाऱ्या सुनेबद्दल करणाऱ्या माझ्या व्याह्यांचा बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. केतकीला लग्नापूर्वी काढता येत नव्हती. कुमुद ताईंनी तिला इतकी सुंदर संस्कार भारतीची रांगोळी काढायला
शिकवले. दोघी सासू सुनांचा रांगोळी स्पर्धेत पहिला दुसरा क्रमांक आला. खूप गोष्टी कुमुद ताईनी तिला शिकवल्या.
दोघेही खूप प्रेमळ आहेत. अतिशय प्रेमाने त्यांनी दोनही नातवंडांना वाढवले.
त्यांचे पुस्तक प्रकाशन असो की वृत्तपत्रातील लेख असो मला त्या आवर्जून वाचायला पाठवतात. तुमचे दोघींचे मैत्रिणीसारखे नाते आहे. बंगल्यासमोरील आंब्याच्या झाडाचे आंबे असो की नारळ सर्व बागेची निगराणी ते दोघे मनापासून करतात आणि म्हणूनच कित्येकदा देवाला शंभर फुले सुद्धा वाहिलेली असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे! त्यांच्या उत्साह असाच कायम रहावा याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
नमस्कार … लेख आणि व्यक्तीचित्रण….
एका गुणसंपन्न व्यक्तीशी ओळख झाली …कुठेतरी स्वतःचा शोध लागला असेही वाटून गेले … खूप धन्यवाद