Saturday, October 5, 2024
Homeसंस्कृती'कला सुरभी' ( २ )

‘कला सुरभी’ ( २ )

गौरी-गणपती उत्सव
श्रावणातली व्रत-वैकल्याची धामधूम संपत असतानाच वेध लागतात गौरी-गणपतीचे !

भारत देशामध्ये संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात .तसेच वर्षभर वेगवेगळे सण साजरे केले जातात. भारतामधले सगळे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात पण त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे गणपती उत्सव. गौरी-गणपती या सणांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वेगळेच प्रेम आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.

भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची मूर्ती आणली जाते व ११ दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते.

महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बालीमध्ये या उत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये भगवान गणेशाच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कुटुंबे, मंडळे, गटांकडून पूजा केली जाते. परंतु उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मंदिरांमध्ये भगवान गणेशाची तात्पुरती मूर्ती बसवून हा उत्सव साजरा केला जातो.

सार्वजनिकपणे गणेशोत्सव गणपती मंडळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात. यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. सगळेजण सजावट, गणपती आणणे, विसर्जनात हिरिरीने भाग घेतात. सकाळ, संध्याकाळ आरती, प्रसाद – खिरापत, लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, रात्रीचे कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर यांचे आयोजन करुन गावातील मुलांना, कलाकारांना त्यांच्या कला सादर करायला वाव मिळतो. त्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन केले जाते. लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. काही काही गणेश मंडळे सामाजिक उपक्रमही राबवतात ही स्तुत्य बाब आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने, लोकांनी गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यास सुरुवात केली आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खरोखरच एक अनोखा पर्याय म्हणजे भक्तीसंगीत, वाद्य संगीत कार्यक्रम. कलाकारांना गणपतीचे अभंग, भजन आणि भक्तिगीते गाण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

संगीत आपल्या मनाला आनंद देते. इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये खूप वैविध्य आहे. बासरीवादन, व्हायोलिन, सरोद, सतार, जलतरंग, फ्यूजन, सोलो कॉन्सर्ट, वाद्यांची जुगलबंदी इत्यादी यांसारखे कार्यक्रम करणारे कलाकार आहेत, ज्यांना सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. गणेश मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करतात. तसेच शास्त्रीय गायन कार्यक्रम, मधुर संगीत वाद्यवृंद, ऑर्केस्ट्रा, बॉलीवूड क्लासिक्स, समकालीन हिट्स, लोकगीते इत्यादी सादर केले जातात.

‘हसणे ​​हे सर्वोत्तम औषध आहे’, ही सुप्रसिद्ध म्हण आहे. कॉमेडियन सहसा विनोदी कथा, विनोद, वन-लाइनर्स किंवा मिमिक्री करतो. कॉमेडी शो तुमच्या आवडीच्या भाषेत असू शकतो.

गणपती बसल्यानंतर दोन दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या तीन दिवस राहतात. फक्त तीन‌ दिवसांचंच त्यांचं माहेरपण. पण येताना आपल्यासोबत त्यांनी आणलेला उल्हास-चैतन्य मात्र वर्षभर पुरतो. लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी जमीन समृद्ध करण्यासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करणे हा मूळ हेतू असतो.

भारतात भाद्रपदातली ज्येष्ठा गौर महाराष्ट्रातही विविध प्रकारे अवतरते. सालंकृत मूर्तिरूपात अनेक ठिकाणी ती जोडीने येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा ! या मूर्तिरूपांना बहुधा महालक्ष्मी, लक्ष्म्या म्हणतात.

कोकणात अनेक ठिकाणी एकच मूर्ती असते. कोकण-गोवा प्रदेशात मुखवट्याची एकच गौरीची मूर्ती असते. पण त्याच जोडीला पाणवठ्याकाठी असलेले गोटे, आपोआप उगवलेली रंगीबेरंगी फुलांची, तेरड्याची रोपे आणून तीच गौर म्हणून पुजतात. म्हणून हल्ली गौरी- गणपती समोर मंगळागौरीचे कार्यक्रम केले जातात.

अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला ढोल-ताशा, नगारे वाजवीत गणपतीला विसर्जनासाठी तयार केले जाते. गणेश विसर्जनासाठी एक भव्य रथ सजवला जातो. यानंतर गणपतीची आरती करून संपूर्ण शहरात शोभायात्रा काढीत “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या तऱ्हेच्या गर्जना, अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना अंत:करण दु:खी होते. मिरवणुकीच्या शेवटी शहरातील तलाव, नदी अथवा समुद्रात भगवान गणेशाने विसर्जित केले जाते.

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९