Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यकविता दिन : काही कविता

कविता दिन : काही कविता

आज, दिनांक २१ मार्च हा दिवस जागतिक कविता दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना म्हणजेच कविता रचणा-या आणि वाचणा-या, कवितेचे सादरीकरण करणा-या आणि त्यांचा आस्वाद घेणा-या, प्रत्येक व्यक्तीला जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

१. कवी

प्रत्येकाच्या अंतरंगी एक कवी दडलेला असतो ।
जाणवला जरी नाही कोणा, तो कवितेला नक्कीच दिसतो॥

विरह, प्रीती, त्याग भावना; तो दु:ख मनातील पुसतो।
साकारते कविता मनातच, अन् कवी मनातच हसतो ॥

अंतरातून ओठांवरती येणारा शब्द फुलून बोलतो ।
कविता फुलते पानोपानी आणि कवी मनीच डोलतो ॥

शब्दपुष्प मनमोहक दिसता, फुलपाखरू होऊन भुलतो।
कवितेच्या बागेत बागडता, भृंगराज तो मनातच खुलतो ॥

कविता नाही इतकी सोपी, हाती न लागली म्हणून रुसतो।
कधी शब्दांच्या घन काटेरी जाळीमध्ये अडकून फसतो ॥

कविता राणी प्रसन्न होउनी, वरते तेव्हा कविराज भासतो।
कागदावर उमटली ना जरी, मनी सर्वांच्या कवी जरूर वसतो ॥

— रचना : सौ. मृदुला राजे.

२. कविता म्हणजे……….?

कविता म्हणजे…..
जन्मजात प्रतिभा
कवि ह्रदयातील वेदना
विचारांचे काहुर

कविता म्हणजे…..
कवि मनाची लहर
यमक अलंकार जुळवत
शब्दांचा केलेला कहर

कविता म्हणजे…..
नऊ रसांची गुफंन
हास्य,भयान, रौद्र,
बीभत्स शांत, वात्सल्यचे मिलन

कविता म्हणजे…..
कवि मनाच्या विविध तरहा
मनी दाटलेल्या भावनांचा
खळखळता झरा

कविता म्हणजे……..
सुख दु:खांची झालर
उत्सफुरत भावनांचा उद्रेक

कविता म्हणजे………
नाजूक तरल नखरेल
लावण्यवती नार
लेखणीस लावलेली धार

कविता म्हणजे …..
शेतकर्‍याच्या कष्टाची
त्याच्या मनाची, राना वनाची
कथा ऊन पाऊसाची

कविता म्हणजे…..
सृष्टीतील प्रत्येक वस्तुची
सजीव निर्जीव चराचरातील
अश्चर्यचकीत निर्मिती

— रचना : अनिसा सिकंदर. दौंड

३. कविता

दुःखाचा तो उसासा असते कविता
सुखाचा तो दिलासा असते कविता
कविता असते प्रेमाची अवीट गोडी
रागलोभाच्या फोडी असते कविता

मनाची तीव्र स्पंदने असते कविता
अतूट अशीच बंधने असते कविता
कविता असते प्रीतीचे सुंदरसे गाव
झोपडीवरील झाव असते कविता

काळजाची चिंता असते कविता
भावनांतील गुंता असते कविता
कविता असते निसर्गातील गाणे
कणसांतील दाणे असते कविता

आईचे वात्सल्य असते कविता
कवींचे खरे पाल्य असते कविता
कविता असते ती आजीची माया
बापाची थंड छाया असते कविता

भावनांचा कल्लोळ असते कविता
आगीचा लाल लोळ असते कविता
कविता असते मनांतील आक्रंदन
पूज्य गुरुजींना वंदन असते कविता

शेतातील हिरवे पीक असते कविता
झाडांतील मऊ चीक असते कविता
कविता असते निसर्गाचे अफाट रूप
साहित्य प्रकारात नॄप असते कविता

शाळेतील शिक्षक असते कविता
सीमेवरील रक्षक असते कविता
कविता असते पोशिंदा शेतकरी
साहित्यात विं.दा.असते कविता
वाहणारी सरिता असते कविता

खळखळता झरा असते कविता
कविता असते विशालसा सागर
चैतन्याची घागर असते कविता

जिजाऊचा छावा असते कविता
रानातील विसावा असते कविता
कविता असते सावित्रीचे पुस्तक
शूरवीरांचे मस्तक असते कविता

अस्सलतेचे रूप असते कविता
आरतीतील धूप असते कविता
कविता असते तुळशीची माळ
पोटातील जाळ असते कविता

प्रियकराची साद असते कविता
संगीतातील नाद असते कविता
कविता असते तलवारीची धार
गगनातील घार असते कविता

ज्ञानेश्वराची ओवी असते कविता
तुकारामाचे अभंग असते कविता
कविता असते एकनाथी भारूड
गाडगेबाचे गारूड असते कविता

भ्रुणहत्येचे पातक असते कविता
तहानलेला चातक असते कविता
कविता असते समता पेरलेले बीज
अन्यायग्रस्तांची वीज असते कविता

जीवनाचा पूर्ण सार असते कविता
प्रेमी प्रेमिकांचा यार असते कविता
कविता असते व्यापून घेतलेले जग
नभात उडणारा खग असते कविता

— रचना : प्रा. मोहन काळे. अकोला

४. कविता……..

कविता……
सुगंधी फूल
हसरं मूल
हलते डूल

कविता…….
शब्द, गोंदणी
भाव चांदणी
हाती लेखणी

कविता……..
कपोल ओले
अश्रू झरले
कोणी पुसले?

कविता……..
खळी पडते
गोड लाजते
उगी हासते

कविता…..
माया पाझर
तो गहिवर
प्रेम फुंकर

कविता………
कष्ट वेदना
भोग यातना
सावरते ना

कविता……
शब्दसरींनी
चिंब न्हाऊनी
लावण्यखणी

– रचना : अरूणा दुद्दलवार

५. कविते….

तू आहेस तरी कशी ?

मनांत डोकवतेस…
पण पाऱ्यासारखी निसटतेस…
धरू पहाता,
लांब लांब पळतेस..!

कधीतरी अचानक
दार ठोठावतेस,
मोजक्याच शब्दांत..
समोर उभी रहातेस !

कधी तू रडवतेस…
कारूण्यात भिजतेस!
हळूवार शब्दातून,
हुंदके देतेस!

कधी तू फसवतेस..
रुसून बसतेस….
शब्दा, शब्दाशी
अडखळायला लावतेस!

कधी निरागसतेने,
हसरी होतेस,
लाघवी बोलात,
अडकवून ठेवतेस!

कधी मैत्रिण बनून
गळ्यात पडतेस,
शब्दांच्या धबधब्यात,
ओलीचिंब करतेस!

कधी अंतरंगात
खोल डोकावतेस,
मनाच्या तळापर्यंत
ढवळून काढतेस!

कविते..
तू आहेस तरी कशी ?
जिवाभावाची सखीच जशी !

— रचना : चित्रा मेहेंदळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. कवितादिनानिमित्त समावेश केलेल्या सर्व कविता अतिशय उत्तम आहेत.
    प्रतिभा सराफ, मुंबई

  2. जागतिक कविता दिवस निमित्ताने वाचनीय वाचन आस्वाद निर्माण करणाऱ्या सुंदर कविता संपादन साहेब

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८