Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यकविता : होळी आणि रंगपंचमी च्या

कविता : होळी आणि रंगपंचमी च्या

होळी

१. होळी
होळी व्हावी दुष्ट प्रथांची वाईट विचारांची
जळावी किल्मिषे मनांतली हेय विषारांची

नका तोडू झाडे होळीत दहन करायला
झाडे देती प्राणवायू विश्वाला सांवरायला

झाडे राखती समतोल तो पर्यावरणाचा
ठेविती काबूत इथे राक्षस प्रदूषणाचा

जाळा कचरा बकाल ठरणारा भोवतीचा
अस्वच्छ परिसरात हळी स्वर निषेधाचा

— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर, पुणे

रंगपंचमी

१. रंग

या मुलांनो, या मुलींनो
रंगाने या खेळू या
रंगीत रंगांनी रंगूनी
रंगांना या रंगवूया…..धृपद

लाल केशरी रंग उडवूनि
स्मरण करा त्या रक्ताचे
धारातीर्थी पडले जेथे
लाल मायभूमीचे ते
अंगअंग माखू दे केशरी
स्वार्थाची त्या करूया होळी
स्वयंस्फूर्तीने एकजुटीने
लाल माती ही फासू या……(1)

आणा आणा हो पिवळी झारी
नाजूक,कोवळी हळद लाजरी
स्वाद,स्वास्थ्यही देई साजिरी
लुटा पिवळी ही गंमत न्यारी
शिशिर संपता वसंत येतो
हिरवी वनराई फुलवितो
समृध्दीच्या चाहुलीत मग
हिरव्या रंगी रंगू या……(2)

नवी नव्हाळी लाल कोवळी
कंच पाचूने ही नटलेली
शांतिसुखाच्या शोधासाठी
निळी निळाई उडवू या
निळ्या सागरी निळ्या आभाळी
गूढरम्यशा गर्द जांभळी
चिंतन करुनि या रंगांचे
रंगार्थातचि गुंगू या……(3)

उडवूनी रंगा भिजवी अंगा
तप्त तनमना तुम्ही शांतवा
एकच गहिरा भाव सुखाचा
श्र्वेत धवल तो पवित्रतेचा
होलिकोत्सवी मारा बोंबा
विसरूनी जाण्या द्वेषभावना
देशबंधुप्रेमाच्या रंगी
जागृतीत या रंगू या…….(4)

रंगीत रंगांनी रंगूनी
रंगांना या रंगवू या

— रचना : स्वाती दामले.. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments