नमस्कार मंडळी.
कालच महावीर जयंती साजरी झाली. यानिमित्ताने एक कविता आणि आज वसुंधरा दिन असल्यामुळे ३ रचना सादर करीत आहे.
– संपादक
प्रणाम वीरा महावीरा
वर्धमान सन्मती अतिवीरा
प्रणाम वीरा महावीरा
जन्म कुंडलपुरात माता त्रिशला,
पिता सिद्धार्थ दीक्षा घेई तारुण्यात
त्यजुनी मिथ्या संसारा
पंचनाम तुजला असती
नावासम तुझी कीर्ती
निर्भय, शुर तुझी वृत्ती
लांछनी सिंह शोभे खरा
समतेचा तव उद्घोष हो
‘जगा आणि जगू द्या’ हो
सकल जीवांना अभय लाहो
‘अहिंसा परमो धर्म’ खरा
अनेकांताची शिकवण
विश्वशांतीमय जीवन
स्व-परिग्रह सिमित जाण
भेदा-भेदा नसो थारा
प्रचार अहिंसेचा केला
मार्ग शांतीचा दाखविला
पावापुरी मोक्षा गेला
दिपावली सण हो साजरा
–– रचना : भारती महाजन- रायबागकर. चेन्नई
वसुंधरा दिन : ३ रचना
१. वसुंधरा रक्षण
अभंग
ह्या वसुंधरेचे |
कर्तृत्व अखंड |
दातृत्व उदंड |
सदैवचि ||१||
सिमेंट जंगल |
वसुंधरा ऱ्हास |
कोंडतो श्वास |
सकलांचा ||२||
वृक्षतोडणीत |
मनुज हा व्यस्त |
धरा झाली त्रस्त |
वेदनेने ||३||
तपमानामुळे |
उष्णतेची वृध्दी |
जळली समृद्धी |
निसर्गाची ||४||
पर्जन्य भेटीची |
धरा धरे ध्यास |
तिला लागे आस |
निर्मितीची ||५||
वसुंधरेवर |
आलीय आपत्ती |
ती तर संपत्ती |
जपू तिला ||६||
झाडे लावुनिया |
बनू वृक्षमित्र |
हरित हे चित्र |
पृथ्वीवरी ||७||
दक्षाचे सांगणे |
घेऊया वचन |
करू संवर्धन |
वृक्षांचे ह्या ||८||
रचना : डॉ दक्षा पंडित. मुंबई
२. 🌳वसुंधरा 🌳
अभंगरचना
हिरवाई सारी।
सजे वसुंधरा।
निळ्या त्या अंबरा।
साजतसे ।।१
घनगर्द झाडे।
पक्षांचा निवास।
माणसं आवास।
शोधतात ।।२
तोडूनिया वृक्ष।
उजाडले रान।
केलेत वैराण।
माळ सारे ।।३
विच्छिन्न डोंगर।
डोळा बघवेना
घाव जीवघेणा।
अंगावर ।।४
जल अपव्यय।
कुठे नसे पाणी
जीवनदायिनी।
मृतवत।।५
उणा प्राणवायू।
जाणवू लागला।
निसर्ग कोपला।
करणीने।।६
देणे विधात्याचे।
माना कृतज्ञता
सकलांची त्राता।
वसुंधरा ।।७
सांगते “अरुणा”।
नीट ध्यानी धरा
केले तसे भरा।
नियम हो ।।८
रचना : अरुणा दुद्दलवार. यवतमाळ
३. हे वसुंधरे
हे वसुंधरे,
तुझा आक्रोश नाही गं,
ऐकू येत मनात आमच्या,
तुझा टाहो नाही गं,
घुमत उरात आमुच्या ॥१॥
हे वसुंधरे,
तुच गं भुमाता, तूच गं धरित्री,
तुच गं जननी, तूच गं निर्मिती,
तुच गं अवनी, तूच गं भूमिती
तुच गं आकृती, तूच गं भूकिर्ती ॥२॥
हे वसुंधरे ,
तुझ्या गं गर्भात उःषकाल उद्याचा,
निसर्ग जप तू काल अन आजचा,
विज्ञानाचा निर्मळ झरा गं तू,
भूगोलाचा आकार गं तू ॥३॥
हे वसुंधरे,
तुझ्या गर्भात लपली खनिजे,
तुझ्या गर्भात लपले पाणी,
तुझ्या गर्भात लपले खनिजे तेल,
तुझ्या गर्भात लपली माणिकरत्ने ॥४॥
हे वसुंधरे,
निसर्गाची सहनशिलता तु,
निसर्गाच्या सर्जनाची जननी तू,
निसर्गाच्या चमत्काराची माय तु,
निसर्गाच्या स्पंदनाची टिकटिक तू ॥५॥
हे वसुंधरे,
तुच गं भूगोल, तूच गं नकाशा,
तुच गं इतिहास, तूच गं अर्थशास्र,
तुच गं शरिरज्ञान, तूच गं प्राणीज्ञान
तुच गं वृक्षविज्ञान, तूच गं रत्नज्ञान ॥६॥
हे वसुंधरे,
मर्यादा तुझी संपता,
करती तू धरणीकंप,
मानवा साधतो स्वार्थ,
त्याला म्हणतो भूकंप ॥७॥
रचना : पंकज काटकर. काटी, धाराशिव
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800