Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यकहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची

महात्मा गांधींजी ची नई तालीम, शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक आणि चित्रा नाईक, किंवा केंद्र शासनाने अमलात आणलेले नवे शैक्षणिक धोरण 2020 यांचे शिक्षण विषयक प्रयोग खरोखरीच उपयुक्त होणार आहेत का ? अशा प्रश्नांची उत्तरे केवळ परिसंवादात सापडणे कठीण असते. पण अशा संकल्पनांना मूर्त रूप देणे या साठी काही द्रष्ट्ये आपले आयुष्य वेचत असतात. त्याची ही कहाणी आहे.

पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यात पाबळच्या ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या विज्ञाना आश्रमाची ही कहाणी आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग होते तसे एक द्रष्ट्ये.

अमेरिकेतील शिकागोच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय येथे डॉक्टरेट चा अभ्यास करतानाच आणि भारतात परतल्यानंतर हिंदुस्तान लिव्हर रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून 1982 पासून काम करताना एखाद्या खेड्यात ग्राम विकासद्केंद्री तंत्रशिक्षण केंद्र सुरू करायचे ही संकल्पना ते घोळवित असायचे. जमेल तेव्हा दौरे करून लोकांशी भेटी गाठी करून विचार पक्का केला. शासन कारभाराचा अनुभव घेत घेत न कंटाळता त्यांनी पाठपुरावा केला.
शासनाकडून त्यांना पाबळ येथे जागा मिळाली. ग्रामीण मंडळींशी संवाद साधत नाते जोडत त्यांनी काम सुरू केले.

वर्ष १९८०- 81 चे ते दिवस होते . पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेले हे गाव. दिवसातून एकदाच एस टी ची बस यायची. वीज नव्हती, फोन पुण्यात सुद्धा मिळणे दुरापास्त होते. थोडेबहुत शिक्षण घेतलेली मुले नोकरीसाठी पुण्या -मुंबईसारख्या शहरात वणवण भटकत असायची.

डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी आपल्या ग्रामविकासकेंद्री तंत्रशिक्षण संकल्पनेचा पत्नी मीरा यांच्या मदतीने नेटाने पाठपुरावा केला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘विज्ञान आश्रम, पाबळ’ या संस्थेचे डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी, शिक्षणाच्या मदतीने ग्रामविकास, रुरल डेव्हलपमेंट थ्रू एज्युकेशनल सिस्टीम, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी असे प्रयोग त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

या प्रत्येक प्रयोगात “हाताने काम करीत शिकणं, बहुविध कौशल्य, लोकोपयोगी सेवा आणि उद्योजक हाच शिक्षक” हे तत्त्वज्ञान पायाभूत होतं.
‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून अधिक फलदायी असा विज्ञाननिष्ठ ग्रामविकास’ हे कलबाग सरांचे ध्येय होते. १९८३ ते २००३ ही त्यांच्या जीवनाची अखेरची दोन दशके. या कालखंडात त्यांनी घडवून आणलेले बदल आपल्या पाबळ खेड्यापुरते राहिले नाहीत. पुणे शहर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि राज्यात, आणि राज्याबाहेर त्यांनी आपल्या संकल्पना राबवून पाहिल्या. लोकांनी हळूहळू त्यांना प्रतिसाद दिला. आदिवासी, दुष्काळग्रस्त, नक्षलग्रस्त अशा कठीण भागात त्यांनी स्थानिक प्रश्न हाताळले. ग्रामविकासाच्या ध्येयाने प्रेरित असंख्य युवक युवतींनी त्यांना प्रतिसाद दिला. स्वतःचा, कुटुंबाचा आणि आपल्या गावाचा विकास करून दाखवला.

हळूहळू राज्य शासनाने, केंद्र शासनाकडून डॉ कलबाग यांना प्रतिसाद मिळत गेला.
सध्या विविध संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र व्यतिरिक्त राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यामध्ये 700 पेक्षा जास्त शाळांमध्ये आयबीटी अभ्यासक्रम राबवला जातो. उत्तर प्रदेशच्या साठ शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी ते आठवी साठी “लर्निंग बाय डुइंग“ या नावाने व्यवसाय शिक्षणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था हा कार्यक्रम राबवतात. विविध उद्योग समूहाच्या आर्थिक मदतीने हे काम केले जाते. नवीन राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार कागदपत्र हा अभ्यासक्रम मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या नावाने ओळखला जातो. नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि नवीन अभ्यासक्रम आराखडा 2023 यात सुद्धा आय. बी.टी अभ्यासक्रमाच्या तत्त्वांचा समावेश आहे.
आय बी टी चा अभ्यासक्रम 35 वर्षांच्या प्रयोगानंतर आणि परिश्रमानंतर शिक्षणाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवाहात टिकून आहे. तो एक महत्त्वाचा विषय झाला आहे ही गोष्ट पाबळच्या विज्ञान आश्रमाला निश्चितच भूषणावह आहे.

वर्ष 2016 मध्ये आय बी टी अंतर्गत हिरकणी विद्यालयात 3d प्रिंटिंग प्रायोगिक तत्त्वावर शिकवायला सुरुवात झाली . 2022 मध्ये सुमारे 25 शाळांमध्ये 3d प्रिंटर्स आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंग सेन्सर संगणकीय डिझाईन हे विषय देखील आता आय बी टी मध्ये समाविष्ट झाले आहेत. विज्ञान आश्रमाच्या येत्या काळातील वाटचालीची दिशा यातून स्पष्ट होईल.

विज्ञान आश्रम च्या शिक्षण विचारांचे देशात सार्वत्रिकीकरण झाल्यास स्थानिक समस्या सोडवताना स्थानिक युवांना ज्ञानकर्मी बनवणारी ‘लॅब्ज-कम-वर्कशॉप्स ही ग्रामीण भारताची आधुनिक शैक्षणिक परिसंस्था होऊ शकेल. हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये व्यक्त केलेले मत पटायला लागते.
फक्त यासाठी प्रयोगशील, विज्ञाननिष्ठ आणि विषमतामुक्त अशा स्वावलंबी समाजाची धारणा करणाऱ्या शिक्षणाची तत्त्वे सर्वत्र रुजायला हवीत. भारताच्या प्रत्येक गावातील शाळेत ‘विज्ञान आश्रमाच्या’ संकल्पनेतील शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी स्थानिक सामाजिक सहभाग असायला हवा. त्याचबरोबर कौशल्यविकास, ग्रामीण विकास आदिवासी विकास, लघु-मध्यम उद्योग विकास, उद्योजकता विकास, कृषी विकास, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, मागासवर्गीय विकास, इत्यादी शासकीय विभागांच्या योजनांतील पुरेसा निधी या साठी द्यायला हवा. या संकल्पनेचा पाठपुरावा त्या त्या संस्थेतील प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी असा सर्वानीच केला पाहिजे. समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवणे, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला साद घालणे व ते प्रश्न शिक्षणाच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करणे ही विज्ञान आश्रमाची मूळ भूमिका आहे.

आपल्या वाटचालीत आलेले भले भुरे अनुभव आणि मिळालेले यश याचा अतिशय वस्तूनिष्ठ लेखाजोखा संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी प्रांजलपणे या पुस्तकात दिला आहे. डॉ. कलबाग यांचे वारस या नात्याने ते सध्या घेत असलेले परिश्रम सर्वांना उपयुक्त होतील असे आहेत. त्यामुळे ‘ग्रामीण विकासातून तंत्रशिक्षण आणि त्या शिक्षणातून अधिक फलदायी असा विज्ञाननिष्ठ ग्रामविकास’ या विषयाचे हे क्रमिक पुस्तक व्हायला पाहिजे. ते फक्त मराठी आणि महाराष्ट्र या पुरतेच मर्यादित न राहता इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे असे नक्की सुचवावेसे वाटते.

वंदना अत्रे आणि शोभना भिडे यांचे शब्दांकन रसाळ तर आहेच पण सामाजिक जाणिवेतून केलेल्या अथक प्रयत्नांचे दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) वाचकांच्या संदर्भासाठी कसे असावे याचा वस्तू पाठच त्यांनी घेतलेला आहे. त्याची मुद्दाम वेगळी दखल घेतली पाहिजे.

प्रा. डॉ. किरण ठाकूर

— परीक्षण : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८