Saturday, April 20, 2024
Homeलेखकान टोचनारी "होळी"!

कान टोचनारी “होळी”!

होळीच्या दिवशी लाकूडफाटा जमा करण्याची सर्वत्र लगबग सुरू असताना आम्ही वृक्षारोपणाच्या नियोजनसाठी भल्या पहाटे डॉ. मालपाणी स्मृति केंद्र चिखलगाव (किनवली) ता. शहापूर जि. ठाणे या ठिकाणी जाण्याचे ठरविले. निदान सुट्टीच्या दिवशी तरी घरी रहावे ही घरच्यांची सर्वसामान्य अपेक्षा. परंतु जाऊन आलोच असे सांगून प्रकाशभाऊ व जीवनभाऊ हजर झाले. सोबतीला मंगेश दादा होते.

कल्याण मार्गे जाणार आहोत मग सचिन सरांना फोन करण्याचे एकमताने ठरले. त्यांनीही बरोबर यावे अशी मनोमन इच्छा होती. परंतु विचारायची हिंमत नव्हती. कारण गेल्याच रविवारी ते प्रभात यात्रेत सहभागी झाले होते, म्हणून शहापूरला जाताना फक्त तुम्हाला भेटायला येतो असे सांगून फोन केला. रोज पहाटे चार वाजता उठणारा माणूस आज सात वाजले तरी निद्रिस्त होता. त्यामुळे जाते ऐवजी येताना त्यांना भेटावे असे ठरले. कल्याणच्या वेशीवर पोहोचल्यावर अगदी GPS ने ट्रॅक करावे त्याप्रमाणे त्यांचाच फोन आला, सर कुठे पोहोचलात ? कल्याण मध्येच आहोत हे समजल्यावर त्यांनी घरी येण्याचा आग्रह केला. परंतु सुट्टीच्या दिवशी एवढ्या सकाळी घरच्यांना त्रास नको म्हणून परतीच्या प्रवासात येतो असे सांगून तुम्हीच आमच्याबरोबर येता का ? अशी न राहून आम्ही त्यांना गळ घातली. आमचा आग्रह पाहून ते ही अंघोळीला बुट्टी देऊन आमच्याबरोबर येण्यास सज्ज झाले.

चिखलगावला पोहचल्यावर आम्ही ‘मियावॉकी’ पद्धतीच्या वृक्ष लागवडीसाठी जागेची पाहणी केली. या प्रकल्पावर सध्या शेती केली जाते. त्या ठिकाणी भेंडीचे पीक अगदी जोरात आले होते. भाव विचारला तर दहा पंधरा रुपये किलो मिळतो असे समजले. घरच्यांच्या शब्दाचा मार थोडा कमी करावा यासाठी भाजीपाला घेऊन घरी जाऊया असे सर्वांचे एकमत झाले.

प्रकल्पाची पूर्ण पाहणी केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना त्यांनी चक्क एक गोणी भरून भेंडी दिली. या भेंडीचे पैसे घ्यावे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली परंतु त्यांनी आमची काहीएक ऐकले नाही. येताना ठरल्याप्रमाणे सचिनसरांच्या घरी दोन चार किलो भेंडीची भली मोठी पिशवी घेऊन आम्ही प्रगटलो. भेंडी पाहून त्यांच्या आईने विचारले, कशाला आणली एवढी भेंडी ? आणि त्याचे पैसे तुम्ही दिलेत का ? आपल्याला कोणाचेही फुकटचे नको..! “शेतकऱ्याला त्याच्या श्रमाचे पैसे मिळालेच पाहिजे” असे त्यांनी आम्हाला खडसावले.

स्वागतच अशाप्रकारे झाल्यावर आम्ही कसेबसे स्थानापन्न झालो. मग थंडगार सरबत आले. आणि सगळे कसे गारेगार झाले. आता निघायच्या तयारीत असतानाच पुन्हा दम भरला गेला, जेवल्याशिवाय जाता येणार नाही. कोणतीही पूर्वकल्पना दिल्याशिवाय चार पाहुणे जेवणासाठी हे मनाला पटत नव्हते. म्हणून आम्ही भूक नाही अशी बतावणी करून निघण्याच्या तयारीत होतो. पुन्हा एकदा सचिनसरांच्या आईने, आज सणाचा दिवस आहे. दोन घास पुरणपोळी खाल्ल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही असा आदेशच दिला आणि आमचा नाईलाज झाला.

माझी नावडती पुरणपोळी ही मी पुन्हा मागून खाल्ली इतक्या अप्रतिम पुरणपोळ्या वहिनींनी केल्या होत्या. जेवणाबरोबर संवादही सुरू होता. सात-आठ वर्षांपासून सचिन सरांशी मैत्री आहे परंतु घरी जाण्याचा योग कधी आला नव्हता.गप्पांच्या ओघात वडील गिरणी कामगार व आईने शाळेमध्ये मावशी म्हणून काम करून सचिन सर व त्यांच्या दोन बहिणींचे शिक्षण पूर्ण केले. सचिन सर व त्यांची एक बहीण आज दोघेही शिक्षक आहेत तर दुसरी बहीण नोकरी करते.

कोकणातील स्वतःचा बागेतील नारळ स्वीकारत आम्ही पुन्हा येण्याचा वायदा करून निरोप घेतला. उरलेल्या भेंडीचे आम्ही सर्वांना वितरण केले. परंतु शेतकऱ्याचे पैसे द्यायला पाहिजेत हे आईंचे वाक्य स्वस्थ बसू देत नव्हते. तत्काळ प्रकल्पाचे व्यवस्थापक मन्नूभाई यांना ऑनलाइन पैसे पाठविले. आप्पांच्या नंतर अशा प्रकारे कान टोचणारे कोणीतरी भेटले होते. सचिनसर ज्या चिकाटीने व प्रामाणिकपणे शिक्षकी पेशातून नवी पिढी घडविण्याचे काम करतात त्या संस्काराचे उगम त्यांच्या माऊलीत दडले हे उमगले .सचिन सरांच्या माध्यमातून हे “संस्कारधन” नव्या पिढीला लाभो हीच सदिच्छा.

— लेखन : डॉ प्रशांत थोरात. नेत्ररोग तज्ञ, प्रभात ट्रस्ट. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

 1. काळाच्या ओघात आणि रोजच्या जीवन रहाटगाडग्यात आपण काही गोष्टी विसरतो पण पुन्हा अशी माणसे भेटतात.
  आपल्याला भानावर आणतात
  आणि आपलं आयुष्य समृद्ध करून जातात 🙏🏼
  असे संस्कारमोती आपला ठेवा आहे.

 2. निसर्गाचे प्रेम आणि संस्कारांची सावली या दोन्ही गोष्टींना अधोरेखित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद, प्रशांत साहेब..! !
  .. प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था .
  9921447007

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ