अमेरिकेतील सँन होजे येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (BMM) वतीने भरलेल्या तीन दिवसांच्या “काय बे”… या मराठी संमेलनास उपस्थित असलेल्या आपल्या पोर्टल च्या लेखिका, कवयित्री चित्रा मेहेंदळे खास आपल्या पोर्टल साठी तेथील वृत्तान्त पाठवित आहेत. आज वाचू या…. पहिल्या दिवसाचा वृत्तान्त.
– संपादक
२८ तारीख
मी प्रथमच अशा BMM च्या संमेलनाला आले आहे. मागील वर्षभर ह्या संमेलनात कोण येणार, काय कार्यक्रम असणार, इथल्या स्पर्धा, स्मरणिका इत्यादी अनेक विषयांवरची माहिती सांगणाऱ्या पोस्ट येत होत्या. त्यामुळे या संमेलनाबद्दल प्रचंड उत्सुकता होती.
ह्या संमेलनासाठी पाच हजारच्यावर मराठी लोकं येतील अशी अपेक्षा होती, त्यामुळे जागाही तशीच मोठी हवी होती. अमेरिकेत तसे पाहिले तर सर्वच मोठे, भव्य दिव्य असते. हे सॅन होजे चे जे कनव्हेन्शन सेंटर आहे ते असेच भव्य दिव्य आहे. म्हणजे किती ? तर ५५०,००० स्कोअर फूट ! ह्यात ३१ हॅाल आहेत. एका वेळी ५ हजार लोकं बसू शकतील, अशा मोठ्या हॅालमध्ये आणि इतरही मोठ्या छोट्या हॅालमध्ये आज सर्व कार्यक्रम होते.
या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमासाठी ड्रेसकोड आहे. अर्थात बंधनकारक नाही ! पहिल्या दिवशी पैठणी, संध्याकाळी शेजारच्या देशात साडी, पुरूषांना सिल्क कुर्ता, पायजमा, मोदी जॅकेट.. त्यामुळे सर्वजणी एखादा सण असावा, लग्नकार्य असावं तसे नटून थटून आले होते. मस्त प्रसन्न वातावरणं होतं. आजूबाजूला इतके मराठी बोलणारे पाहून भरून आलं होतं.

सकाळी ७ ते ९ मध्ये ब्रेकफास्ट होता .. नावंही छान होतं. .. आईच्या हातचा..
काय होतं ? कांदेपोहे, प्रसादाचा शिरा, कोथिंबीर वडी, चटण्या, चहा, कॅाफी.. आपल्यासारखी, मुलांसाठी पॅनकेक, सिरीयल, फळांचा रस.. म्हणून आम्ही लवकर आलो होतो.
गेटवर अत्तर लावून स्वागत केलं गेलं. यावेळी अमेरिकेतल्या प्रत्येक मराठी मंडळांना ब्लॅाक नी बुकींग करून कन्सेशन दिले होते. या ब्लॅाकच्या नंबराप्रमाणे बसायची उत्तम व्यवस्था केली होती आणि तसे वेगवेगळे बॅच दिले होते. त्याप्रमाणेच तिकीटेही वेगळी होती, त्याप्रमाणे बॅचे्च दिले होते.

३ मोठ्या हॅालमध्ये खाण्याची सकाळ संध्याकाळ सोय केली होती. हॅाल मध्येही ५०/६० मोठी गोल टेबलं, बाजूनी ८/१० लोकं जेवायला बसतील अशी,.. काऊंटरपण ५/६ ! त्यामुळे कुठेही गोंधळ नाही, मोठ्या रांगा नाहीत.. छान सोय होती. सर्व पदार्थ चविष्ट होते. जेवणाचे नांव.. लग्नाची पंगत.., अळूची भाजी, पंचामृत, मसाले भात, पापड, मठ्ठा, गुलाब जाम, पेढा, रबडी, मोहनथाळ, ढोकळा, कचोरी, कटलेट, उंधियो असे सगळे हवेहवेसे वाटणारे पदार्थ ! शिवाय जोडीला १/२ नॅानव्हेज चे पदार्थ !

तृप्त होऊन सर्व ९ वाजता स्वागत सोहळ्याला गेले. १ तासाच्या ह्या कार्यक्रमामध्ये प्रथम BMM चे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, ह्यांची भाषणं, कार्यकर्त्याचे सन्मान, आढावा वगैरे झाले. नंतर “स्वप्नांची बेफाम भरारी” हे तासाभराचे नृत्य नाट्य झाले. त्यात जवळजवळ १०० कलाकार होते. अतिशय सुंदर लेखन, नृत्य, गाणी, कलाकारांच्या लयबध्द हालचाली, सर्वांचे रंगिबेरंगी आकर्षक पोशाख, पडद्यावर डिजिटल चित्रांचा योग्य वापर, रोषणाई, संगीत ह्या सर्वांमुळे ही स्वप्नांची दुनिया प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी, कौतुकास्पद होती.

जेवणानंतर ६ पर्यंत अनेक कार्यक्रम होते. एकाचवेळी अनेक हॅाल मध्ये वेगवेगळे कार्यक्रम होते. संजीव अभ्यंकर आणि अश्विनी भिडे, राहुल देशपांडे प्रियांका बर्वे, ह्यांच्या गाण्यांबद्दल बोलायलाच नको. मराठी रसिकांनी भरभरून दाद दिली. धनश्री लेले, प्रल्हाद वामनराव पै, पंडित चारूदत्त आफळे अशा दिग्गज विद्वानांच्या तोंडून धर्म, संत असे आध्यात्मिक ऐकणे हे आपले भाग्यच असते. अर्चना जोगळेकरांचे नृत्य, स्थानिक कलाकारांच्या लावण्या, नृत्याच्या स्पर्धा, कॅामेडी शो, मल्लखांब प्रत्यक्षिकं, वाखाणण्यासारखे. तरूण कलाकारांचे ययाती आणि देवयानी हे संगीत नाटक तर अप्रतिम झाले.

डॅाक्टर्स, इंजिनियर्स लोकांचे अनुभव, AI चे वैद्यानिक महत्व, मेडिटेशन, यासारखे वैचारिक कार्यक्रम, काही तरुणांचे चर्चा सत्र, लेक्चर आणि राज ठाकरे ह्यांचे नेहमीप्रमाणेचे परखड भाषण. …

इतके विविध कार्यक्रम .. ज्याला जो आवडेल तो पहावा ! नोकरी सांभाळून, प्रचंड मेहनत घेऊन सुंदर सादरीकरण करणाऱ्या या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी, मनापासून दाद देत आज आलेले सर्वजण खूष होऊन रात्री आपापल्या मुक्कामी परतले.
क्रमशः
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️+91 9869484800