आज जागतिक काव्यदिन आहे. या निमित्ताने काही कविता पुढे सादर करण्यात येत आहेत. काव्यदिनाच्या सर्व कवी, कवयित्रीना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. कविता
मनातल्या भावनांना
शब्द देते कविता
डोळ्यातल्या आसवांना
सांत्वना देते कविता
खचलेल्या जीवाला
जीव लावते कविता
बेजार झालेल्या रुग्णांस
आधार देते कविता
प्रेमाची जाणीव
करून देते ती कविता
प्रेमाच्या आणाभाका
शब्दांत व्यक्त करते कविता
अबोल मनाचे हितगुज
साकारते कविता
दुबळ्या मनाचा
आधार बनते कविता
मैत्रिची वीण घट्ट
विणते कविता
घडलेल्या घटनांना
शब्द रुप देते कविता
विरही मनाचा पूल
बनते कविता
क्षण अन् क्षण
बंदिस्त करते कविता
— रचना : डॉ.प्रभा वाडकर. लातूर.
२. “कविता”
मला कवी व्हायचे होते
पण कविता कशी
करायची असते
ते माहित नव्हते..
एकदा सुंदर मुलगी दिसली
कोचावर बसलेल्या पाहुण्यांना
चहा आणि फराळ देताना,
साडीचा पदर सावरित होती
अगदी तशा हाताने
शब्द सांडू नये
म्हणून मी प्रयत्न केला
त्यादिवशी मी कवी झालो
कविता कशी करायची
ते मला उमगले होते
ते मला उमगले होते
कारण मी कवी झालो होतो
— रचना : शांतीलाल ननवरे. बारामती
३. कविता म्हणजे….
कविता म्हणजे
जन्मजात प्रतिभा
कवि ह्रदयातील वेदना
विचारांचे काहुर
कविता म्हणजे
कवि मनाची लहर
यमक अलंकार जुळवत
शब्दांचा केलेला कहर
कविता म्हणजे
नऊ रसांची गुफंन
हास्य,भयान, रौद्र, बीभत्स
शांत, वात्सल्यचे मिलन
कविता म्हणजे…..
कवि मनाच्या विविध तऱ्हा
मनी दाटलेल्या भावनांचा
खळखळता झरा
कविता म्हणजे …..
शेतकर्याच्या कष्टाची
त्याच्या मनाची, राना वनाची
कथा ऊन पाऊसाची
कविता म्हणजे…..
सृष्टीतील प्रत्येक वस्तुची
सजीव निर्जीव चराचरातील
आश्चर्यचकीत निर्मितीची
— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड
४. रसतृप्त झाल्यावर
माझ्या कवितेने कधी
नाही आकांत मांडला
नाही रोधलेला श्वास
लक्ष वेधून घेण्याला
जिणे जसे झाले तसे
तुम्हासमोर मांडले
उखळात नाही कधी
उगा पत्थर कांडले
अभिनिवेशाची भाषा
स्पर्शली ना तिच्या चित्ता
कौतुकाच्या सोहळ्यात
तिची गोंधळते वाचा
वैविध्याने नटलेले
जग जरी सभोवार
स्थिरावली तिची दृष्टी
एका शून्य अंशावर
अंधारात राहूनही
तिने पाहिला प्रकाश
डोळियांत मावलेले
दावण्याचा तिला ध्यास
कशासाठी रचनेची
नवी वाट धरायची,
‘पसंतीस येते,
नाही’ व्यर्थ चिंता करायची !
वाढे अगोड काढून
ऊस- गोडवा चाखावा
रसतृप्त झाल्यावर
चोथा फेकूनिया द्यावा
— रचना : सूर्यकान्त द.वैद्य. पुणे
५. जीवनदायी सरिता
कविता भासे सरिता मजला उगम तिचा हृदयी
जल शब्दांचे नित पाझरते थांबत नाही कधी
जसा नदीचा प्रवास असतो काट्याकुट्यातुनी
तशीच वाहे माझी कविता अवघड मार्गातुनि
शुभ्र धबधबा हसत मारतो उंचावरुनी उडी
तशी बागडते मनात कविता निखळ नि स्वच्छंदी
जीवनदायी शांत संथ परि कोलाहाल तळी
तीच अवस्था कवी-अंतरी वेदनाच सगळी
गंगामैय्या पवित्र पावन तीर्थ तीचे मोक्षी
तीच शुचिता पसायदानी ज्ञानेश्वर साक्षी
नदी शेवटी मिळे सागरा संकेत मिलनाचा
रसिका हृदयी काव्य उतरते तो क्षण भाग्याचा
— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
६. कवी
अदृश्य शक्ती असे
त्याचे नाव असे कवी
आंबट- गोड- तिखट शब्द
कल्पना भंडार असे कवी
ना जातीचा
ना कोणत्या धर्माचा
कवी असे
हळव्या मनाचा
ना तो गरिब श्रीमंत
ना अशिक्षित, सुशिक्षित
असे तो शब्दांचा धनी
लोक त्याचा आदर करीत
शब्दांच्या बाजारात
पैशाने केला जाई खेळ
मात्र कवी असा असे
न विकता राखी शब्द मेळ
गझल, शायरी, गीत, लावणी
ना करी एकमेकां तिरस्कार
विरंगुळा म्हणून काही हिनवी
मिळे कवितेस पुरस्कार
प्रतिभा आणि प्रतिमा
म्हणजेच कविता
अनेक भाषा एक भाव
म्हणजेच कविता
— रचना : विलास देवळेकर. मुंबई
७. “माझी अजाण कविता”
कवितेस अजाण माझ्या
महापूरात सोडतो आज मी
शब्दांचा मुक्या मनातला
हा नाळ तोडतो आज मी
मी शब्द पाळला पुरता
बिगारी बाराखडीला दिलेला
जपलेल्या जखमांचे जळू
उघड्यावर फोडतो आज मी
पुरे आता वेदना विखारी,
नकोत हळव्या संवेदना बिलोरी
बांध भरल्या अनिवार भावनांचा
वेडावून तोडतो आज मी
या माझ्या शाकुंतल शब्दांना
सांभाळील कण्व कुणी कनवाळू
का बुडवून तुडवतील पायतळी,
ही खंत सोडतो आज मी
— रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
८. देणे कवितेचे
कवितेने इतके दिले की
गच्च भरली झोळी
फाटली जरी उद्या
उरतील अजरामर ओळी
कवितेनं असं फिरवलं
मन, ह्रदय उतरलं
शब्दा शब्दातून
कागदावर…..
गझल अशी रंगली
बहारदार छेडीली
तिने प्रत्येकाच्या
हृदयाची तार
चारच ओळी कागदावर
अवघ्या रसिकांवर
कविता पडली भारी
प्रतिभेचे देणे असे
दिलखुलास बहरले
अवघे जीवन
रंगतदार झाले
कवितेने इतके दिले ल
गच्च भरली झोळी
फाटली जरी उद्या
मागे उरतील या ओळी
— रचना : आशा दळवी दूधेबावी, जि.सातारा
९. भाव मनीचा
भावना मनी साठलेल्या
वाटे सांगाव्या कुणाला
पण मनाचे हे ऐकण्यास
वेळ कुठे तो कुणाला ?
भाव मनीचे, गुज मनाचे
नाही कळत ते शब्दाविना
अंतर नसावे उगीचच
जरूर बोला एकमेकांना
भावनिक आहोत आपण
रुक्ष कठोर वागणे नसावे
एकटा पडलेला आपलाच
त्याला आपल्या सोबत घ्यावे
भाव मनीचा
— रचना : अरुण वि. देशपांडे. पुणे
१०. अशी असावी कविता
(अष्टाक्षरी कविता)
अशी असावी कविता
साज नित नवा हवा
सुर गवसता कवी
पक्षी होवुन उडावा ॥१॥
अशी असावी कविता
मज मिलनाची आस
खरं प्रेम समजता
फुले आरती सरस ॥२॥
अशी असावी कविता
भाषा खेळता बहर
नशा चढावी कविता
भाषा नाचावी बहर ॥३॥
अशी असावी कविता
मज जगणे सुलभ
येता गंध कवितेचा
श्वास ही होवो सुलभ ॥४॥
अशी असावी कविता
प्रेम रोज माझे फुले
शब्द ओंजळीत घेता
काव्य होवुनी फुलले ॥५॥
— रचना : पंकज काटकर. काटी, जि.धाराशिव
११. कवि आणि कविता
कवितेच्या प्रांतात
कवि एकदा शिरला
कवितेला काय वाटते
अजमावू लागला
आम्ही जेव्हां फुलवतो
तुझ्या अंगणी मळे
रंगगंध घेऊन येती
नाना शब्दफुले
घालतो आम्ही त्यांना
भावनांचं शिंपण
कुठल्याच विषयाचं
कधीच नसतं कुंपण
वृत्तांच्या कोंदणात
सजवून ठेवतो तुला
तर मुक्तपणे वा-यासंगे
कधी सोडतो तुला
रंगांची ती बहार
नि गंधांची ती संगत
तुझ्यालेखी काय बरं
असेल त्यांची किंमत ?
आम्ही जेव्हां उधळतो
नाजूक प्रणय शब्दात
आकाशीचं चांदण
फुलतं कां ग मनांत ?
कुठे जरा रुते काटा
सल ओसंडे शब्दात
तेव्हां घायाळ घालमेल
होते कां अंतरात ?
हलका फुलका विनोदही
पेरतो आम्ही शब्दात
तेव्हां येते कां ग तुला
हसूं ओठापोटांत ?
आवेशाने जेव्हां आम्ही
तापून लिहितो कांही
तेव्हां तुलाही चढते कां ग
स्फुरण थोडे कांही ?
एक मात्र खरे
तुझ्या प्रांतात करतो धमाल
तुझ्याशिवाय कविला
नाही कमाल
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800