आज पासून श्री गणेशाचे आगमन झाले आहे. त्या निमित्ताने काही गणेश वंदना.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. गणपती आला
गणपती आला, गणपती आला
तुंदिल तनु सावरीत आला
मूषक वाहन बसायला
भक्तांच्या भेटीला आला Il
दहा दिवस कैलास सोडून आला
मोदक आवडतात त्याला
करू या नैवेद्याला
वाहू चरणी जास्वंद फुला Il
प्राजक्ताचे हार गुंफुनी
दुर्वा ठेवू निवडोनी
चंदन गंध, अक्षता लावूनी
करू या पूजनाला Il
गुलाल, शेंदूर, कुमकुम भाळी
कमल पुष्प, गुलाब, पारिजात
दुर्वा, पत्री चरणी वाहू
रूप देखणे नेत्री पाहू Il
टाळ, मृदंग, चिपळ्या वाजवीत
सुख कर्ता, दुःखहर्ता आरती गाऊ
गूळ, खोबरे नैवेद्य वाटू
हर्षभरे सगळ्यांना भेटू Il
— रचना : सुलभा गुप्ते. ईजिप्त
२. “श्री गणेश वंदना”
प्रथम तुजला वंदन करितो
देवा गणेशा
कार्यारंभी तुजला नमिती
देवा गजानना
सर्वांचा तू देव असशी हे सिध्दीविनायका
देवाधिपती तू असशी देवा श्रीसिध्दीगणेशा
तूच असशी सृष्टीदाता
तूच असशी दृष्टीदाता
तूच असशी जीवनदाता
साष्टांग नमन माझे तुजला देवा ! ।।१।।
भूतली या तुझिया क्रुपेने
अवतरलो जगती मी देवा
सेवा करण्या अखंड तुझी रे !
असूदे खूप बळ अंगी माझ्या, देवा ! ।।२।l
सकल गुणांचा तूच अधिपती
सर्व विद्यांचा तूच रे! श्रीपती
विद्यारंभे प्रथम तूलाच नमिती
प्राप्त होण्या जीवनी श्रीसुखशांती ।।३।।
ह्रदयी असूदे सदैव तुझेच चिंतन
शुध्द राहूदे देवा मम अंत:करण
अधिर झालो देवा मी तुझ्या दर्शना
हीच मम आस तव चरणी गजानना ।।४।।
–– रचना : मधुकर ए.निलेगावकर. पुणे
३. आगमन
तुझ्यामुळे आनंद तो वाढला रे,
मंगलमूर्ती तो आला आला रे,
ढोल, ताशा धरतात रे ताल,
एकाच लयीत, जीव दंगला रे,
किती रुपे घेऊन, धरेवर येसी,
मुर्तीतून जना साऱ्या भुलविशी,
पाश, अंकुश धारण करीशी,
आशिर्वादासह, मोदक दिला रे,
स्वच्छ होई सारा परिसर पाही,
तुझे आगमन, जेथे जेथे होई,
एकजूट होई, कल्पना सजती,
तरुणांशी बोले, संकल्प खरा रे,
जागवा, जागवा, भाव आता मनी,
लागा लगा सारे, गजानना चरणी,
संकटात रक्षी, मार्ग दाखवितो,
मागेल ते देतो, दाता वेगळा रे…!!!
–– रचना : हेमंत भिडे. जळगाव
४. “गणपतीचे आगमन“
गणरायाचे आगमन आनंदाला ये उधाण
गजाननाची स्थापना करूया सार्थतेनं IIधृII
निस्सिम भक्ती सेवा करू अर्पुया सुमन
जपुया मंगलकारक आचार विचार उच्चारण
ज्ञानाच्या एकदंता करितो तुजला वंदन II1II
सगुण निर्गुण रूप महिमा गणेश मंत्र
ध्यान श्लोक गणेशानामाष्टक घेऊ समजून
सकलगुण निधान गुणांचे करू ग्रहण II2II
तुझे रूप मंगल आहे उदात्त उन्नत
चौदा विद्या चौसष्ट कलाधिपती सर्वज्ञ
सुखकर्ता दु:खहर्ता शिवपार्वती नंदन II3II
ओंकाराचे सर्वव्यापित्व स्वरूपत्व शक्तिमान
गणेश प्रणवापासून सृष्टी उत्पत्ती मंत्र महान
गणेश उत्तरातापिनी आहे सुंदर उपनिषद II4II
सर्व गणांचा गुणांचा गुणपती अनन्य
प्राणीमात्र भूतमात्र जीव जंतू स्वामी गजेंद्र
महाभारत लेखनिक आहेस ज्ञानसंपन्न II5II
ज्ञानोबा म्हणती जो निर्गुण तो प्रगटला सगुण
सर्वांच्या बुद्धीचा तू आहेस प्रकाश सुजाण
सर्व पूजांमध्ये गणेशाला आहे अग्रमान II6II
— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ.☎️ 9869484800