Saturday, July 27, 2024
Homeलेखकुरतडलेली भाऊबीज

कुरतडलेली भाऊबीज

आज इतक्या वर्षानंतर माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी घटना उभी राहिली आणि जीव कासावीस झाला. बरेचदा घटना घडून जातात. कोण चूक कोण बरोबर ? याचा उहापोह करण्यात आयुष्य जाते पण जखमा ओल्याच रहातात. व्रण सतत आठवण करुन देतो आणि भळभळणारी जखम भूतकाळातले सगळे दिवस गायब करते आणि तो दिवस, ती घटना आजच झालीय असे वाटत राहते.
साधारण दहा वर्षाचे माझे वय…माझा भाऊ आठ वर्षाचा. माझा स्वभाव थोडा धुसमुसळा आणि सतत चेष्टा, मस्करी करणारा होता. फटाके स्पर्धा लावून उडवणे हा आणखी एक गुण.

दिवाळी होऊन दोन दिवस झाले होते. भाऊबीज होती.आईने आधीच सांगितले होते. भाऊबीज काही अशीच मिळत नाही काही बर का !..
पहाटे उठायचे, भावाला सुगंधी तेल लावून माँलिश करायचं, नवीन सुगंधी सखबण, उटणं लावून आंघोळ घालायची.
फराळाला पाटाभोवती रांगोळी घालायची, ओवाळायची तयारी करायची.. हे सगळ तुझ तूच करायच बर का ! तेव्हाच घसघशीत भाऊबीज मिळेल.

मग काय भाऊबीज मिळवायची म्हणजे करायलाच पाहिजे न ? मग काय विचारता..
पहाटे उठले. आंघोळ करुन नवा फ्राँक घातला आणि थोडे फटाके उरले होते ते उडवायला उदबत्ती पेटवून घेतली आणि अंगणात लवंगी फटाके लावायला सुरुवात केली. पण एकटीनी काही मज्जा येईचना. मग फुलबाजा पणतीवर धरून पेटवला आणि चिनूला म्हणजे माझ्या भावाला, उठवायला फुलबाजा घेऊनच पळत आत आले.

अरे चिन्या उठ नाहीतर सगळे फुलबाजे संपवीन हं….अस म्हणत मी त्याच पांघरुण ओढले आणि त्या झटापटीत माझ्या हातातला फुलबाजा पांघरुणावर पडला. चिन्याच्या पांघरुणानं पेट घेतला. मला काय करावे कळलच नाही. चिन्या गाढ झोपेत होता, त्याला कशाचीच कल्पना नव्हती. मी आई, आईई.. म्हणून ओरडले.. काय करावे सुचत नव्हते. आजी, बाबा, काकू सगळे धावले. पांघरुण मऊ असल्याने भूरुभुरू पेट घेत होते. एव्हाना चिन्मय पण जागा झाला होता. पण पेटलेले पांघरुण त्याच्या पायाला चिकटले होते. सगळ्यांनी त्याला अंथरुणातन बाहेर घेतले…पांघरुण अंगणात भिरकावले पण चिन्याचा पाय चांगलाच भाजला होता. आठ दिवस डाँक्टर कडे त्याला औषधं घ्यावी लागली. त्याची होरपळ माझे मन होरपळून टाकत होती. कुणीही रागवले नसलं तरी जीवाची तगमग आजही भाऊबीजे दिवशी मन कुरतडत बसते.

भाऊ जोरात हसतो. दरवर्षी घसघशीत भाऊबीज घालतो पण मला प्रचंड अपराधी वाटत होतं. तेव्हाही आणि साठ वर्षानंतर आजही. तो सगळा दिवस वाईट गेला…चिन्याचा रडवेला चेहरा आजही पांघरुण अंगावर घेताना मला जाब विचारतोय अस वाटतय.

चिन्मय मात्र हसून बहिणबीज म्हणून पाय कुरवाळतोय आणि मी खट्टू, उदास, अपराधी चेहऱ्याने आजही नजरेने त्याची क्षमा मागतेय. अशा या पांघरुणाने माझ्या आयुष्यातली कुरतडलेली भाऊबीज.
त्या दिवसापासून मी फटाके उडवणं सोडल ते सोडलच.

— लेखन : प्रा.सौ.मानसी जोशी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८