Wednesday, September 11, 2024
Homeलेखकृष्ण चिंतन - १

कृष्ण चिंतन – १

जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे. व्यक्ती काल्पनिक असेल पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्या पुढे मांडता येतो असे मी मानतो.

लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला. म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता कालमान परत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे आणि त्या कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. (वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली असे म्हणतात परंतु गीतेच्या द्वारे त्यांने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे्.
प्रत्येक ठिकाणी मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे अंत ही आहे. असे तत्वज्ञान मांडले आहे असे वरकरणी वाटते. परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘मी-पणा’ नसून ‘मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार’ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगीकारतो असे त्याचे म्हणणे आहे. त्याने सांगितले या विश्वाचा आदि (सुरुवात) मीच आहे आणि या विश्वाचा अंत ही मीच आहे.

मी म्हणजे सर्वसामान्य माणूस. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे. त्यामुळे विश्व हे माझ्या आयुष्या पुरतेच मानले पाहिजे.

श्रीकृष्ण जर या विश्वाचा शासक असे मानले तर त्याचे असे म्हणणे आहे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. कृष्ण म्हणतो ‘न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार’ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही. उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे. त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही.

हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे, नाही का ? शासन कोणतेही असो परंतु सर्वसामान्यांचे जीवन बदलले नाही, बदलणार नाही. ते तुम्हाला चार युक्तीच्या गोष्टी सांगतील. परंतु तुमच्या जीवनाची लढाई तुम्हालाच लढायची असते. त्याचे सैन्य तुमच्या विरोधात लढत असते आणि शत्रूचे सैन्य अर्थातच शत्रूचे असल्यामुळे तुमच्या विरोधात लढत असते. तुमच्या बाजूने लढणारे फक्त तुमचे चार पाच जण असतात तेच खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात. तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात. त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी सामान्य माणसाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे.

सर्वच शासनकर्ते हे सामान्य माणसाच्या भल्यासाठी सर्वकाही करत असतात असे त्यांचे तत्वज्ञान असते. तरीही तसे कधीच घडत नाही. कारण त्यांचे सैन्य नेहमी त्यांच्या तत्वज्ञानाच्या विरोधातच लढत असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला शासनकर्त्यांच्या सैन्याचे विरोधातही लढावे लागते आणि शासनकर्त्यांच्या शत्रूच्या सैन्याच्या विरोधातही लढायचे असते. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत. त्याचे स्वतःचे विचार त्यांनी जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे.

मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत. म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते.
राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्या जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील.
क्रमशः

सुनील देशपांडे

— लेखन : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. स्वतः स्वतःचे जीवन घडवतो ही स्वसामर्थ्याची जाणीव करून देणारा सुरेख लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments