Thursday, December 5, 2024
Homeलेखकॅनडा : एक सौंदर्यानुभूती

कॅनडा : एक सौंदर्यानुभूती

“As long as autumn lasts, I shall not have hands, canvas and colors enough to paint the beautiful things I see.” — Vincent Van Gogh.

सृष्टीतील रंगछटांची मुक्त उधळण करणारा उत्तर अमेरिका खंडातील नयनरम्य असा शारदीय रंगोत्सव. कॅनेडियन व ब्रिटिश इंग्रजीमध्ये त्यास ‘ऑटम’ (Autumn) असं संबोधलं जातं. ‘ऑटम’ या शब्दामध्ये हृदयंगम अर्थवैपुल्यता दडलेली असून प्रतिभाविलासी लेखनकर्ते आपल्या ललितकृतींमध्ये उत्तम रसपरिपाक साधण्यासाठी या शब्दाचा प्रयोग करतात. ‘ऑटम’ या शब्दाची दोन व्युत्पत्तीस्थळं आहेत. लॅटिन भाषेतील ‘ऑटम्नस’ (Autumnus) व फ्रेंच भाषेतील ‘ओताॅन’ (Autompne/Automne). अमेरिकन इंग्रजीमध्ये ‘फाॅल’ (Fall) हा शब्द ‘पानगळीचा ऋतु’ म्हणून सर्वपरिचित आहे. लाल, किरमिजी, तपकिरी, अबोली, शेंदरी, पिवळ्या, सोनेरी ते अगदी जांभळ्या रंगाच्या पर्णजान्हवीत यथेच्छ विहार करताना ‘ह्याची देही ह्याची डोळा, ऐसा रंगला सोहळा’चा प्रत्यय येतो. एखाद्या निसर्गचित्रकारानं आपल्या स्वयंभू कलासाधनेतून निसर्गाला तासनतास न्याहाळून तो चित्रफलकावरती हुबेहूब चितारावा व अक्षरशः प्रतिनिसर्ग निर्माण व्हावा, असा कमालीचा ‘फिनिशिंग टच’ ऑटमचे रंग भरताना साक्षात ‘निसर्ग’ नामक रंगारीनं दिला आहे. सुप्रसिद्ध डच चित्रकार व पोस्ट इम्प्रेशनिस्ट पेंटर व्हिन्सेट गाॅफ यांनी ‘ऑटम’ ऋतुला बहाल केलेला उपरोल्लेखित शब्दरूपी रत्नमुकुट चित्रकाराच्या मनातील शरद ऋतुचं भावनिक स्थान प्रकट करत आहे.

प्राकृतिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला उत्तर अमेरिकेतील एक विशाल देश म्हणजे कॅनडा. कॅनडात सप्टेंबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत ऑटमची कलायडोस्कोपिक झलक पाहायला मिळते. कॅनडा व उर्वरित उत्तर गोलार्धात शारदीय रंगोत्सवाचा ‘आरंभबिंदू’ म्हणून ‘२२ किंवा २३ सप्टेंबर’ हा दिवस गणला जातो. सूर्य दक्षिणेकडे सरकत जेव्हा विषुववृत्त ओलांडतो, तेव्हा त्यास ‘ऑटम्नल इक्विनॉक्स’ असं म्हणतात. कॅनडामध्ये वसंत (Spring), उन्हाळा (Summer), शरद (Autumn) व हिवाळा (Winter) असं ऋतुचक्र अनुभवायला मिळतं. उन्हाळा सरताना कॅनडातील हवामानात लक्षणीय बदल जाणवू लागतात. दिवस रात्रींपेक्षा लहान होतात. हवेतील आर्द्रता कमी होऊन थंड वारे वाहू लागतात. प्रसंगी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळतात. अशा वातावरणात ऑटम ऋतुला अत्युच्च बहर आलेला असतो. शरद पौर्णिमेच्या रात्री जसा चंद्र त्याच्या समग्र सोळा कलांसह चमकतो अन् चंद्रमंडलातून अमृतकिरणांचा वर्षाव करतो, अगदी तसाच शरद ऋतु देखील त्याच्या रंगीत पर्णसंभाराचं सर्वांगसुंदर रूपदर्शन देतो. पानगळीच्या स्वरूपात पानांचा अव्याजमनोहर शिडकावा करतो. रस्त्याच्या कडेनं चालताना पायांना स्पर्शून जाणारा पानांचा चुरा प्राजक्ताचा सडा असल्यासारखा भासतो. उत्तर गोलार्धात रात्रीच्या वेळी हरित, लोहित व नील रंगांच्या मिश्रणानं उत्पन्न झालेली उत्तर ध्रुवप्रभा न्याहाळण्यासाठी शरद ऋतुचा हा काळ सर्वोत्तम मानला जातो. ही संकल्पना ‘नॉर्दर्न लाईट्स’ किंवा ‘अरोरा बोरिआलिस’ (Aurora Borealis) म्हणून ओळखली जाते.

कॅनडाचा जवळपास ९५,००० चौरस मीटरचा प्रदेश हिरव्याकंच वनश्रीनं नटलेला आहे. तब्बल ३६२ दशलक्ष हेक्टरमध्ये पसरलेलं हे वनवैभव आहे. जगाच्या एकूण वनक्षेत्रांपैकी नऊ टक्के भाग कॅनेडियन वनश्रीनं आच्छादलेला आहे. कॅनडा हा लाकूड उत्पादनात जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. त्यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत येथील वनीकरण उद्योगाचा सर्वात मोठा वाटा आहे. कॅनडानं उत्तर अमेरिकेचा खंडाचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. उत्तर गोलार्धातील वृक्षांच्या प्रजाती थंड वातावरणात अधिक घनदाट होऊ लागतात. हवामानातील बदलामुळे वृक्षांची घनता बदलत आहे. कॅनडाचं भौगोलिक स्थान उत्तर गोलार्धात असल्यानं सदाहरित (Conifer) व समशीतोष्ण पानझडी (Deciduous) वृक्षांची वर्दळ येथे पाहावयास मिळते. इथल्या सदाहरित वृक्षांच्या पानांचा आकार सुईसारखा किंवा शंकूसारखा असतो. त्यामुळे सदाहरित वृक्षांची पानं गळून पडत नाहीत. ती वर्षभर टिकून राहतात. त्यांना ‘साॅफ्टवुड्स’ असंही म्हणतात. याउलट समशीतोष्ण पानझडी वृक्षांची पानं शरद ऋतुत रंग बदलतात व मोसमांती गळून पडतात. पानझडी वृक्षांना ‘हार्डवुड्स’ असंही म्हणतात. सूर्यप्रकाश गोळा करण्यासाठी पानझडी वृक्षांच्या पानांचा पृष्ठभाग विस्तृत असल्यानं त्यांना ‘ब्रॉडलीफ ट्री’ असंही म्हटलं जातं. सप्टेंबर अखेरीस पानझडी वृक्षांची पानं रंगलेपनात व्यस्त होतात. शुगर मेपल, रेड ओक, स्टॅगहाॅर्न सुमॅक, ब्लूबेरी, ब्लॅक ओक, अमेरिकन बीच, चेरी बर्च, ब्लॅक गम, ससॅफ्रास, टॅमरॅक, शॅगबार्क हिकोरी, ब्लॅक विलो, मंच्युरियन ॲश, ब्लॅक ट्युपेलो यांसारखे वृक्ष ऑटमच्या मोसमात त्यांच्या पर्णसंभारात रंगाविष्करण घडवून आणतात.

आॅक्टोबरच्या मध्यात ही पानं हळदी, पिवळ्या, सोनेरी रंगछटांची वेशभूषा परिधान करतात. चमकदार सोनेरी, ज्वलंत पिवळ्या, तेजस्वी कांस्य रंगांच्या झगमगाटात अलंकारांनी नखशिखांत मढलेल्या नववधुसम कॅनडातील वनश्री मनोहारी भासते. ह्या काळाला कॅनडामध्ये ‘गोल्डन ओन्काॅर’ असं संबोधलं जातं. म्हणूनंच या ऋतुला ‘ऐश्वर्यवंत’ अशी उपाधी मिळाली आहे. अमेरिकन लेखक व पत्रकार जिम बिशप यांनी ऑटमच्या या सौंदर्यावस्थेसंदर्भात एक उत्कृष्ट वैधानिक दाखला दिला आहे. त्यात ते म्हणतात की “Autumn carries more gold in its pocket than all the other seasons.” इथला शरद ऋतु जणू पर्णसंभाराचं मौल्यवान सोनंच आपल्यासोबत घेऊन फिरतो. कॅनडाच्या राष्ट्रध्वजावरती विराजमान असलेलं लाल मेपलचं पान हे कॅनडाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. शरद ऋतुत लाल रंगाची लाली गाली चढवलेली ही मेपलची पानं छायाचित्रकाराला अक्षरशः भुरळ घालतात. लाल पर्णसंभार व शेंदरी सूर्यास्त यांचा स्वर्गीय मिलाफ तर विलक्षणंच.

सूर्यास्ताच्या या सुंदर रंगसंगतीनं प्रेरित होण्यावाचून अन्य कुठलाही पर्याय आपल्याकडे शिल्लक राहत नाही. कॅनडातील ‘माॅन्ट ट्रेम्बलान्ट’, ‘हॅलिफॅक्स’, ‘राॅकी पर्वत’, ‘बॅन्फ नॅशनल पार्क’, ‘लाॅरेन्शियन पर्वत’, ‘व्हँकुव्हर’, ‘केप ब्रेटन आयलंड’, ‘मॅनिटोबा’, ‘अल्गोनक्विन उद्यान’, ‘कॅरिबू पर्वत’, ‘नायगरा’ ही प्रेक्षणीय स्थळं शारदीय रंगोत्सवासाठी लोकप्रियतेस पात्र ठरली आहेत. ही विहंगम दृश्यं पाहण्यासाठी, टिपण्यासाठी व मनात दीर्घकाळ साठवण्यासाठी जगभरातून असंख्य निसर्गप्रेमी पर्यटक मेपल सिरपच्या या भूमीला भेट देतात. कॅनडासह युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, नेदरलँड्स, आईसलँड, जर्मनी, ग्रीस, बुल्गेरिया, इटली हे देश सुद्धा त्यांच्या शारदीय रंगोत्सवाच्या नयनरम्य सादरीकरणासाठी जगप्रसिद्ध आहेत.

ऑक्टोबर सरताना पानझडी वृक्षांच्या डहाळ्या पर्णसंभाराचं ओझं हळूहळू कमी करू लागतात. ‘पानगळ’, ‘पर्णपतन’ किंवा ‘पानझड’ ही वृक्षांच्या जीवनामधली एक महत्वपूर्ण अवस्था आहे. यामध्ये वृक्षाच्या डहाळीवरची भरपूर पानं ठराविक एका ऋतुमध्ये आपोआप गळून पडतात. जगाच्या नकाशावरती पानगळीचा हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतुत असतो. उष्ण कटिबंधात अल्पकालीन शुष्क हंगामात तेथील वृक्ष पानगळीला सामोरं जातात. कॅनडामध्ये नैसर्गिकरीत्या वृक्षांची पानं गळण्याचा कालावधी शरद ऋतुत असतो. पानगळ होण्यापूर्वी पानं त्यांची रंगद्रव्य बदलतात. पानांमधील शर्करा या पानांमध्ये अडकून राहतात व नवीन रंगद्रव्यांची निर्मिती होते. काही रंगद्रव्ये ही पानांमध्ये ‘In-built’ (अंतर्निहित) असतात. उन्हाळ्यात सूर्यकिरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पानांमध्ये क्लोरोफिलची निर्मिती अखंडित होत असते. परंतु शरद ऋतुत जेव्हा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होतो, तेव्हा वृक्ष क्लोरोफिलची निर्मिती करणं थांबवतात. ज्या क्लोरोफिलमुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो, ते क्लोरोफिल तुटतं व हिरवा रंग नाहीसा होतो. अशा वेळी इतर रंगद्रव्ये आपला रंग पानांवरती सोडून जातात. ह्यालाच ‘रासायनिक प्रक्रिया’ म्हणतात. रसायनशास्त्रात पानांच्या रंगद्रव्यांनुसार रंगछटांची (Leaf Colour Pigments) केलेली विभागणी पुढीलप्रमाणे आहे,

Chlorophyll – हिरवा
Xanthophyll – पिवळा
Carotene – ज्वलंत पिवळा, सोनेरी, शेंदरी, केशरी
Anthocyanin – लाल, जांभळा, निळा
Tannins – जेव्हा पानं तपकिरी होतात तेव्हा हेच पानांवरती उरतं.

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या तासांचा कालावधी कमी होतो. त्यामुळे वृक्षाला प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्यासाठी कमी वेळ मिळतो. साहजिकंच त्याला ‘ऊर्जा-बचत’ पद्धतीचा अवलंब करावा लागतो. पानझडी वृक्ष हिवाळ्यात ऊर्जेचं संरक्षण करण्यासाठी ‘शीत सुप्तावस्था’, ‘अल्पविश्राम’ किंवा ‘शीतनिष्क्रियता’ (Hibernation) चा पर्याय निवडतात. अशा पद्धतीनं ऊर्जा व पाणी बचतीसाठी ते आपली पानं गाळतात. ह्या प्रक्रियेला झडण्याची क्रिया (Abscission) म्हणतात. हिवाळा वृक्षवाढीसाठी अनुकूल नसल्यामुळे अनेक वृक्ष हिवाळ्यात सुप्तावस्थेत प्रवेश करतात.

कॅनडामध्ये शरद ऋतुच्या काळात वैविध्यपूर्ण सणोत्सवांना देखील उधाण आलेलं असतं. सप्टेंबरच्या मध्यात कापणी सुरू होते. कृषकांसाठी हा सर्वात व्यस्त काळ असतो. इंग्लिश कवी जाॅन कीट्सने शरद ऋतुला ‘season of mists and mellow fruitfulness’ असं म्हटलं आहे. शरद ऋतुला ‘The fall harvest’ असंही म्हटलं जातं. सुगीच्या हंगामासाठी आनंदोत्सव साजरा करताना मित्र व आप्तेष्ट मंडळी वैशिष्ट्यपूर्ण अशा सामूहिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. कॅनडातील ‘मिसिसागा’ या शहरात दरवर्षी ‘हार्वेस्ट फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात येतं. याशिवाय ‘हॅलोविन’, ‘थँक्सगिव्हिंग डे’, ‘डेड डे’ हे दिवसंही अतिव उत्साहात साजरे होतात. ‘३१ आॅक्टोबर’ रोजी हॅलोविनचा दिवस साजरा करण्याची इथे प्रथा आहे. या दिवसाला ‘ऑल हॅलोज इव्हनिंग’, ‘ऑल सेंट्स इव्ह’ असंही म्हटलं जातं. हॅलोविनचे चित्र-विचित्र पोशाख परिधान करणं, अक्राळविक्राळ मुखवटे चढवणं, चाॅकलेट्स-भेटवस्तू देणं, अॅप्पल बॉबिंगचा खेळ खेळणं, भयकथा सांगणं, भयपट किंवा हॅलोविन-थीम असलेले चित्रपट पाहणं, अशा साग्रसंगीत पद्धतीनं हॅलोविनचा दिवस साजरा केला जातो. ‘तांबडा भोपळा’ हे कॅनडातल्या हॅलोविनचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तांबड्या भोपळ्यातल्या बिया काढून, त्यावरती डोळे, नाक व तोंड यांची नक्षी कोरून, लहानशी मेणबत्ती त्यात कंदिलासारखी प्रकाशमान केली जाते; त्यास ‘जॅक ओ’लँटर्न’ असं म्हणतात. भारतात थट्टा-मस्करीच्या आविर्भावात विद्यार्थ्यांना परीक्षेत ‘भोपळा’ मिळाला का, असा प्रश्न विचारला जातो. परंतु कॅनडामध्ये चक्क हाच भोपळा हॅलोविनचं प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय हॅलोविनची इनडोअर व आऊटडोअर सजावट, ह भाग देखील तितकाच महत्वाचा; ज्यात भूत, प्रेत, आत्मा यांच्या गूढरम्य प्रतिमांचा वापर करून भयप्रदर्शक वातावरणनिर्मिती केलेली असते. याच गोष्टींमुळे हॅलोविन हा उत्तर अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकप्रिय उत्सव झाला आहे. त्याचं धार्मिक व सांस्कृतिक महत्वंही तितकंच आहे. या दिवशी शहीद, संत, विश्वासू व इतर मृत व्यक्तिंचं मनोभावे स्मरण केलं जातं.

कॅनेडियन ‘थँक्सगिव्हिंग डे’ अमेरिकन ‘थँक्सगिव्हिंगच्या डे’ च्या जवळजवळ दीड महिना आधी म्हणजेच नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. हा दिवसंही शरद ऋतुच्या प्रसन्नदायी मोसमातंच साजरा व्हावा, या हेतूने तो कॅनडात विशेष करून ऑक्टोबरमध्येच साजरा केला जातो. थंडीचा मोसम सुरू होण्यापूर्वी जे अन्नधान्य कृषक पुरवतो, त्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी कॅनेडियन संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी कॅनडाच्या बहुतांश प्रांतात सुट्टी जाहिर करण्यात येते. ‘कॅनेडियन थँक्सगिव्हिंग’ म्हणून तो ओळखला जातो. थँक्सगिव्हिंगची सुट्टी सोमवारी असतानाही, येथील स्थानिक वीकेंडमध्ये कोणत्याही दिवशी थँक्सगिव्हिंगच्या मेजवानीसाठी सहकुटुंब एकत्र येतात. थँक्सगिव्हिंग हॉलिडेची थीम देखील दरवर्षी बदलली जाते. यानिमित्तानं आयोजित मेजवानी सोहळ्यांमध्ये पारंपारिक पदार्थांची रेलचेल असते. स्टफ्ड रोस्टेड टर्की, हॅम, मॅश्ड बटाटे, क्रॅनबेरी सॉस, स्वीट कॉर्न, स्क्वॅश, ब्रसेल्स स्प्राऊट्स, कोबी रोल, बटर टार्ट्स, स्मोक्ड सॅल्मन, पुटिन रॅपे, भाजलेलं रताळं व मिष्टान्न म्हणून भोपळा पाई, इ. निरनिराळ्या पदार्थांचा समावेश असतो.

कॅनेडियन शरद ऋतुचं निसर्गदत्त सौंदर्य हे प्राकृतिक सर्जनशीलतेचं एक उत्तम उदाहरण आहे. परंतु त्याच्या पानांमध्ये दडलेला प्रतिकात्मक गहनार्थ सामान्य माणसालाही खूप काही शिकवून जातो. नव्यानं सुरूवात करण्यासाठी आपल्याला जुन्यापासून मुक्त होणं आवश्यक आहे, असा प्रतिकात्मक संदेश जणू ही पानं देतात. शरद ऋतुचा कालावधी साधारण तीन महिन्यांचा असतो, परंतु हा काळ पानझडी वृक्षांसाठी ‘संक्रमणकाळ’ असतो. वृक्षांप्रमाणे मानवजातीलाही संक्रमणातून जावं लागतं. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी दुःखद प्रसंग, कटू आठवणी, वेदना, भोग विसरून बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवावी लागते. ऐन वैभवकाळात नानाविध रंंग धारण करणारी ही पानं जेव्हा एकाएकी गळून पडतात, तेव्हा दुःख, संवेदना सारं काही विसरून पुन्हा नव्यानं बहरण्यासाठी ती सज्ज होतात. निरोप देतानाही भरभरून कसं जगावं, हे शारदीय रंगोत्सव आपल्याला शिकवतो. शरद ऋतुच्या पानांप्रमाणेच मानवजातीनंही वर्षभरात मनात साचलेलं मळभ झटकून, शरीरावरील दुःखाचं ओझं कमी करून नव्यानं प्रारंभ करण्याची कला आत्मसात करणं, ही आज काळाची गरज झाली आहे. पायाखालचा पाचोळा तुडवताना याच पाचोळारूपी पानांना किती इजा होत असेल, याची सामान्य माणूस साधी कल्पना देखील करू शकत नाही. पण माणसाप्रमाणेच निसर्गही नियतीचा हा फेरा चुकवू शकत नाही. नवसर्जनाची पालवी पुन्हा अवतरेल या आशेवरती निष्पर्ण होऊन काही काळ व्यतीत करण्यातंच पानझडी वृक्ष आपल्या जीवनाचं सार्थक मानतात.

एका प्रसिद्ध चिनी म्हणीनुसार,
“A man lives only one life; a grasshopper lives only one autumn.”

— लेखन : प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. कॅनडा : एक सौंदर्यानुभती या लेखातून विविध प्रकारची खूप छान माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !