Friday, December 6, 2024
Homeलेखक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते.

सावित्रीबाईंचा १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.

सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.

१ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. (यापूर्वी मिशनर्या्नी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा अजूनही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली). शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे.

मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

१८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्यात बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते.

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.

१८९६-९७ साला दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.

संजीव वेलणकर

— संकलन : संजीव वेलणकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !